You are currently viewing ये ग ये ग सरी

ये ग ये ग सरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित काव्यसंग्रहाचे रसग्रहण*

 

*रसास्वाद….!*

 

*काव्यसंग्रह….*

*ये ग ये ग सरी….*

कवी/कवयित्री:को.म.सा.प. मालवण शाखा

 

“ये ग ये ग सरी” कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या २५ कवी कवयित्रींच्या तब्बल एकशे एकावन्न कविता असलेला हा काव्यसंग्रह..! सामाजिक क्रांतीची तुतारी फुंकणारे कवी कुलगुरू कृष्णाजी केशव दामले उर्फ “केशवसुत” यांच्या पुण्यतिथी दिवशी प्रकाशित झालेला कवितासंग्रह म्हणजे एक अर्पण पत्रिकाच..! कविवर्य केशवसुत यांचे जन्मगाव मालगुंड, जिल्हा-रत्नागिरी, या कवितेच्या राजधानीलाच मालवणच्या को.म.सा.प. सदस्यांनी हा कवितासंग्रह अर्पण केला हे विशेष वाखण्याजोगे..!

कविता संग्रहाला निवृत्त शिक्षक माधव गावकर यांची प्रस्तावना लाभली आहे. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी असे म्हटले आहे की, “काव्य कन्या उपवर होऊन रसिकगृही सूखेनैव नांदायला निघाली आहे, ती रसिकांच्या पसंतीला उतरेल आणि दीर्घ काळ हा काव्यप्रपंच सुखाने करील”. हे त्यांचं स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात येईल अशी आशा करूया.

हिऱ्याला पैलू पाडायचे तर त्यासाठी कुशल कारागिराची आवश्यकता असते. असाच साहित्यातील हिऱ्यांना पैलू पाडणारा कारागीर म्हणजे काव्यसंग्रहाचे संपादक श्री. सुरेश ठाकूर गुरुजी..! श्री.सुरेश ठाकूर गुरुजींच्या परिचयामधूनच त्यांच्या अंगी असलेल्या कल्पकतेची जाणीव होते. ज्याच्याकडे स्वतःची विपुल साहित्य संपदा असते तोच इतरांच्या साहित्य निर्मितीला मोलाचा हातभार लावतो आणि अशीच विपुल साहित्य संपदा असणारे संपादक “ये ग ये ग सरी” या काव्यसंग्रहाला लाभले हेच काव्यसंग्रहाचं पहिलं यश..! कविवर्य केशवसुतांची महती आपल्या संपादकीय मधून सर्वांना ज्ञात करून देतानाच हा कवितासंग्रह मालगुंड गावाला अर्पण करत श्री.सुरेश ठाकूर सरांनी कवितासंग्रहाबद्दल उत्सुकता आणखी वाढवली आहे..

कोकणची “आण बाण शान” असलेल्या मालवणी भाषेतील रुजारियो पिंटो यांच्या मालवणी मुलखातील मालवणी कवितांनी काव्यसंग्रहाचे मानाचे पान सजले आहे.

*मालवणी खयच नाय कमी*

*मालवणी म्हणजे यशाची हमी*

*मालवणी भाषा कानार पडता*

*तेव्हाच थय चमत्कार घडता*

मालवणी भाषेची महती सांगताना मालवणी भाषा कुठेच कमी पडत नाही तर मालवणी म्हणजे यश मिळण्याची हमी..! जेव्हा कुठे मालवणी भाषा कानावर पडते तेव्हा तिथे चमत्कार घडतो.. अशाप्रकारे रूजारियो पिंटो यांनी मालवणीची गोडी आपल्या कवितेत जपली आहे. “कोकण रडता” मधून त्यांनी कोकणातील दुर्दशेवर भाष्य केलं आहे. “शालग्या” मधून मात्र त्यांनी हास्याचे कारंजे उडवले आहेत.

अष्टाक्षरी, वृत्तबद्ध अन् मुक्तछंद कवितांमधून आपल्यातील विविधांगी गुणांचे दर्शन देत कवयित्री मधुरा माणगावकर यांनी …

*दुपारी उन्हाला लपेटून घ्यावे..*

*मनी चांदण्याचे नवे गीत गावे*

*शहाणेपणाचे रकानेच सारे..*

*जरा दूर सारून वेडे जगावे*

या काव्यातून भर दुपारी उन्हाला लपेटून घ्या…म्हणजे संकटे आल्यावरही त्यांना अंगावर घेत हसत हसत संकटाला सामोरे जावे…मनातून चांदण्यांचे गीत गावे अन् शहाणपणा जरा दूर सारून वेडे होऊन जगावे असे म्हटले आहे.

*जरी चांदवा तो सवे चांदणीच्या*

*परि भास होती मला सोबतीचे*

चांदणीच्या संगतीत चांदव्याला पाहून कवयित्रीला देखील आपला प्रियसखा आपल्या सोबत असल्याचा भास होतो.. किती सुंदर कल्पना कवयित्री मधुरा माणगावकर यांनी आपल्या वृत्तबद्ध काव्य रचनेतून मांडली आहे.

 

*नभ अंधारून आले.. अंधारून आले मन..*

*मेघ दाटले नभात.. मनी विचारांचे धन..*

कवी विजयकुमार शिंदे यांनी आपल्या मनाच्या अवस्थेचे वर्णन करताना काळ्याकुट्ट ढगांनी आच्छादल्यानंतर जसे नभ अंधारून येते..अगदी तसेच मन देखील गडद विचारांनी अंधारून आले असे म्हटले आहे..

*गर्द सावळा मेघ पांघरून प्रिय सखा हा यावा..*

*रिमझिमणाऱ्या सरींमधून तुफान बरसत जावा..*

समुपदेशक म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेविका कवयित्री चारुशीला देऊलकर यांनी आपला प्रिय सखा गर्द सावळा मेघ पांघरून यावा अन् रिमझिमणाऱ्या सरींमधूनी तुफान बरसून जावा.. अशी पावसात जवळ इच्छा व्यक्त केली आहे.. तसेच आपल्या दुसऱ्या रचनेतून…

*देऊळ रोज शृंगे पाने फुले सुवासी..*

*बाहेर लेक माझी केलीत देवदासी*

असे म्हणत मंदिरात देवीची पूजा करणाऱ्यांवर आसूड ओढताना मंदिराबाहेर “देवदासी” म्हणून स्त्रीची विटंबना केली जाते या कर्मठ प्रथेच्या विरोधात बंड केले आहे.

कवी सुरेंद्र सकपाळ यांनी देखील आनंद झाला या पादाकुलक मात्रावृत्त अन् अष्टाक्षरी मधून वृत्तबद्ध कवितांचा अविष्कार सादर केला आहे.

*पाऊस येता आनंदाला येई भरती.. जलधारांनी ओली होई सारी धरती..*

*पाण्याने मग झाडे सारी भिजुनी जाती.. सुगंध देई धरतीवरील ओली माती*

पावसाच्या रिमझिम धारा धरणीवर पडतात आनंदाला भरती येते आणि धरणी, झाडे पाण्याने ओली चिंब होऊन जातात..धरणीवरील ओली माती सृष्टीला गंधीत करते.

साध्या सोप्या शब्दात परंतु वृत्तात लिहिल्याने कवितेला एक छान लय प्राप्त होते आणि तालासुरात काव्य गाताही येते. (इथे एक नमूद करावेसे वाटते ते म्हणजे…)

मात्रावृत्तात लिहिताना आठ / आठ मात्रांचे जे खंड पडतात त्याचे शेवटचे अक्षर हे दीर्घ असावे म्हणजे लय बिघडत नाही.

(सुगंध देई/धरतीवरची/ओली माती)

*आकाशीच्या आज अंगणी*

*ग्रहताऱ्यांचा दिसे पसारा*

*विजांच्या त्या आवाजासह*

(७ मात्रा)

*कोसळती मग पाऊस धारा*

पादाकुलक मात्रावृत्तातील “निसर्ग” ही कविता “ये ग ये ग सरी” या काव्यसंग्रहाच्या नावाला साजेशी अशीच आहे.

*आज अंगणी आकाशीच्या…ग्रह ताऱ्यांचा दिसे पसारा..*

*गडगडणाऱ्या विजांसोबती… कोसळती मग पाऊस धारा..*

(असं केल्यास थोडी आणखी मजा घेता आली असती.)

 

कवयित्री स्मिता शितुत यांची

*मुलगी, परसातला बकुळ सडा माजघरातला मुग्ध केवडा”*

“मुलगी”, ही सुरेख रचना हृदयाला हळुवार स्पर्श करून जाते.

कवी चेतन बोडेकर यांची *कोकणातली शेती तशी नसा तितकी हुकमी.. पण मुंबैपस्ना गावातागत.. पुरता सगळ्यांका बेगमी..*

ही मालवणी काव्यरचना “कोकणातील शेती जरी हुकमी नसली तरी मुंबईपासून गावापर्यंत सर्वांना पुरून उरते” अशा प्रकारची कोकणातील शेतीची महती सांगते.

कवी भानुदास तळगावकर यांच्या मालवणी काव्यरचना काव्यसंग्रहाच्या मध्यावर अक्षरशः धुमशान घालतात. *चेडवा एकटा दुकटा नुको जाव..*

*डोळे फाडून बघता सगळो, आजूबाजूचो गाव..*

अशा प्रकारे आईला आपल्या मुलीबद्दल वाटत असलेली काळजी त्यांच्या “आवशीक काळजी” या मालवणी कवितेतून दिसून येते.

कवी नारायण उर्फ बाळ धुरी यांनी आपल्या “स्वर्ग सुखाची पर्वणी” मधून पावसाचे अप्रतिम असे वर्णन केले आहे…

*ओथंबल्या तरुशाखा.. जड झाली तृणपाती.. वसुंधराही आतुरली.. वरुणाच्या भेटीसाठी..*

पावसाच्या सरीवर सरी कोसळताच झाडांच्या फांद्या, तृणपाती पाण्याच्या वजनाने झुकतात.. असे निसर्गाचे अप्रतिम वर्णन करून आपल्या नजरेसमोर जणू त्यांनी पावसाचे दृश्य उभे केले आहे..

कवयित्री वर्षाराणी अभ्यंकर यांचे “आत्म्याचे मनोगत” वाचल्यावर खरोखरच दीनजीवन भोगल्यावर गात्रे शीण झाल्यासारखे वाटून जाते.

(“ओढ” ही लावणी रचना मात्र मुक्तछंद कशी? हे समजले नाही. लावणी ही भावगीत प्रमाणे दोन ओळींचे धृपद सह असावी असा माझा तरी समज आहे.)

कवयित्री रसिका तेंडुलकर यांची “पहिला पाऊस”, “माय मराठी” या अभंग रचना उत्तम स्वर यमक साधत रेखाटल्या आहेत.

*मुलांमाणसांनी भरे.. माझे माहेरचे घर*

*आप्त सखे पथिकांचा.. मुक्त चालतो वावर..*

वाह… कवयित्रीने “माझिया माहेरा” या कवितेतील या चार ओळींमधूनच माहेरच्या घरातील सुखद आठवणी विशद केल्या आहेत.

कवी रामचंद्र कुबल यांचे “पावसाचं गाणं” डोळ्यांच्या कडा ओलावून जातं..

*मागल्या वर्षी बाप गेला.. बहिणी सोबत वाहून,*

*मी जित्ता, म्हणून मायनं आपलं.. मरण ठेवलय लांबवून.*

हृदयाला चरा पाडून जाणारी त्यांची रचना भावनांना आर्त हाक घालते.

“दगड”, “ते दिवे”, “ठिगळ” सर्वच भावस्पर्शी रचना..!

*सुखाच्या सरींनी हसे पावसाळा*

*तुझ्या लाघवाने फसे पावसाळा*

*तुझ्या आणि माझ्या मनाचे मनोरे*

*क्षणी मोडतो हे कसे पावसाळा?*

सुखाच्या सरीने हसणारा पावसाळा तिच्या लागवी वागण्याने फसतो आहे.. अशा कितीतरी सुरेल, अतिशय सुंदर अशा गजलांचा अविष्कार दाखवणाऱ्या गझलकार एकनाथ गायकवाड यांचे श्रेष्ठत्व मानाचे पान मधून संपादक श्री.सुरेश ठाकूर गुरुजींनी दाखवून दिले आहे. गझल, अभंग, मुक्तछंद, हायकू अशा सरस रचना कवी एकनाथ गायकवाड यांनी “ये ग ये ग सरी” मधून आपल्या भेटीस आणल्या आहेत.

*म्हायत हा जितेपणी खूप हाल केल्यानी…तुका नकळत तुजा सगळा, इकून इकून खाल्यानी*

मालवणी भाषेतील या चार ओळींमधून समजते की, कवयित्री अनुराधा आचरेकर यांनी माणूस मेल्यानंतर त्याच्यासाठी दिवस कार्यात आणि म्हाळवस म्हणजे महालय श्राद्धाच्या वेळी कावळ्याच्या रुपात पूर्वज येतील यासाठी “वाडी” ठेवतात.. अन् जिवंतपणी आपल्या वडीलधाऱ्या माणसांना अन्न न घालता… उपाशी ठेऊन कावळ्याला वाडी दाखवतात.. यावर शब्दांचा सणसणीत चाबूक ओढला आहे.

