You are currently viewing आंबडोस ग्रामपंचायत सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर गावात साजरे होणार विविध कार्यक्रम – राधा वरवडेकर

आंबडोस ग्रामपंचायत सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर गावात साजरे होणार विविध कार्यक्रम – राधा वरवडेकर

आंबडोस ग्रामपंचायत ५० व्या वर्षात करत आहे पदार्पण

सिंधूदुर्गनगरी
ग्राम स्वच्छ्ता अभियानसह विविध अभियानात राज्यस्तरावर यश मिळविलेल्या मालवण तालुक्यातील आंबडोस ग्राम पंचायतीच्या स्थापनेला २० डिसेबर रोजी ४९ वर्षे पूर्ण झाली असून ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम साजरे करण्यात येणार असल्याचे सरपंच राधा वरवडेकर यानी जाहिर केले. याचे औचित्य साधत माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी व अन्य व्यक्तीचा यथोचित सत्कार करण्यात आला. यानिमित्त सकाळच्या सत्रात ग्राम पंचायत भवनमध्ये गणेश पूजन हा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर गावांतील प्राथमिक शाळामधील मुलाना शैक्षणिक भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. त्यानंतर मालवण ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णाना फळ वाटप सरपंच सौ वरवडेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. दुपारच्या सत्रात ग्राम पंचायत भवनमधील सभागृहात कोरोनाचे नियम पाळत गेल्या ४९ वर्षात गावाच्या जडण घडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तीचा जाहिर सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच सौ वरवडेकर, उपसरपंच भारती आयरे, ग्रामसेवक महेंद्र मोरे, सदस्य विशाल धुरी, दयानंद पाटकर, शुभांगी कदम, विजया साळगावकर, बाबू परब उपस्थित होते. माजी सरपंच रमेश परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी सरपंच दिगंबर नके, माजी उपसरपंच रामचंद्र मराळ, अनंत कदम, तसेच वैद्य बाळा पवार, शशिकांत नाईक, प्रसिद्ध दशावतारी कलाकार ओमप्रकाश चव्हाण आदिंसह अन्य ग्रामस्थ, माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच अंगणवाडी सेविका, शाळा इमारतींसाठी मोफत जमीन देणारे मालक, माजी ग्राम सेवक, माजी कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्प देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गावातील गुणवंत व्यक्ती, स्वच्छ्ता अभियानमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्ती, पत्रकार यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक धानजी चव्हाण यानी केले. यावेळी बोलताना सरपंच सौ वरवडेकर यानी, ग्राम पंचायतच्या सर्व कार्यकारिणीची हा कार्यक्रम मोठ्या स्वरुपात घेण्याची इच्छा होती. परंतु कोरोनामुळे ग्रामसभा घेण्यास बंदी आहे. त्यामुळे पूर्ण गावाला घेवून नियोजन करता आले नाही. तरीही पहिल्या टप्प्यात गाव घडण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तीचा सन्मान करण्याचे ठरविले. सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम येथेच थांबणार नाही. वर्षभर कार्यक्रम सुरु राहणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव संपल्यावर पूर्ण गावाला घेवून याचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. हे आहेत सत्कार मूर्ती साळेल ग्राम पंचायत पासून आंबडोस ग्राम पंचायतची २० डिसेबर १९७० रोजी स्वतंत्र निर्मिती झाली. यावेळी पहिले सरपंच होण्याचा मान गोविंद आरेकर यांना मिळाला. त्यानंतर दूसरे सरपंच अनंत भिकाजी परब झाले. तीसरे सरपंच बाबाजी उर्फ नाना करावडे झाले. हे तिन्ही सरपंच हयात नसल्याने त्यांच्या नातेवाईकानी सन्मान स्वीकारला. यानंतर रमेश परब, दिलीप परब, विष्णु परब, दिगंबर नके असे सरपंच झाले असून विद्यमान राधा वरवडेकर यांना पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. तसेच उपसरपंच म्हणून रामचंद्र मराळ, दिगंबर नके, अनंत कदम यानी पद भूषविले असून विद्यमान भारती आयरे या सुद्धा पहिल्या महिला उपसरपंच आहेत. या सर्वांचा यावेळी गौरव करण्यात आला. उपस्थित नसलेल्या व्यक्तीचा सन्मान घरी पोहोच केला जाणार असल्याचे सौ वरवडेकर यानी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 3 =