You are currently viewing नारायण राणेंना मी दहा वर्षांपूर्वी मारलेली मिठी माझी मोठी राजकीय चूक – संदेश पारकर

नारायण राणेंना मी दहा वर्षांपूर्वी मारलेली मिठी माझी मोठी राजकीय चूक – संदेश पारकर

तीच चूक केसरकरांची; लोकसभा निवडणुकीनंतर पश्चाताप करण्याची वेळ

 

सावंतवाडी :

नारायण राणे यांना मी दहा वर्षांपूर्वी मारलेली मिठी माझी मोठी राजकीय चूक होती. ही चूक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली असून त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. त्यांचेही राजकीय नुकसान होणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

या निवडणुकीत नारायण राणे पराभवाची हॅट्रिक करणार असून खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करून केंद्रात येणाऱ्या इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री असणार असल्याचे पारकर यांनी सांगितले. पारकर म्हणाले, दहा वर्षांपूर्वी मी राणे मिठी मारली ती माझी मोठी चूक होती. त्यामुळे माझे राजकीय नुकसान झाले परंतु, गेल्या सहा वर्षात मी सुधारणा केली. माझी राणे यांच्या प्रवृत्ती बरोबर लढाई सुरू आहे ती सोडलेली नाही राणे त्यावेळी काँग्रेसमध्ये आले होते त्यामुळे त्यांच्याशी तडजोड करावी लागली. ही राणेशी तडजोड नव्हती तर काँग्रेसच्या विचारधारेशी तडजोड होती. त्यांच्याशी तात्विक विरोध सुरू होता. परंतु त्यांना मारलेली मिठी माझे राजकीय नुकसान करणारी ठरली. ही चूक आता केसरकर यांनी केली आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे त्यांचेही राजकीय नुकसान होणार आहे. केसरकर राणेंच्या दहशतीच्या विरोधात आवाज उठवत होते. परंतु कुणाच्या दबावामुळे त्यांनी मिठी मारली हे समजत नाही त्यांचा जनाधार संपल्यामुळे कदाचित त्यांनी ही मिठी मारली असावी परंतु सावंतवाडीच्या जनतेला त्यांची ही भूमिका पटलेली नाही. मंत्री असताना दीपक केसरकर आपल्या मतदार संघातील प्रश्न सोडवू शकले नाही. वेंगुर्ले रेडी पोर्टचा प्रश्न, उत्तम स्टील, वनसंज्ञा, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, रेल्वे टर्मिनस असे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यांना याबाबत कुठलेही सुख दुःख नाही. त्यामुळे या निवडणुकीत राणेंच्या विरोधात मतदान करून सावंतवाडी मतदारसंघातील जनता केसरकर यांना प्रत्युत्तर देणार आहे असेही पारकर म्हणाले.

यावेळी पत्रकार परिषदेत पारकर यांसमवेत तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, काँग्रेसचे समीर वंजारी, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा