You are currently viewing शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे साहित्यिक श्री. दीपक पटेकर

शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे साहित्यिक श्री. दीपक पटेकर

*सौ.प्रतिभा पिटके, अमरावती*

 

 

जगात काही लोक असे असतात की, ज्यांना सर्व सुखसुविधा जन्मापासूनच उपलब्ध असतात. पण काही लोक असेही असतात की; ज्यांना लहानपणापासूनच संघर्षाशी दोन हात करावे लागतात. काहीना जगण्यासाठी आवश्यक त्या प्राथमिक सुविधाही सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. याचे साधारणपणे दोन परिणाम पाहायला मिळतात. एकतर त्यांचे संपूर्ण जीवन दुःखी, अपयशी होते; त्यांचा जीवनावरील विश्वासच उडून जातो. किंवा काही असेही असतात की; जे खंबीरपणे संकटांना सामोरे जात आपला मार्ग आपणच शोधून पुढे जात राहतात. “प्रयत्नांती परमेश्वर” ह्या न्यायाने ते स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठतात! आज अशाच एका ध्येयवेड्या व्यक्तीची तुमच्याशी ओळख करून देतांना मला आनंद होत आहे.

श्री दीपक पटेकर हे पेशाने बांधकाम व्यावसायिक (सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर) असले तरी अतिशय सहृदय असलेले कविमनाचे प्रसिद्ध साहित्यिक आहेत. चला तर आज तुम्हाला मी त्याच्या जीवनातील संघर्ष यात्रेबद्दल थोडीशी ओळख करून देणार आहे.

त्यांच्या वडिलांचा बांधकाम व्यवसाय. जिथे काम असेल तिथे ते जात असत. त्यामुळे सतत फिरतीवर रहावे लागे. कुटूंब चालविण्यासाठी पैसा हा अति आवश्यक घटक! फिरतीच्या व्यवसायामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून आईवडिलांनी त्यांना सव्वा वर्षांचे असतांनाच आजोबांकडे ठेवले. आठ वर्षाचे होईपर्यंत त्यांना आईवडीलांपासून दूर राहावे लागले. मुलांना ज्या वयात सगळ्यात जास्त गरज आई बाबाची, विशेषतः आईची असते; पण परिस्थितीमुळे दीपकजीना दुर्दैवाने हे सुख मिळू शकले नाही. सव्वा वर्षाच्या असल्यापासून त्यांच्या मावशीने आईप्रमाणे त्यांचा सांभाळ केला. आजी आजोबा, मामांनी खूप लाड पुरविले. परंतु आईच्या प्रेमाला आसुसलेल्या त्या बाळ जीवाला किती यातना होत असतील!! ज्यांच्यावर सतत आईच्या मायेच्या पदराची सावली असते त्यांना हे दुःख कसे कळणार? नंतर आईवडील सावंतवाडीत आले; तेथेच त्यांनी स्वतःसाठी घर बांधले. जीवनाला थोडी आर्थिक स्थिरता आल्यावरती त्यांनी आपल्या मुलाला आपल्यापाशी आणले. तोपर्यंत दीपकजींचे दुसरीपर्यंतचे शिक्षण आजीपाशी देवगड तालुक्यातील वाडा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. आपल्या कुशाग्र बुद्धीमुळे व नम्र स्वभावाने ते शाळेतील सर्व शिक्षकांचे आवडते विद्यार्थी होते. परिस्थिती ही मनुष्याच्या जीवनातील मोठीच पाठशाळा असते हे सत्य आपण नाकारू शकत नाही.

सावंतवाडीत आल्यावर कुटूंबाचे प्रेम तर मिळालेच पण शिक्षणाची गाडीही चांगल्या प्रकारे रुळावर आली. मिलाग्रीस ही जिल्ह्यातील नावाजलेली शाळा! या शाळेत त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण उत्तम प्रकारे झाले. अकरावीत त्यांनी श्री.पंचम खेमराज महाविद्यालयात सायन्स शाखेत प्रवेश घेतला. अभ्यासाची व विज्ञान विषयाची आवड असल्याने दीपकजीनी रसायनशास्त्र शाखेत पदवी मिळविली. पुढे एमएस्सी करता आले असते, परंतु घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने शिकण्याची आवड व बुध्दीमत्ता असूनही आपल्या इच्छेला मनात ठेवून नोकरी करून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. तिथे पाच साडेपाच वर्षे मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील मे.दमानी शिपिंग कंपनीत क्लार्क म्हणून नोकरी केली. परंतु मुंबईत स्वतःचे निवासस्थान असल्याशिवाय पर्याय नसतो. दुसऱ्याच्या घरी किती वर्षे राहणार..? शेवटी “गड्या आपला गाव बरा” म्हणत पुन्हा गावची वाट धरली. गावी वडिलांसोबत वडिलांचाच बांधकाम व्यवसाय पुढे चालवितानाच आंबोली, ता.सावंतवाडी येथे नवीन आयुर्वेदिक सेंटर होणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. व्यवसाय करण्यापेक्षा सायन्स शिकलोच तर त्याच्याशी निगडीत नोकरी करावी म्हणून तिथे भेट घेतली. त्या संस्थेतर्फे कोइंबतूर येथील “आर्य वैद्य फार्मसी” (AVP) या अतिशय नावाजलेल्या आयुर्वेदिक संस्थेमधून पंचकर्म, थेरापिस्ट हा कोर्स पूर्ण केला. कोर्स केल्यानंतर गावाजवळच चांगले काम मिळणार या उद्देशाने त्यांनी कोर्स केला. पण झाले उलटेच! अंतर्गत कलह व राजकारण ह्यामुळे हे सेंटर सुरू होण्याआधीच बंद पडले! त्यामुळे पुन्हा त्यांच्या समोर प्रश्नचिन्ह उभे राहिले. सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग कसे करणार..? त्यामुळे पुन्हा त्यांनी बांधकाम व्यवसाय करण्याचे ठरविले. अथक प्रयत्न, जिद्द, चिकाटी ह्या त्यांच्या नैसर्गिक गुणामुळे लवकरच त्यांनी समाजात सिव्हिल काँट्रॅक्टर म्हणून चांगले नाव कमावले ! अशा प्रकारे विज्ञान शाखेचा हा तरुण पदवीधर दगड, विटा, माती, रेती ह्यात पूर्णपणे गुंतला. इथे हे सांगितले पाहिजे की दीपकजीना लहानपणापासून साहित्याची आवड होती. विद्यार्थी दशेत ते चारोळ्या , कविता लिहीत. परंतु पुढे नोकरी, व्यवसायामुळे त्यांना हा छंद जोपासता आला नाही. आपली आवड बाजूला सोडून त्यांनी स्वतःला पूर्णपणे बांधकाम व्यवसायात गुंतवून घेतले होते.

“असतील शिते तर जमतील भुते” या न्यायाने त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळू लागली. मामीचीच एक लहान बहीण लग्नाची होती. मामीने पुढाकार घेतला, लग्न ठरले. दीपकजीची लहान बहीण वैभवी हिला देखील आपल्या मामीची बहीण वहिनी म्हणून खूप आवडली होती. आपल्या लाडक्या बहिणीच्या आग्रहाखातर व सगळ्यांच्या संमतीने हा कौटूंबिक विवाह सोहळा आनंदात पार पडला व नलिनी मांजरेकरचा पटेकरांच्या घरात “पूजा” नावाने गृहप्रवेश झाला. पुजाताईंच्या पावलांनी घरात लक्ष्मीचाच प्रवेश झाला. जीवनाला आर्थिक स्थिरता येऊ लागली. तसे पाहिले आजपर्यंत दीपकजीनी लहान पणापासूनच संघर्षाला तोंड दिले आहे.

शिक्षण, बुद्धीचातुर्य सगळे असतांना चांगली नोकरी न मिळाल्याने वडिलांसोबत बांधकाम व्यवसाय सुरु केला, प्रसंगी रस्त्यावर गवंड्यासोबत चिरे उचलण्याचेही काम केले, बांधकाम, प्लास्टर, फरशी फिटिंग अशीही कामे केली. संघर्षमय अशा या काळात एखादा पार कोलमडून गेला असता, पण दीपकजीना माहीत होते “लहरोसे डरकर नौका पार नही होती — कोशीश करनेवालोकी कभी हार नही होती…”

आपल्या मेहनतीवर त्यांचा पूर्ण विश्वास असल्याने हे ही दिवस संपले, मागे गेले व बिल्डर्स डेव्हलपर्स म्हणून त्यांना नवीन ओळख मिळाली. अलिकडेच छोट्या बंधूसोबत सावंतवाडीतच “पटेकर्स–फ्रेशमार्ट” असे नविन सुपर मार्केट सुरू केले आहे. प्रामाणिकपणा, चिकाटी व आपल्या कामावर श्रद्धा यामुळे सावंतवाडीत पटेकर सगळ्यांच्या विश्वासाचे झाले आहेत. जीवनाला एक दिशा मिळाली आहे. १९७३ साली जन्म झालेल्या या तरुणाने लहान वयातच मोठमोठ्या दुःखाला तोंड दिले आहे. एकतर आर्थिक स्थिरता नव्हती, फक्त कष्ट व वणवण अशातच पत्नीच्या पहिल्या प्रसूतीच्या वेळी तिचे बाळ पोटातच मरण पावले. ह्या दुःखद घटनेने हृदय विव्हल झाले, कधीही न विसरता येणारे हे दुःखही त्यांनी पचविले.

कोरोना काळात सगळी कामे ठप्प होती अशातच त्यांचा जुना मित्र राजेश ह्यानी संवाद मीडिया विषयी माहिती दिली. राजेशला दीपकजीची साहित्याची आवड माहिती होती. राजेशजींच्या आग्रहाने व लिखाणाची आवड यामुळे त्यांनी संवाद मीडियाचे काम सुरू केले; त्यांचे ललितलेख, कवितांना आता प्रसिद्धी मिळू लागली. कवी मनाच्या ह्या तरुणाच्या सुप्त गुणांना चांगले व्यासपीठ मिळाले होते. सध्या ते संवाद मीडियाचे कार्यकारी संपादक आहेत. अतिशय कुशलतेने ही जबाबदारी ते पार पाडत आहेत. त्यांची हुशारी; काम करण्याची पद्धत यामुळे लवकरच त्यांची लोकप्रियता वाढली. सध्या ते कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी कार्यकारिणीचे सदस्य आहेत. २०२२ मध्ये सावंतवाडीत झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या “तुतारी” काव्यसंमेलनाचे ते उद्घाटक सुद्धा होते. त्यांच्या साहित्य सेवेची ही पोच पावतीच होती. पुणे येथे अलीकडेच झालेल्या पुस्तक प्रकाशन व गझल मुशायरा कार्यक्रमात ते निमंत्रित मान्यवर होते.

“वीज ग्राहक संघटना, सिंधदुर्ग” ही जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे प्रश्न सोडविणारी संघटना असून दीपकजी तेथे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात.

साहित्यिक क्षेत्रातील त्यांची प्रगती पाहिली तर दगड, विटा, सिमेंट हेच कार्यक्षेत्र असलेल्या श्री दीपक पटेकरांविषयी आत्मीयता वाटू लागते. लालित्य नक्षत्रवेल समूहाचे ते यशस्वी समूह प्रशासक आहेत. या समूहात प्रस्तुत प्रातिनिधिक कथासंग्रह “शब्दगंध” मध्ये त्यांची कथा प्रकाशित झाली आहे. “रामायणातील पात्रे” या प्रातिनिधिक ललित संग्रहात ललितलेख प्रसिद्ध झाला आहे.

दरवर्षी संवाद मीडियाच्या संवाद दिवाळी अंकाचे ही ते अतिशय कुशलतेने संपादन करतात. विविध वृत्तपत्रे, साप्ताहीक, अंक, मासिके, साहित्य समूहात त्यांचे सामाजिक, ललित लेख, कविता, गझल प्रकाशित होतात. हे सांगूनही खरे न वाटणारे सत्य आहे, “कवितेचा दीपक” हा त्यांच्या कवितेवरचा कार्यक्रम ! साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव ता.सावंतवाडी या साहित्यिक संस्थेने घेऊन एकप्रकारे त्यांचा गौरव केला आहे.

राज्यस्तरीय लेख, काव्य स्पर्धेत त्यांना उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट अशी पारितोषके मिळाली आहेत.

“अलक पुणेरी आवाज” या कार्यक्रमात त्यांनी बऱ्याच अलक सादर केल्या आहेत.

साहित्यिकांच्या साहित्य सेवेला दाद मिळाली तर त्यांच्या हातून अधिकाधिक चांगली साहित्यकृती निर्माण होते ! हे जाणून त्यांनी नवोदितांना “संवाद मीडिया” हे प्रसिद्धी करिता व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. स्वतः त्यांनी आजपर्यंत पाचशेपेक्षाही जास्त कविता, कथा, अनेक लेख लिहिले आहेत. ते चांगले गझलकार आहेत. विविध काव्यसमेलनात त्यांनी सादर केलेल्या कविता, गझलांना श्रोत्यांची विशेष पसंती लाभली आहे. सामाजिक विषयावरील त्यांचे लेख वाचले तर त्यांच्या निरीक्षण शक्तीचे कौतुक वाटते. सामाजिक विषयांवर अनेक लेख लिहून समाजप्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले आहे. स्पर्धा परीक्षक म्हणूनही ते परिक्षणाचे कार्य करतात. या संदर्भात त्यांची एक आठवण वाचकांना सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. एका साहित्यिक समूहात मध्यंतरी एक अभंग स्पर्धा झाली. त्यात त्यांनी स्पर्धेत अभंग तर लिहिला, पण वर “स्पर्धेसाठी” असे न लिहिता “सदिच्छा रचना” असे लिहिले. मी त्यांना विचारले की; तुमचा अभंग खूप छान झाला आहे, तरी सदिच्छा रचना असे का लिहिले?

त्यावर त्यांचे उत्तर प्रसिद्धीसाठी हपापलेल्या तथाकथितासाठी एक खणखणीत चपराक आहे !

ते म्हणाले “ताई, ज्या समूहात मी अनेकदा परिक्षकांचे काम केले, तेथे स्पर्धक म्हणून मी कसे काय लिहू शकतो..? असे लिहिणे मला उचित वाटत नाही!” यावरून त्यांची निस्पृहता मला जाणवली. अतिशय सच्चा मनाचा हा कवी एक प्रामाणिक उद्योजक, आईवडिलांचा चांगला मुलगा, कुटूंबप्रमुख म्हणून व एकुलत्या एक लेकाचा — “निमिषचा” चांगला पिता आहे. जे जे साहित्य आवडते; त्यांना संवाद मीडिया मध्ये स्थान देऊन नवोदितांना ते प्रोत्साहन देतात! लिहित्या हाताना प्रसिद्धी देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम ते सदोदित करत राहतात. कणकवलीचे जेष्ठ गझलकार कै मधुभाई नानिवडेकर यांचे कडून त्यांना गझलेची प्रेरणा मिळाली. उत्तम कवी लेखक म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच, सगळ्यांना परिचित असलेले जेष्ठ गझलकार विजो( विजय जोशी) हे त्यांचे गझल गुरू नंतर डॉ. रे. भा. भारस्वाडकर यांचेकडूनही त्यांनी गझल लिहिण्याचे धडे घेतले.

दीपक पटेकराबद्दल लिहिताना मला आनंद यासाठी होतो की, त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. अप्रिय प्रसंगांनी न घाबरता त्यांनी आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर सावंतवाडीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अशा या ध्येयवेड्या कविमनाच्या तरुण दीपकजीना माझ्या खूप खूप शुभेच्छा! पुढील काळातही त्यांची प्रगती अशीच होत राहील ही मला खात्री आहे.

 

सौ.प्रतिभा पिटके

अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 17 =