You are currently viewing स्मृति भाग ६१

स्मृति भाग ६१

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ६१*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

हे दीडदोन वर्षापूर्वीचे लिखाण आहे म्हणून काही शब्द तेंव्हाचे!😃😃🙏🙏

आषाढ सुरु होवून अकरा दिवस झालेत . नुकतीच कांदेनवमी गेली व आज देवशयनी एकादशी . नावातच सौंदर्य !! अहाहा ! देव झोपतात आज आणि कार्तिकीला उठतात ! काय कल्पना आहे ! एवढी रम्य कल्पना कोणत्या संस्कृतीत आहे ? ते का झोपतात व उठतात ? ते नंतर पाहू . पण कांदेनवमीला कांद्याची भजी अट्टाहासाने खाणारी माणसं भारतात आहेत ? का खावी ? आमच्याकडे म्हण आहे , *” आषाढ तळून खावा “* . का बरे ? नव्या पिढीला याचा गंध ही नाही !!! ***आषाढात तळलेले पदार्थ खाल्ले की पावसाळ्यात सर्दी व अतिसार होत नाहीत , असे पूर्वीच्या आजीबाया सांगायच्या आणि हसून तळलेल्या पदार्थांचा आग्रह करायच्या !! पण आम्ही पडलो विज्ञानवादी ना !! खायला मिळतंय मग कशाला विचारा प्रूफ ( प्रायोगिक तत्वावरची सत्यता ) दाखवा ?? खावून मोकळे सगळे जडवादी !!!! आम्हाला तृष्णा हवी का तृप्ती हवी ? हेच कळलं नाही ? मग ऋषि कसे समजतील हो !!!

आज दक्ष स्मृतितील शेवटचा ” योग ” विषयाचा अध्याय आपण बघणार आहोत . सर्व सामान्यांचे लक्ष एकदा का भोगावर केंद्रित झाले की मग त्यांना योग लक्षात येत नाही . लोकांना हेच कळत नाही की खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं ? सगळे घोटाळे इथेच होतात !! ” ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ” बस्सस् !! भोगून घ्या ! पुढे कुणी पाहिलं !! हेच संस्कार सगळ्या शाळांमधून या सत्तर वर्षात झाले व फक्त हव्यासापोटी कुणीही व्यास होणार नाही ! अशी तरतूद करुन ठेवली . भावजीवन जावून हावजीवन जगू लागलेत सगळे ! चर्चा फक्त पैशाची ! यात पूर्वी भारतात ” पैशाची ” नावाची भाषा होती ! हे भाषा तज्ञ म्हणवणारे ही विसरले ! अर्थ आणि कामाने धर्म आणि मोक्षाच्या पायात बेड्याच ठोकल्या . धर्माची जागा अधर्माने घेतली आणि अर्थाचे नादी लागत अनर्थ घडायला लागले !! असं का होतं ? याचं उत्तर माणसाचं ” दैवीजीवन ” संपुष्टात आलं ! भावजीवन संपुष्टात आलं ! हेच . कृतीत कृत्रीमता आली ! मनात भेद निर्माण केले गेले व खेदजीवन सुरु झालं !! आम्ही पूर्वी दात घासण्याला ” दंतधावनविधी ” म्हणायचो ! अंघोळीच्या घोळाला ” स्नानविधी ” म्हणायचो !! पण विधी शब्दाचा खरा अर्थ जावून “विधी” पुरताच अर्थ राहिला !!! कर्तृत्वाचा अर्थ स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्‍याची मुंडी पिरगळणे — असा झाला !! पापालाच पुण्य समजत रामजीवन जावून रावणीजीवन सुरु झाले !! पण या ही कराल काळात एक नरेन्द्र पुन्हा जन्मला भारत भूचे पोटी आणि सगळं जग त्याचे तालावर ” योग ” करु लागलं !!!! ज्यांनी ” योग ” जिवंत ठेवला त्यांचेमुळे हे घडलं !! प्रथमतः त्यांना त्रिवार वंदन . आता प्रजापति सुरवात कशी करतात ? ते पाहू .

 

*लोको वशीकृतो येन येन चात्मा वशीकृतः ।*

*इन्द्रियार्थो जितो येन तं योगं प्रब्रवीम्हहम् ॥*

ज्याद्वारे लोकांना वश केले जाते , ज्याद्वारे आत्म्यास वश केले जाते , ज्याद्वारे इन्द्रियांचे विषयांना जिंकुन घेतले जाते , मी त्या योगाचे प्रवचन करत आहे .

असे सांगून प्राणायाम , ध्यान , प्रत्याहार , धारणा , तर्क आणि समाधि हा सहा अंगांचा योग सांगितला आहे . पुढे कशाने योग सिद्ध होत नाही व कशाने होतो हे सांगतांना पुढील श्लोक येतो .

 

*सुप्तोSपि योगयुक्तः स्याज्जाग्रच्चापि विशेषतः ।*

*ईद्दक्चेष्टः स्मृतः श्रेष्ठो गरिष्ठो ब्रह्मवादिनाम् ॥*

जो झोपेतसुध्दा व जागेपणीसुद्धा योगाशी जोडलेला असतो , अशा प्रकारच्या चेष्टा ( हालचाली ) करणारा माणूस ब्रह्मवादींमध्ये श्रेष्ठ व गरिष्ठ मानला गेला आहे .

असे सांगत ” जो मनुष्य या संसारात आत्म्याशिवाय इतर काहीच पहात नाही , त्यास ” ब्रह्मीभूत ” संबोधले आहे .

आज पुरे करतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा