*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूह सदस्य ज्येष्ठ लेखक अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*
*पायरी -एक आनंद*
एक सांगू का ,पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा मला आयुष्याची पलटणारी पानं ,खूप काही शिकवून जात असतात असं वाटत असतं . जीवनात येणारे यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात , असं कां कोणास ठाऊक पण आजकाल मला प्रकर्षाने वाटतं असतं हे मात्र खरं .
त्याचं झालं असं ,
मी नुकताच नाशिक हून पुण्याला आलो होतो . चार पाच दिवस झाले असतील .सकाळ संध्याकाळ फिरायला जायची एक सवय रिटायर्ड झाल्या पासून लागली होती . एक दोन माझ्या सारखीच फिरणारी माणसं थोडी ओळखीची पण झाली होती .म्हणून सवयी नुसार मी सकाळी फेरफटका मारायला निघालो . थोडं फिरून झालं व एका परिचीताने “या हो काका “ म्हणून हाक मारली . मी पण आपुलकीने जवळ गेलो . जुजबी गप्पा सुरू झाल्या . आणि एकाने “या , हो ! बसाकी “ म्हणत दुकानांच्या *पायऱ्यां* वर बसायचा हात धरून आग्रह केला . मी बसलोही ! खरंतर मला असं दुकानांच्या पायरी वर बसायची फारशी सवय नव्हती ( पण करतां काय ?)
गप्पाटप्पांच्या ओघात , मागे असलेल्या बंद दुकानाची एक आकर्षित पाटीने माझे लक्ष वेधून घेतलं . होय , त्यावर लिहीले होते “ येथे खात्रीशीर कोकणातला “पायरी आंबा “ मिळेल . आणि मग काय मी चमकलोच ! मित्रांना बाय बाय करत पावलं घराकडे वळायला लागली आणि “पायरी “ या शब्दावर आंब्या खेरीज विचार चक्र सुरू झालं . त्याचं काय आहे
पायरी हा शब्द वाचला ऐकलां की कुठेतरी एक नम्र भाव , नतमस्तक होणे असे काहीसेवाटतअसते .चढण्याची वा उतरण्याची क्रिया असो पायरी ही लागतेच नाही कां?प्रगतीच्या दिशेने असो वा अधोगतीच्या दिशेने माणूस वर चढतोय म्हणजे पायरी ही असणारच. प्रगतीच्या ठराविक पल्ल्यापर्यंत गेल्यावर अथवा कधीतरी त्या आधीच घसरणही लागते; जिथे आपला तोल सांभाळून पुन्हा उभे राहणे गरजेचे असते. ते जर नाहीच जमले तर कपाळमोक्ष ठरलेला. म्हणूनच पायरीवर पाय ठेवताना लक्षपूर्वक ठेवला गेला पाहिजे. तिची सोबत असतेच पण ती कशी आणि कशासाठी घ्यायची आहे ते ठरवणे ज्याच्या त्याच्या हातात असते. हो कधी असते हातात किंवा कधी नसतेही. एखादा चढता चढता कधी त्याच पायरीहून कोलमडत खाली येईल हे त्याचे त्यालाही कळत नाही.
देवळाची पायरी ही नेहमीच पुज्यनीय. पदस्पर्श करण्यापूर्वी आधी नमस्कार ठरलेलाच. एखाद्या डोंगरमाथ्यावर असणाऱ्या मंदिरात चढताना त्या पायरीवर तर कित्येक वेळा बसणे उठणे होते. या पायरी पायरीनेच चढून डोंगरावरचे प्रचंड ऊर्जा असणारे ,पावन वाटणारे, नयनरम्य दिसणारे वातावरण भारावून टाकते. केलेल्या परिश्रमाचे चीज होते. सगळा शीण निघून जातो.
शाळा कॉलेजच्या पायऱ्या ह्या ही ज्ञान मंदिराच्याच पायऱ्या. किती तरी वेळा त्यावर ये जा झालेली असते बसून अभ्यास झालेला असतो, काही मित्रमैत्रिणी सोबत गप्पा झालेल्या असतात. शिवा शिवीचा खेळ व त्यात धडपडणे तर नित्याचेच ! बरं त्याच्याही मागे जायचे झाले तर शाळेचा पहिला दिवस आठवला की ती पायरी चढलेला क्षणही आठवतो काही मुलं आवडीने चढतात तर काही डोळ्यात आसवं आणून भोकाड पसरत चढलेली असतात. ( आठवा आपआपला शाळेचा पहिला दिवस )माणसाच्या भाव भावनांशी पायरीचे नाते तेव्हा पासून घट्ट होण्यास सुरुवात होते. पायरी सांभाळून वागण्यासाठी ज्या पायरीची निवड करायची असते तिची सुरुवातही याच शाळेच्या पायरीपासून झालेली असते. कारण घरासोबत , शाळाच एक असे ठिकाण आहे जिथे संस्कार होत असतात. जिथे आयुष्यात उपयोगी पडणारे शैक्षणिक धडे शिकवले जातात गिरवले जातात ज्याने व्यक्तिमत्व घडण्यास मोठा हातभार लागतो. शाळेची पायरी आपल्याला आपली पायरी(लायकी) कोणती हे ठरविण्यास जास्तीत जास्त महत्वपूर्ण भूमिका निभावत असते .अर्थात बाहेरील जीवनात सुद्धा आपण शिकत असतोच तिथंही अनुभवाच्या पायऱ्या चढतो आणि उतरतो की.
सर्व साधारणपणे असे म्हंटले जाते की डॉक्टर आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये. मग ती वयानुसार तर सारखीच चढावी लागते !जे खूपच त्रासदायक असते पण खर्चीकसुद्धा असते. पण गरज पडली तर चढणे भागच ,दवाखान्याची पायरी चढावीच लागते. पण त्यात ही खूप (वेगळाच )आनंद दडलेला आहे . ती पायरीही एक नवी ओळख देते. सद्या तर ती मी जरा जास्तच घेत आहे !
चढलेल्या पायऱ्या कधी ना कधी उतराव्याही लागतात ! उतरतानाही मनात काही किंतु परंतु न आणता त्या मार्गाचे ही स्वागत करत उतरतानाची वेगळी धुंदी आपण अनुभवत असतो ,त्या त्या पायरीचे आभार मानत उतरत रहावे.. म्हणजे तो ही आनंद मानून घ्यावा. एकूणच काय सगळ्याच पायऱ्या काही ना काही शिकवत असतात एक ओळख देत असतात .
फक्त आपण लक्षपूर्वक पाहिले पाहिजे..म्हणजे तोल ढळण्याचा धोका टाळता येतो. टाळला जातो.
म्हणूनच पायरी पायरी जपून.
घराजवळ आलो आणि घरात शिरतांना अचानक् पहिल्याच पायरी ची ठोकर लागली , पडत असलेला तोल सांभाळला व जिन्याच्या ओळखीच्या पायऱ्या हळू हळू चढता झालो .
-अनिल देशपांडे