You are currently viewing वॉर्नर-स्टब्सच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे दिल्लीचा पराभव

वॉर्नर-स्टब्सच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे दिल्लीचा पराभव

पंजाबचा चार गडी राखून विजय, सॅम कुरनची अर्धशतकी खेळी

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा चार गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ९ गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने १९.२ षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. सॅम कुरनने अर्धशतक झळकावले. त्याचवेळी लियाम लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ३८ धावांची खेळी केली. त्याने शेवटच्या षटकात षटकार मारून सामना संपवला. आयपीएलच्या १७ व्या मोसमाची पंजाबने विजयाने सुरुवात केली, तर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने पराभवाने सुरुवात केली. या विजयासह पंजाब गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्यांचे दोन गुण आहेत. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्ज दोन गुणांसह आणि चांगल्या नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली संघाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी ३९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी अर्शदीप सिंगने भेदली. त्याने मार्शला राहुल चहरकरवी झेलबाद केले. मार्शने १२ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २० धावांची खेळी खेळली. यानंतर वॉर्नरने शाई होपसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. वॉर्नर २१ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९ धावा करून बाद झाला. होपने २५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३३ धावांची खेळी केली. त्याचवेळी १५ महिन्यांनंतर पुनरागमन करणारा पंत १३ चेंडूत १८ धावा करून बाद झाला.

त्यानंतर रिकी भुई तीन धावा करून बाद झाला, ट्रिस्टन स्टब्स पाच धावा करून आणि सुमित कुमार दोन धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने १३ चेंडूत २१ धावांची खेळी केली. दिल्लीने १४७ धावांत आठ विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या अभिषेक पोरेलने हर्षल पटेलच्या २०व्या षटकात २५ धावा केल्या. त्याने १० चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या. पोरेलने २० व्या षटकात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटच्या चेंडूवर कुलदीप दोन धावा काढून धावबाद झाला. १९व्या षटकापर्यंत दिल्लीची धावसंख्या आठ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावा होती आणि पोरेलच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर संघाने १७४ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून अर्शदीप आणि हर्षलने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर रबाडा, हरप्रीत आणि राहुल चहर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

१७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाची सुरुवात वेगवान झाली, मात्र ३४ धावांवर पहिला धक्का बसला. इशांत शर्माने कर्णधार शिखर धवनला त्रिफळाचीत केले. त्याला २२ धावा करता आल्या. त्याचवेळी जॉनी बेअरस्टो नऊ धावा करून धावबाद झाला. प्रभसिमरन सिंग २६ धावा करून तंबूमध्ये परतला. जितेश शर्मा नऊ धावा करून बाद झाला. यानंतर सॅम कुरन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. कुरनने आयपीएल कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले.

खलीलने ही भागीदारी भेदली. त्याने १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कुरनला त्रिफळाचीत केले. कुरनने ४७ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६३ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी पुढच्याच चेंडूवर खलीलने शशांक सिंगला यष्टिरक्षक पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हरप्रीत ब्रारने झेल घेतला, पण वॉर्नरचा झेल चुकला. याआधी ट्रिस्टन स्टब्सनेही कुरनचा सोपा झेल सोडला होता. त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि सामनाही निसटला. शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी सहा धावांची गरज होती. पदार्पण करणारा सुमित गोलंदाजीला आला आणि त्याने सुरुवातीला दोन वाइड चेंडू टाकले. लिव्हिंगस्टोनला पहिल्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही, पण दुसऱ्या चेंडूवर लागोपाठ षटकार मारत पंजाब संघाला विजयापर्यंत नेले. दिल्लीकडून खलील आणि कुलदीपने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर, इशांतला एक विकेट मिळाली.

सॅम करनला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा