You are currently viewing स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उल्लेखनीय कामगिरी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उल्लेखनीय कामगिरी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उल्लेखनीय कामगिरी

सिंधुदुर्गनगरी

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पदाचा पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील अ- उघड गुन्हे उघडकीस आणण्यासह अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनाही आदेश दिलेले होते. पोलीस अधीक्षक याच्या सूचना व आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग व पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांचे नेतृत्वामध्ये सन-2023 मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण, अवैध धंद्यावर कारवाई, अंमली पदार्थ विरोधी कारवाई, अवैध शस्त्र कारवाई, पाहीजे / फरारी आरोपी शोध व अटक, नॉन बेलेबल वॉरन्टमधील आरोपींचा शोध घेवून त्यांना न्यायालयात हजर करणे, रेकॉर्डवरील आरोपींचे हालचालीवर लक्ष ठेवणे, अवैध गुटखा विक्री व वाहतुकीवरील कारवाई वगैरेमध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. सन- 2023 मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची व कारवाईची माहिती पुढीलप्रमाणे-

जिल्ह्यात दोडामार्ग, देवगड, सिंधुदुर्गनगरी, मालवण या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेले 4 खुनाचे गुन्हे 24 तासांच्या आत उघडकीस आणून त्यामध्ये सबळ पुराव्यानिशी 7 आरोपींना अटक केली. चार गुन्ह्यांपैकी देवगड पोलीस ठाणे हद्दीत मुणगे, मसवी तिठा या रोडवर अज्ञात आरोपींनी तरुण मुलाचा निघृणपणे खून करुन अपघात घडल्याचे भासविले होते. सदर संवेदनशील घटनेमुळे जनप्रक्षोप्र निर्माण झालेला होता. तो गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 12 तासांच्या आत उघकीस आणून आरोपीला पुराव्यानिशी अटक केली.

जिल्ह्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील 9 अ-उघड गुन्हे व चोरीच्या गुन्ह्यातील 15 अ- उघड गुन्हे उघडकीस आणून एकूण 21 आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी मोटार सायकल, मोबाईल, टी.व्ही., सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

कणकवली तालुक्यातील एका गावात शाळकरी 5 मुले व 1 मुलगी यांचे अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालक, मुले व शिक्षकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झालेले होते. सदर गुन्ह्याचा सखोल तपास करुन शाळकरी मुलांनीच अपहरण झाल्याचा बनाव केलेला असल्याचे उघडकीस आणून निर्भय वातावरण निर्माण केले.

सन 2023 मध्ये दारुबंदी अधिनियम अंतर्गत एकूण 107 गुन्हे दाखल करुन त्यामध्ये 115 आरोपीविरुद्ध कारवाई करुन 1,90,94,930/- रुपये (एक कोटी नव्वद लाख चौऱ्याण्णउ हजार नवशे तीस रुपये) किमतीची दारु व 1,20,25,000/- रुपये (एक कोटी वीस लाख पंचवीस हजार रुपये) किंमतीची 22 वाहने असा एकूण 3,11,19,930/- रुपये (तीन कोटी अकरा लाख एकोणीस हजार नवशे तीस रुपये) किंमतीचा दारु साठा जप्त केलेला आहे.

जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत एकूण 30 गुन्हे दाखल करुन त्यामध्ये 30 आरोपीविरुदध कारवाई करुन 69,295/- रुपये किंमतीची रोख रक्कम व जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आलेली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आलेले असून NDPS अॅक्ट अंतर्गत 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यात 10 आरोपींना अटक केली. आरोपींकडून 3,18,070/- रुपये (तीन लाख अठरा हजार सत्तर रुपये) किंमतीचा 4 किलो 646 ग्रॅम गांजा, 3 मोटार सायकल, मोबाईल, अंमली पदार्थ सेवनाचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

सिंधुदुर्ग, गोवा, बेळगांव या ठिकाणी एकूण 48 विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असणारा आंतरराज्यीय गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील, रा. साळ, गोवा याला कणकवली पोलीस ठाणे हद्दीत शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडून गावठी कट्टा, सिंगल बॅरल काडतूस बंदूक, ठासणीची बंदूक, कार, जिवंत काडतूसे, मोटार सायकल, विविध कंपनीचे मोबाईल, हातोडे, धारदार तलवारी, परदेशी नाणी, चांदीचे व सोन्याचे दागिने, रोख रक्कम, सोने वितळविण्याची मशिन, लगड बनविण्याचा साचा, कोयता, नोटा मोजण्याची मशिन वगैरे साहीत्यासह ताब्यात घेवून 30,48,784/- रुपये (तीस लाख अट्ठेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याचेविरुध्द प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या अवैध 3 बंदुका, 17 जिवंत काडतुसे, 1 वाहन, 12.930 कि.ग्रॅ. वजनाची खवले मांजराची खवले असा मुद्देमाल वेगवेगळ्या 2 कारवायांमध्ये ताब्यात घेवून एकुण 5 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांना अटक केलेली आहे.

व्हेल माशाची उलटी अवैध रित्या विकण्यासाठी आलेल्या एकुण 9 आरोपींवर कारवाई करुन त्यांच्याकडून 24.264 कि.ग्रॅ. वजनाची व्हेल माशाची मौल्यवान किंमतीची उलटी जप्त केली. तसेच सदर आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे.  शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटखा, तंबाखू व सुंगधीजन्य पदार्थांची अवैधरित्या विक्री, वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुध्द धडक कारवाई करुन 5 गुन्हे दाखल केलेले आहेत. पाचही गुन्ह्यात मिळून एकुण 19,43,728/- रुपये (एकोणीस लाख त्रेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये) किमतीचे गुटखा व सुंगधीजन्य तंबाखूचे पदार्थ तसेच 23,00,000/- रुपये किंमतीची 4 वाहने असा मुद्देमाल जप्त करुन 7 आरोपींवर कारवाई केलेली आहे.

अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करुन त्यामधून वाहतूक करीत असलेल्या 18 गायी व वासरांची सुटका करुन दोन्ही टेम्पो जप्त करण्यात आलेले आहेत. सदर प्रकरणात 4 आरोपीविरुदध कारवाई केलेली आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत वेश्या व्यवसायावर कारवाई करुन 3 महिलांची सुटका केली. तसेच वैश्या व्यवसाय करणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आलेली आहे.

पाहीजे रेकॉर्डवरील 2 आरोपींबाबत माहिती काढून, त्यांचा शोध घेवून त्यांना अटक करण्यात आलेले आहे. तसेच पाहीजे आरोपी व फरारी आरोपी यांचा शोध घेणेसाठी तसेच त्यांचेवरील केसेसबाबत न्यायालयातून माहिती घेवून आरोपी कमी करणे / अटक करण्याबाबत विशेष मोहिम राबवून रेकॉर्डवरील एकूण 7 पाहीजे आरोपी व 7 फरारी आरोपींचा शोध घेवून / न्यायालयातील रेकॉर्डची खात्री करुन कमी / अटक करण्यात आलेली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंतर्गत गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी ट्रायल मॉनिटरींग सेलची स्थापना केलेली असून जिल्हा न्यायालयामध्ये संवेदनशील व गंभीर गुन्ह्यांमध्ये एकूण 15 खटल्यांमध्ये 18 गुन्हेगारांना शिक्षा झालेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा