You are currently viewing मडूरेत काजू बागायतीला आग लागून १५० कलमे भस्मसात

मडूरेत काजू बागायतीला आग लागून १५० कलमे भस्मसात

मडूरेत काजू बागायतीला आग लागून १५० कलमे भस्मसात

बांदा

मडुरा डिगवाडी येथील काजू बागायतीला मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. भर दुपारची वेळ व सोसाट्याचा वारा यामुळे आगीवर नियंत्रण मिळण्यात ग्रामस्थांना अपयश आले. पाईप लाईनचे काम करणाऱ्या स्वस्तिक कन्स्ट्रक्शनच्या सहकार्यामुळे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरवेळी प्रमाणेच सावंतवाडी नगरपरिषदेचा बंब आग विझविल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

मडूरा डिगवाडी येथील काजू बागायतीला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत नामदेव वेंगुर्लेकर, बाळकृष्ण प्रभू, नाना वेंगुर्लेकर या शेतकऱ्यांची एकत्रितपणे सुमारे १५० हून अधिक काजू कलमे आगीत होरपळली. आग लागल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र दुपारची वेळ असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या.

माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद, बांदा पोलीस स्टेशन यांना आगीची कल्पना दिली. तिलारी पोट कालव्याचे काम करणाऱ्या स्वस्तिक कंट्रक्शनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाण्याचा बंब घटनास्थळी देऊन सहकार्य केले. त्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

सावंतवाडी नगरपरिषदेचा बंब सायंकाळी उशिरा पाच वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाला. मात्र, त्याआधीच ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवले होते. बांदा पोलिसही उशिराने दाखल झाले. मडूरा तलाठी श्री. मुळीक यांनी नुकसानीची पाहणी केली. प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत प्रकाश वालावलकर यांनी संताप व्यक्त केला. आग विझविण्यासाठी बाळकृष्ण प्रभू, श्रीधर प्रभू, प्रकाश वालावलकर, उत्तम वालावलकर, नाना वेंगुर्लेकर, नामदेव वेंगुर्लेकर, उल्हास वालावलकर, भूषण प्रभू, मंदार वालावलकर, घनश्याम वालावलकर, सागर धुरी, प्रतीक वालावलकर आदींसह ग्रामस्थांनी सहकार्य केले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा