You are currently viewing स्मृति भाग ४५

स्मृति भाग ४५

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ४५*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आता आपण पुन्हा मूळ पदावर येवू . *शङ्खस्मृतितील* सातव्या अध्यायाचा विचार करत असतांना ब्राह्मण व्याख्येच्या पुढे प्राणायाम , प्रत्याहार , धारणा , ध्यान या विषयी चर्चा करुन देवता हृदयात स्थित आहे , असे सांगितले आहे . त्या संदर्भात येणारा एक महत्वाचा श्लोक सांगावासा वाटतो—

 

*हृद्यर्कश्चन्द्रमाः सूर्य्यः सोमो मध्ये हुताशनः ।*

*तेजोमध्ये स्थितं तत्वं तत्वमध्ये स्थितोSच्युतः॥*

हृदयात सूर्य आणि चन्द्रमा , सूर्य आणि चन्द्रमामध्ये अग्नि स्थित आहे , अग्निच्या मध्यात तत्व स्थित आहे आणि त्या तत्वात *अनश्वर* म्हणजे *अच्युत* स्थित आहे .

मला या श्लोकातून एकदम दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञाची आठवण झाली !!! सूर्यावरुन आत्मा , चन्द्रावरुन मन आणि अजून एक तत्व *”मी”* म्हणजे अहंकार हे तीनही जर हृदयात स्थित असतील , तसेच हुताशन म्हणजे अग्नि जो पंचमहाभूतांचा , सप्त धातूंचा ( रस , रक्त , मांस , मेद , अस्थि , मज्जा व शुक्र यांचा ) आणि उदरस्थ अन्न पचवणारा असे जे तेरा अग्नि सांगितले , त्यातील शुक्राग्नीने शुक्रोत्पत्ती झाल्यावर मग हृदयस्थ ओजस्विता व मुखकमलावरील तेजस्विता वाढत असते !!! तर पुत्रकामेष्टीत कोणती अग्निदेवता प्रकट होवून कसले पायस ( खीर ) देत असावी ?? त्या यज्ञातील मंत्रांनी पुत्र निर्माण करण्याची शक्ति असणारी शुक्रोत्पत्ती होत असावी का ? विद्वानांनी विचार करावा . कारण पुढे हृदयस्थ आत्माच सर्वव्यापक परमेश्वर आहे असे सांगून व्यक्त व अव्यक्त सनातन ब्रह्म तोच आहे , तोच धाता , विधाता आहे , प्राचीनतम , कलांनी रहीत कल्याणकारी आहे , हे सांगितले आहे . पुढे चोवीस तत्व सांगितले आहे व मन—बुद्धि—आत्मा तसेच व्यक्त — अव्यक्त प्रकृति ही चोवीस तत्वांपेक्षा वेगळी आहे व श्रेष्ठ आहे , असे म्हटले आहे .

मी माझ्या वक्तव्यात नेहमी सांगत असतो की , मनुष्य जेंव्हा निजधामास जातो त्यावेळेस फक्त आत्मा नाही तर ही चारही तत्व ( मन—बुध्दि—आत्मा व अहंकार ) शरीर सोडतात !!!

पुढे विष्णुतत्वाची ( परब्रह्म ) चर्चा करुन जीवाची सूक्ष्मता पुढील श्लोकात वर्णिलेली आहे . जी शोधायला कुठलेही सूक्ष्मदर्शक उपयोगाचे नाही !!

 

*बालाग्रशतशो भागः कल्पितस्तु सहस्रधा ।*

*तस्यापि शतशो भागाज्जीवः सूक्ष्म उदाहृतः ॥*

केसाच्या अग्रभागाचे शंभर भाग करुन त्या प्रत्येकाचे हजार भाग करुन पुन्हा प्रत्येकाचे शंभर भाग केले तर त्या सूक्ष्मतेपेक्षा *जीव* सूक्ष्म सांगितला आहे !!

असे सांगून इन्द्रियांपासून विषय श्रेष्ठ , विषयांपेक्षा मन श्रेष्ठ , मनापेक्षा बुद्धि श्रेष्ठ , बुद्धिपेक्षा महान तत्व श्रेष्ठ , त्यापेक्षा अव्यक्त परम तत्व श्रेष्ठ , अव्यक्तापेक्षा पुरुष ( ब्रह्म ) श्रेष्ठ आहे , ती चरम सीमा असून परम गति आहे . ते सर्व भूतात विद्यमान असून उत्तम व सूक्ष्म बुद्धिने पाहिले जाते . हे सांगितले आहे .

आता ज्याला अशी बुद्धीच नसेल त्याला काय कळावा देव वा ब्रह्म तत्व !!! शिवाय मन , बुद्धि , अव्यक्त तत्व ( अहंकार जो अव्यक्त असून मनुष्य जीवन जगतांना ठायी ठायी प्रकट होत असतो !! ) आणि आत्मा ( पुरुष ब्रह्म ) ही श्रेष्ठ तत्वे जेंव्हा शरीर सोडतात तेंव्हा इंद्रिय व विषय कसे रहावे जिवंत ? शिवाय अहंकार हे तत्व अव्यक्त व व्यक्त अशा दोनही स्वरुपात दर्शन देते , त्यावेळेस मला गीतेतील विभूती योगाची आठवण होते व ” मी समासात द्वंद्व समास आहे ” , खास करुन ह्या ओळींची !!

आज थांबतो . विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा