You are currently viewing आनंद शोधताना ” या लेखसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न

आनंद शोधताना ” या लेखसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न

“आनंद शोधताना ” या लेखसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)

दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी , मू़ळचे नागपूरचे पण आता प्राधिकरणात स्थायिक झालेले प्रसिद्ध
लेखक श्री.वसंतराव देशपांडे यांच्या ” आनंद शोधताना ” या लेख संग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सावरकर सदन, कॅप्टन कदम सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध लेखक,चिंतक श्री भारत सासणे यांच्या हस्ते झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी शब्दरंगचे संस्थापक अध्यक्ष, प्रसिद्ध निवेदक श्री. चंद्रशेखर जोशी होते. व्यासपीठावर माननीय दीपक चैतन्य, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे अतिथी व्याख्याता तसेच विसा बुक्स, नागपूरचे प्रकाशक माननीय विनोद लोकरे हे साहित्यीक उपस्थित होते.
शब्दरंग कला साहित्य कट्टा निगडी, या संस्थेने याचे संयोजन केले होते. माननीय माधुरी ओक यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
श्री. देशपांडे यांच्या पत्नी सौ. नम्रता व कन्या सौ. अनुश्री दातार, नाबार्ड चे रमाकांत कुळकर्णी, श्रीकांत देशपांडे,सुभाष भंडारे, विलास करवीर, हेमंत सोनगडकर व लायन्स क्लब चतुःश्रृंगीचे नागेश चव्हाण, तसेच शब्दरंगचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि अनेक साहित्य प्रेमी या प्रसंगी उपस्थित होते.

श्री सरस्वतीच्या पूजनानंतर पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकात श्री लोकरे ह्यांनी वसंत देशपांडे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला ज्यात ह्या कथासंग्रहात प्रथम आवृत्तीचे वेळी झालेल्या प्रसंगाची आठवण जागी केली.
तदनंतर सौ. पल्लवी कोंडेकर ह्यांनी लेखकाचा विस्तृत परिचय करून दिला.
आपले मनोगत व्यक्त करतांना वसंत देशपांडे ह्यांनी आपल्या आईची आठवण काढत तिच्या प्रोत्साहनाचा विशेष उल्लेख केला व अन्य साहित्यिक जसे राम शेवाळकर ह्यांच्या साहित्याचा प्रभाव देखील अधोरेखित केला.
आपल्या भाषणात श्री दीपक चैतन्य ह्यांनी श्री देशपांडे ह्यांच्या सोबतच्या दिवसांची स्मृती जागवतच श्री भारत सासणे ह्यांच्या उत्तुंग साहित्य साधनेचा परिचय देताना त्यांच्या चतुरस्त्र लेखनावर प्रकाश टाकला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करताना ते सर्वानुमते करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. भविष्यात देखील ही परंपरा कायम रहावी असे विचार प्रकट केले.
प्रमुख पाहुणे श्री भारत सासणे ह्यांनी वसंत देशपांडे यांच्या “आनंद शोधताना” ह्या कलाकृतीचा प्रकरणावर आलेख अत्यंत कुशलतेने मांडला व परदेशी त्तत्वचिंतक बर्ट्रांड रसेल ह्यांच्या लिखाणात असलेल्या अनेक क्लिष्ट बाबी खुबीने उदघृत केल्याबद्दल देशपांडे ह्यांचे कौतुक केले. सोबतच अशा प्रकारच्या कथांना कादंबरीचे कोंदण देण्याची सुचना केली. आनंद शोधताना हे
एक उत्तम चिंतनपर पुस्तक हा कौतुकास्पद प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री चंद्रशेखर जोशी ह्यांनी आपल्या आईचा उल्लेख करत श्री देशपांडे ह्यांनी मातृऋणाचा वारसा चालवला ह्याबद्दल गौरवोद्गार काढले तर भविष्यात अशाच प्रकारच्या लेखनाने “शब्दरंग” चे व्यासपीठ समृद्ध करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शब्दरंग संस्थेच्या विविध उपक्रमांना प्रसिद्धी देणारे पत्रकार बाबू डिसोजा कुमठेकर यांचा यथोचित सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला.
सौ. माधुरी वैद्य डिसोजा कुमठेकर यांनी साहित्यिक मा. सासणे यांनी कथा कार्यशाळेत चांगले मार्गदर्शन केले. त्यानंतरच मला प्रोत्साहन मिळाल्याने माझा कथासंग्रह प्रकाशित झाला , असे मनोगतात आवर्जून सांगितले.
आभार प्रदर्शनात सौ संपदा पटवर्धन ह्यांनी देखील सर्व वक्त्यांनी केलेल्या सूचनांचा गोषवारा प्रस्तुत करुन सगळ्यांची वाहवाही मिळविली.
पसायदानाच्या सामूहिक गायनाने समारंभाचे समापन झाले.
(सर्व फोटो सौजन्य-आनंदराव मुळुक)

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + two =