महाराष्ट्रात मन हेलावणारी घटना; 10 नवजात बालकांचा मृत्यू..

महाराष्ट्रात मन हेलावणारी घटना; 10 नवजात बालकांचा मृत्यू..

राष्ट्रपती, पंतप्रधानही हळहळले; मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश..

 

संपूर्ण देशाचं मन हेलावणारी घटना महाराष्ट्रातील भंडारा येथे घडली. मध्यरात्री भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. ज्यानंतर एकच आक्रोश या परिसरात पाहायला मिळाला.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळंच ही घटना घडल्याचे गंभीर आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केले. प्रशासकीय यंत्रणांनीही या घटनेची दखल घेत खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटनेचा आढावा घेतला आहे. राज्य शासनाकडून या घटनेच्या तात्काळ चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील नेतेमंडळींनी भंडारा दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिलेल्या असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हळहळ व्यक्त केली.

*भंडारा जिल्हा रुग्णालय आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश*

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा