You are currently viewing अखेर त्या कोरोना पॉझिटिव्ह मृत महिलेवर गावात करण्यात आले अंत्यसंस्कार

अखेर त्या कोरोना पॉझिटिव्ह मृत महिलेवर गावात करण्यात आले अंत्यसंस्कार

तीन दिवस मृतदेह बेदखल करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा गावकऱ्यांनी केला निषेध.

वैभववाडी :

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या त्या महिलेवर शुक्रवारी तिथवली गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शासन आणि प्रशासनाचा योग्य समन्वय नसल्यामुळे गेली तीन दिवस त्या महिलेचा मृतदेह ओरोस येथील शवागृहात बेदखल होता. गावातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर हा पेच सुटला. शासकीय यंत्रणेच्या सावळागोंधळ कारभारामुळे दिशाहीन झालेल्या त्या महिलेच्या नातेवाईकांना खरा आधार गावकऱ्यांचा मिळाला. त्या कुटुंबाने तिथवली ग्रामस्थांचे आभार मानले.
तिथवली तावडेवाडी येथील त्या महिलेचे बुधवारी कोरोनामुळे खासगी रुग्णालयात निधन झाले होते. शासकीय नियमानुसार पुढील सोपस्कार करण्यासाठी खासगी रुग्णालयांने मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांनी नेमण्यात आलेल्या खाजगी प्राधिकरणाशी संपर्क साधला. मात्र प्राधिकरणाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात स्थानिक लोकांचा विरोध असल्याची बाब नातेवाइकांना सांगितली. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. प्रशासनाने या विषयात हात झटकले. मृतदेहावर अंत्यसंस्कार वेळेत होऊ न शकल्याने ते कुटुंब गेले तीन दिवस अस्वस्थ झाले होते. त्या वाडीतील स्मशानभूमी अडचणीच्या ठिकाणी असल्याने तिथे गाडी जाऊ शकत नव्हती. मग तो मृतदेह तिथपर्यंत न्यायचा कसा. आणि नेणार कोण. असा प्रश्न ग्रामस्थांना समोर निर्माण झाला होता. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी त्या कुटुंबाला धीर देत गावात बैठक घेतली. त्या बैठकीत वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, पं. स.सदस्य हर्षदा हरयाण, माजी सभापती बाळा हरयाण, सरपंच सुरेश हरयाण, संतोष हरयाण, सखाराम मंचेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. त्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी गावात रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे बैठकीत ठरले. निर्णय झाला परंतु ओरोस वरून तो मृतदेह आणायचा कसा. त्याचे अंत्यविधी करणार कोण? हा प्रश्न पुढे आला. याबाबत श्री. काझी यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सरचिटणीस प्रभाकर सावंत यांना याबाबत माहिती दिली. भाजपच्या या जोडगोळीने यातून मार्ग काढला. मृतदेह नेण्यासाठी चार व्यक्ती उपलब्ध करून दिली. अखेर त्या चार व्यक्तींनी शुक्रवारी दुपारी त्या महिलेवर गावात येवून अंत्यसंस्कार केले.

कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ तोडगा काढावा. नाहीतर मृतदेह अधिकार्‍यांच्या दालनात नेवून ठेवण्याची वेळ येईल. असा संताप तिथवली ग्रामस्थांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा