कासार्डे येथे वडिलांकडून दारूड्या मुलाची हत्या

कासार्डे येथे वडिलांकडून दारूड्या मुलाची हत्या

कणकवली

कासार्डे आयरेवाडी येथील रवींद्र उर्फ पांडुरंग भिकाजी आयरे याचा त्याचे वडील भिकाजी आयरे यांनी खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. घटनेनंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. याबाबत उपलब्ध माहितीनुसार पांडुरंग आयरे याला दारूचे व्यसन होते. त्याच्या नियमित त्रासाला कंटाळून त्याचे वडील भिकाजी राघू आयरे, वय वर्षे ६५ यांनी त्याचा खून केल्याची घटना घडली.

रवींद्र उर्फ पांडुरंग हा नियमित दारू पिऊन घरात वडिलांना शिवीगाळ करत असे. त्यामुळे ते स्वतंत्र राहत होते. पांडुरंग हा आपल्या पत्नीबरोबर सासरवाडीला गेला होता. तो घरी आल्यानंतर शिवीगाळ करू लागल्याने भिकाजी आयरे याने काठीने त्याला मारहाण केली. यात त्यांचा मुलगा रवींद्र उर्फ पांडुरंग हा घरासमोरील खळ्यात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. बुधवारी सकाळी भिकाजी याने याबाबत शेजार्‍यांना माहिती देत मुलगा पडल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले .

प्रतिक्रिया व्यक्त करा