धक्कादायक! नातेवाईकांनीच तरुणाला खांबाला बांधून जिवंत जाळले…

धक्कादायक! नातेवाईकांनीच तरुणाला खांबाला बांधून जिवंत जाळले…

नवी दिल्ली :

ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. एका तरुणाला त्याच्या नातेवाईकांनीच खांबाला बांधून जिवंत जाळलं आहे. अंगुल जिल्ह्यातल्या हंडपपोलीपोल स्टेशन हद्दीत येणाऱ्या केंदुसही गावात मंगळवारी ही घटना घडली. पीडित व्यक्तीचे गंभीर स्थितीतले, काळीज चिरणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या वृत्तानुसार, या घटनेत जाळण्यात आलेला तरुण अवघा पंचविशीतला होता. राजकिशोर प्रधान असं त्याचं नाव असल्याचं समजतं.

त्याच्या नातेवाईकांनीच त्याला एका खांबाला बांधलं, त्याला बेदम मारलं आणि नंतर त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं, अशी माहिती आहे.

या कथित हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, माहिती मिळताच पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या निर्घृण हत्येचा तपास पोलीस करत असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओरिसापोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्ववैमनस्यातून हे कृत्य घडलं असल्याची शक्यता आहे; मात्र अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. संबंधित तरुण सुटकेसाठी आरडाओरडा करत होता; मात्र कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे गेलं नाही, असंही समजतं.

या कृत्याची भीषणता व्हायरल झालेल्या फोटोंवरून स्पष्ट होते. हे दुष्कृत्य करणाऱ्यांची क्रूर मानसिकताही त्यावरून दिसून येते. त्या युवकाबद्दल आता हळहळ व्यक्त होत असली, तरी मारहाण होत असताना त्याला मदत करायला कोणीही पुढे आले नाही, हीदेखील दखल घेण्यासारखी बाब आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे राजस्थानातील अलवर इथे गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भीषण हत्येची आठवण जागी झाली आहे. त्या घटनेत 23 वर्षीय युवकाला जिवंत जाळण्यात आलं होतं. कमल किशोर नावाच्या त्या युवकाचा जाळलेला मृतदेह दारूच्या दुकानाच्या डीप फ्रीझरमध्ये आढळला होता, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं. त्याचा थकित पगार देण्याचा तगादा त्याने काँट्रॅक्टर्सकडे लावल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा