You are currently viewing जखमा उरातल्या…

जखमा उरातल्या…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*जखमा उरातल्या…*

लपवाव्या किती सांगा जखमा उरातल्या
साऱ्याच कर्मकहाण्या एकाच सुरातल्या…

दुर्योधन घराघरात धृतराष्ट्र अंगणी
होणार कशी न मलूल शुक्राची चांदणी..

कर्ण ही मांडलिक, पराक्रमी असून व्यर्थ
बांधून लोचनास गांधारी ती सशर्त..

दु:शासनास रान मोकळे सदाच येथे
ते आर्त आसवांचे भरले घरात पोते..

कुंतीस नाही सौख्य राज्ञीपणात काटे
त्या राजलक्षुमित झाले कसे ते वाटे?…

ते षंढ वैभवात गर्जती पराक्रमास
लज्जेस रक्षणार्थ हाकारी माधवास…

माद्री असो वा अंबा फरपट जीवनात
त्या सत्यवतीचे घर बांधले उन्हात…

भीष्मास नाही सौख्य शापित जीवनात
सामोरी ये शिखंडी झालाच धनुष्य पात…

राजा असो वा रंक सारेच संकटात
राज्ञीस ना कवच विकतात बाजारात…

जखमाच पाचविला सरणावरीही थेट
शापित मानवास श्रीहरीच देई भेट…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २० जानेवारी २०२३
वेळ: सकाळी ११/०६

प्रतिक्रिया व्यक्त करा