You are currently viewing महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणारा जाणता राजा….. शरदचंद्रजी पवार

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणारा जाणता राजा….. शरदचंद्रजी पवार

*महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणारा जाणता राजा….. शरदचंद्रजी पवार*

गेल्या काही वर्षांमध्ये एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याने अमरावती शहरातील लेखक कवी कलावंतांची सभा घेतल्याची तुम्हाला आठवते का ? त्याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. पण साधारणपणे 30 वर्षांपूर्वी भारतातील एका मोठ्या व्यक्तीमत्वाने अमरावती शहरात येऊन कठोरा नाक्यावरील रंगोली लॉन मध्ये अमरावतीकरांची एक सभा घेतली .त्या सभेमध्ये फक्त लेखक कवी व कलावंत होते .त्या सर्वांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर फोटो काढले. त्यांचे विचार समजून घेतले. त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले .त्या माणसाचे नाव आहे मा. श्री शरदचंद्रजी पवार. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वारसा ते समर्थपणे चालवीत आहेत.खरं म्हणजे आजच्या धकाधकीच्या राजकारणामध्ये राज्यकर्त्यांना कलावंतांचा विसर पडत चाललेला आहे. पण 30 वर्षांपूर्वी या माणसाने अमरावती शहरात येऊन जो आगळावेगळा कार्यक्रम घेतला तो अजूनही माझ्या स्मरणात आहे. जितने वाले कोई अलग काम नही करते वह हर काम अलग ढंगसे करते है .असेच शरद पवार साहेबांच्या बाबतीत म्हणावे लागेल. आज मला असं वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सध्याच्या आधुनिक व्यवस्थेमध्ये साहित्यिकांना लेखकांना कलावंतांना जर आशेचे किरण म्हणून कोणाकडे पाहावेसे वाटत असेल तर त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव मा.श्री शरदचंद्रजी पवार असे आहे. कविवर्य ना.धो. महानोर यांचे नाव सर्वदूर आहे. आज ते आपल्यात नाही आहेत पण सर्व महाराष्ट्र त्यांना ओळखतो. पण या कवी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे कोण उभे राहिलं. त्यांना आमदार कोणी केलं .तर एकच नाव डोळ्यासमोर येते. ते म्हणजे मा. शरद पवारसाहेब . आज विधान परिषदेमध्ये किंवा महा नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्वीकृत सदस्य असतात .त्यामधून साहित्यिकांची कलावंतांची वर्णी लागण्याची परंपरा खंडित झालेली आहे .पण या जाणत्या राजाने मात्र ही परंपरा कायम ठेवली आहे. आपण बारामतीला जर गेलात तर खरे शरद पवार साहेब तुम्हाला कळतात .तिथे सर्व भव्य दिव्य असेच आहे .त्यांच्या बारामतीच्या गदिमा सभागृहामध्ये मला जाण्याचा योग आला होता.माझा ” मी आयएएस अधिकारी होणारच “हा कार्यक्रम त्यांच्या संस्थेमध्ये ठेवण्यात आला होता .एवढे मोठे प्रशस्त भव्य दिव्य सभागृह मी आयुष्यात पहिल्यांदाच पहात होतो. कलावंतांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करावयाचे असल्यास जर पर्याप्त रंगमंच उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था उत्कृष्ट विद्युत व्यवस्था जर असली तर त्या कलावंतांचा उत्साह अजून वाढतो आणि ते 100% चांगले सादरीकरण करतात. हा भाव लक्षात घेऊन मा. श्री शरद पवारसाहेबांनी स्व.ग. दि.माडगूळकर सभागृह उभे केले आहे .मी त्यांच्या कार्यक्रमाला जेव्हा बारामतीला गेलो तेव्हा त्यांचे प्रभारी प्राध्यापक रात्री दोन वाजता मला बारामतीच्या टोल नाक्यावर घ्यायला आले. खरं म्हणजे मी कारने गेलो होतो .मला कुठे उतरायचे हे सर्व माहीत होते .परंतु प्रभारी प्राध्यापक म्हणाले की आमची अशी परंपरा नाही .पाहुण्यांना आम्ही बारामतीच्या शिवेवरूनच रिसिव्ह करतो आणि जाताना देखील शिवेवरच सोडतो .रात्री दोन वाजता आलेले प्राध्यापक मला अतिथीगृहात घेऊन गेले .या अतिथिगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वागत कक्षामध्येच एक छोटेसे ग्रंथालय आहे. मराठी मधली निवडक पुस्तके शरद पवारसाहेबांच्या सल्ल्याने तेथे ठेवण्यात आलेली आहेत. मी साधारणपणे आठ तास बारामतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये होतो .प्राचार्य देवसरकर सर माझ्याबरोबर होते. ते म्हणाले पवार साहेब वर्षातून फक्त एक मीटिंग घेतात आणि आम्हाला एवढंच सांगतात की ही संस्था तुमची आहे. निर्णय घेण्याचे अधिकार तुमचे आहेत. संस्था चांगली झाली पाहिजे .या संस्थेला घर म्हणून समजा. मी कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. प्राचार्य देवसरकर सर कार्यक्रम संपल्याबरोबर माझ्याबरोबर विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये जेवले आणि मी गाडीत बसेपर्यंत ते माझ्याबरोबर होते. मी त्यांना म्हटलं सर तुम्हाला भरपूर काम असतील. तुम्ही तुमचे काम करा.ते म्हणाले आलेल्या पाहुण्यांना आल्यापासून तर जाईपर्यंत त्यांच्याबरोबर राहणे हे आमचे कर्तव्य आहे . मा.श्री. शरद पवार साहेबांची माझी पहिली भेट अमरावतीच्या विश्राम भवनात झाली. अमरावतीच्या धर्मदाय कॉटन फंडमध्ये काँग्रेस पक्षाने सेवा दलातर्फे एक निवासी शिबिर आयोजित केले होते. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी मा. श्री शरद पवार आले होते. माझ्या एका पत्रकार मित्राने मला शरद पवार साहेबांच्या भेटीला विश्राम भवनांमध्ये नेले. तेव्हा मी विद्यार्थी होतो. कक्षाच्या बाहेर उभा होतो. शरद पवार साहेब कक्षातून बाहेर आले .त्यांचे भव्य दिव्य व्यक्तिमत्व पाहून मी दिपून गेलो .त्यांच्या डाव्या हातामध्ये कागदपत्रे होती आणि उजव्या हाताने ते सर्वांच्या नमस्काराचा स्वीकार करीत होते. त्यांना मी पाहिले. नेपोलियनबद्दल असे म्हणतात की ते आले त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले. तसेच माझे शरद पवार साहेबांना पाहिल्याबरोबर झाले. पुढे आयुष्यामध्ये शरद पवार साहेबांना भेटण्याचा योग आला तो डॉ. पंजाबराव देशमुख जन्मशताब्दी निमित्ताने. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर जन्म शताब्दी निमित्त मी “युग निर्माता “नावाचे नाटक बसविले होते .डॉ. सतीश पावडे हे नाटकाचे दिग्दर्शक होते .मा. शरद पवार साहेब हे वर्ध्याला कुठल्यातरी कार्यक्रमाला येणार होते. आम्ही वर्धा येथे पोहोचलो. विश्राम भवनात तेव्हाचे शिक्षण मंत्री श्री राम मेघे हे होते. ते माझे मित्र होते. त्यांनी शरद पवार साहेबांना माझ्या नाटकाचा अल्बम दाखविला आणि या नाटकाचा प्रयोग आपल्या उपस्थितीत व्हावा अशी इच्छा व्यक्त केली .पवार साहेबांनी ती लगेच मान्य केली. आणि लगेच मला म्हणाले खर्च कोण करणार ? मेघे साहेब म्हणाले मी करणार .एवढा मोठा राष्ट्रीय नेता युग निर्माता नाटकाच्या प्रयोगाला येतो ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती . शरद पवार साहेब हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आहे .आज महाराष्ट्रातील कलावंतांना खऱ्या अर्थाने जर आधार वाटत असेल तर यशवंतराव चव्हाणानंतर शरद पवार साहेबांचाच.कविवर्य श्री सुरेश भट हे शरद पवार यांचे अतिशय जिवलग मित्र .मागे माझ्या एका अपंग प्राध्यापक मित्राचे काम निघाले. काम फारच मोठे होते .शरद पवारसाहेब तेव्हा सत्तेत नव्हते. नुकतेच मुख्यमंत्री म्हणून पायउतार झाले होते.तरी मला लोकांनी सांगितले की शरद पवारसाहेबच हे काम करू शकतात .मी त्या अपंग मित्राला घेऊन सुरेश भटांकडे नागपूरला गेलो. सुरेश भट यांना परिस्थिती सांगितली .सुरेश भट स्पष्टपणे म्हणाले माझा मुंबईचा खर्च तुम्हाला परवडणार नाही .मी पवार साहेबांना एक पत्र देतो. ते पत्र घेऊन तुम्ही जा. तुमचे काम होऊन जाईल .तेव्हा पत्रालाही किंमत होती. आम्ही सुरेश भटांचे पत्र घेऊन मुंबईला मलबार हिल मध्ये पोहोचलो .माझे मित्र श्री सुरेंद्र भुयार तेव्हा राज्यमंत्री होते .त्यांच्या बंगल्यावर थांबलो. माननीय शरद पवार साहेब तेव्हा रामालयमध्ये राहत होते. आम्ही सकाळी उठून रामालय गाठले. मा.श्री दिलीप वळसे-पाटील हे तेव्हा साहेबांचे खाजगी सचिव होते. दिलीप वळसे पाटील यांना भेटल्यानंतर त्यांनी काय काम आहे ? म्हणून विचारले. आम्ही सुरेश भट यांचे पत्र त्यांच्याजवळ दिले. ते पत्र वाचून दिलीप वळसे-पाटील आतमध्ये गेले आणि एका मिनिटांमध्ये मा. श्री शरदचंद्र पवार साहेब बाहेर आले . आमच्या नमस्काराचा त्यांनी स्वीकार केला आणि त्यांनी फक्त दोनच वाक्य उच्चारले .तुमचे काम होऊन जाईल. सुरेश भट साहेबांना नमस्कार सांगा .ज्या वेगाने ते आले त्याच वेगाने ते परत गेले आणि महत्त्वाचे म्हणजे ते काम झाले. काम अवघड होते .न होण्या सारखे होते. परंतु पवार साहेबांच्या शब्दाला तेव्हाही मान होता आणि आजही मान आहे .एका अपंग माणसाच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने उजाळा देण्याचे काम पवार साहेबांनी केलं आणि म्हणूनच कुठल्याही पक्षाचा माणूस असो त्याला शरद पवार साहेबां विषयी आदर आहे .त्यांनी काम करताना पक्षाचा कधी विचार केला नाही आणि म्हणून आज हा माणूस जाणता राजा म्हणून ओळखल्या जातो सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासण्या मध्ये ज्या लोकांची नावे आहेत त्यामध्ये शरद पवार साहेबांचे नाव निश्चितच वरच्या क्रमांकावर आहे ..हा माणूस मराठी माणसाच्या चांगल्यासाठी झगडत होता झगडत आहे आणि झगडत राहील यात शंका नाही .अशी माणसं या पृथ्वीतलावर अधून मधूनचच जन्म घेत असतात . आज माननीय श्री शरद पवार साहेब यांचा वाढदिवस .त्यानिमित्त आमच्या साहित्य परिवारातर्फे त्यांना मानाचा मुजरा. ============== *प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी* अमरावती 98 90 96 7003

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + sixteen =