कवयित्री सौ.आदिती मसुरकर यांची अनलज्वाला मात्रावृत्तातील “…सर..” ही पावसावरील अप्रतिम रचना काव्यसंग्रहाच्या नावाला साजेशी अशी शोभून दिसली.

*रिमझिम रिमझिम वर्षाची सर नभात फिरते…*

*गिरकी घेऊन ती धरणीच्या कुशीत शिरते*

वर्षा ऋतूत पावसाची रिमझिम सर वाऱ्याच्या वेगात नभांगणी गिरकी घेत फिरते.. वाऱ्याचा झोत कमी झाला की ती अलगद धरणीच्या कुशीत विसावते.. जशी बालके धावत येत आपल्या आईच्या कुशीत शिरतात अगदी तशीच..!

कविता कशी असावी, कशी असते, अन् कशी सजते..? हे कवयित्रीने आपल्या सुरेल अशा अभंगामधून सांगितले आहे…

*कवितेचे रूप| भुलवी मनाला| स्पर्शते तनाला| वाचताना||*

*आदिती म्हणते| दंग होई कवी| समाज घडवी| लेखणीने||*

कवयित्री आदिती मसुरकर यांची बालकविता “धूमकेतूचे शेपूट” वाचल्यानंतर बालमनाचा त्यांचा अभ्यास अतिशय उत्तम असल्याचे अन् बालकविता रचण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे समजून येते.

“संध्याकाळ” हे *शिरोमणी काव्य* देखील त्यांनी अतिशय सुंदर असे लिहिले आहे.

संध्याकाळ..

मोहक हसते..

अस्ताला जाणाऱ्या रवीस.. (रवि)

अलगद आपल्या कवेत घेते..

अस्ताला जाणारा रवि लाल तांबडा होऊन क्षितिजापल्याड हळूच संधेच्या कवेत विसावतो.. अन संध्या त्याला अलगद आपल्या कवेत घेते.. कवयित्रींनी अतिशय सुरेख असे संध्याकाळचे वर्णन आपल्या कवितेतून केले आहे.

*भावनांचा हिमनग*

*नयनांनी पारखावा*

*दुःखाश्रूंचा महापूर*

*पापण्यांत ओसरावा*

प्रीतफुलांचा वर्षाव करणारे हे अष्टाक्षरी काव्य कवयित्रींनी अतिशय सुंदर शब्दांची पखरण करत “प्रीतगंध” मधून सादर केले आहे.

*गोड गुलाबी थंडीने शहारली माझी काया*

*तुम्ही शाल पांघरा, उबदार मिठीची राया ||धृ||*

लावणीचे धृपद वाचल्यानंतर लावणीचे अंतरंग, तिची नजाकत, लावण्य ज्ञात होते.

*पंखुडीत पापण्यांच्या, प्रीत माझी लपली*

*लज्जेने चूर झाले, आता रात्र ही संपली*

*हृदयाच्या कप्प्यामध्ये, जपते तुमची माया*

*तुम्ही शाल पांघरा, उबदार मिठीची राया||*

लावणीकारा आदिती म्हणते, पापण्याच्या पंखुडीत माझी प्रीत लपली आहे, मी लाजेने चूर चूर झाले, आता रात्र सुद्धा संपली राया.. माझ्या हृदयाच्या कप्प्यामध्ये तुमची माया जपते आहे. पण गोड गुलाबी थंडीने माझी शहारते काया, आता तुमच्या उबदार मिठीची शाल मजवरी पांघरा..

किती लाघवी आणि मोहक शब्दांमध्ये लावणीकारा अदिती मसुरकर यांनी आपल्या सख्याला, जीवनसाथीला स्वतःला मिठीत घेऊन आपल्या मिठीची उबदार शाल पांघरायला सांगितली आहे..

कवयित्री आदिती मसुरकर यांनी विविध काव्य प्रकारांमध्ये लिहिलेली काव्ये मन वेधून घेतात..शब्द मनाला भुरळ घालतात अन् पुन्हा पुन्हा वाचण्यास भाग पाडतात.

कवी विठ्ठल लाकम यांची “रिमझिम श्रावणधारा” मृग नक्षत्रातील पावसात चिंब भिजण्यासाठी आमंत्रित करते… ते आपल्या काव्यातून म्हणतात…

*धरणी झाली नवरी… आकाश झाला नवरा*

*पशुपक्ष्यांनी गात गाणी.. लग्न सोहळा केला साजरा*

किती सुंदर कल्पना आहे पहा… धरित्रीला नवरीची अन् धरणीवर आपल्या आशीर्वादाची, मायेची, प्रेमाची शाल पांघरणारे अथांग पसरलेले अवकाश हा नवरा..! त्या दोघांच्या लग्नसोहळ्यात पशू नि पक्षी गाणी गात आनंद साजरा करतात.. कवीकडे असलेली कल्पनेतील दूरदृष्टी या काव्यातून दिसून येते.

ज्येष्ठ कवी सदानंद कांबळी यांची “मायेचा पांघरूण” ही मालवणी कविता हृदयस्पर्शीच…!

*अरे झिला आमची याद आता केवा करतलं ?*

*नातवंडांका घेवन आमका बघूक केवा येतलं?*

*सावताचो गणगो शेती करतलो*

*चार मन भात खंडाचा घालतलो*

*सांग रे झिला खंडाच्या भातात कसा भागवतलं?*

मालवणी मुलखातील तरुण शाळा, कॉलेज शिकून मुंबईत नोकरीसाठी जातात अन् चाकरमानी म्हणून कधीतरी वर्ष दोन वर्षांनी गावात असणाऱ्या म्हाताऱ्या आई वडिलांना भेटायला येतात. अधून मधून चार पैसे पाठवतात तर कधी स्वतःचा खर्च भागत नाही मग विसरून जातात. मुले, नातवंडांची वाट पाहून थकलेला, गरिबीने पिचलेला बाप आपली अगतिकता कशी सांगतो हे सदानंद कांबळी यांनी कवितेतून मांडले आहे.

कवयित्री दीपाली कांदळगावकर यांची “रिमझिम श्रावण धारा”, “प्रश्नच नाही उरला” “नूतन बाळाची ओढ” छान, सुंदर, ओढ लावणाऱ्या रचना आहेत.

कवी मंदार सांबारी, मालवण कोमसापची चालती बोलती कविता म्हटल्यास वावगे ठरणार नाही. “वर्षाऋतू” या रचनेतून..

*वर्षा ऋतूच्या आगमनी या… वर्षती जलधारा..*

*हिरवा शालू नेसून नटली..नववधू वसुंधरा..*

असे म्हणत वर्षा ऋतू येताच त्याने अवनीवर हिरवी शाल पांघरली आहे अन् “आई” या त्यांच्या दुसऱ्या रचनेतून

*मायेची शाल आई | ममतेची खाण आई |*

म्हणजे आईलाच मायेच्या शालुची उपमा दिली आहे. कवीच्या कल्पनांना पंख फुटले अन् त्या कल्पना शब्दांच्या दुनियेत मुक्तपणे विहरत असल्याचे मंदार सांबारी यांच्या काव्यातून दिसत आहे.

*गुंफियेल्या सोनक्षणांची करितो गाठवण*

*आज येते खूप.. सखी, तुझी आठवण*

“आठवण” या प्रेमाचा अंकुर फुटलेल्या काव्यातून सखीची आठवण अन् गत स्मृतींना सुरेख शब्दांची झालर लावून उजाळा दिला आहे.

“पहिला पाऊस” हे सुरेख भावगीत आणि “साँग साँग” हे मालवणी इरसाल गाणे काव्य संग्रहात थोडा जास्तच भाव खावून गेले.

कवी सुनील खरात यांची “थेंब” ही कविता विशेष भावते…

*एक टपोरा थेंब…तुला सलतो आतून..*

*कल्लोळ भावनांचा..किती बोलतो आतून..*

सुरेल, लयबध्द शब्दात लिहिलेली रचना मनाला हलकेच स्पर्शून जाते..

*राजकारणाच्या चुलीवर शिजतील अनेक कांडे..*

*सलोख्याच्या पिंडाला कावळा शिवणार नाही..*

असे म्हणत कवी दौलतराव राणे यांनी “कुरघोडीचा डाव” या रचनेतून राजकारणातील गलीच्छतेवर भाष्य केले आहे.

*कधी स्वप्नांच्या वाटेवरती भेटे माझी शाळा..*

*आठवणींनी कंठ दाटतो येई पाणी डोळा…*

आपल्या शाळेची आठवण येताच कंठ दाटून येतो अन् डोळे आपोआप पाण्याने भरून येतात असे सांगताना कवयित्री सेजल परब यांनी पुन्हा लहान होऊन आनंदाने सवंगड्यांच्या पाऊलखुणा अन् बालपणीचे क्षण वेचण्याची इच्छा काव्यातून प्रकट केली आहे.

कवयित्री उज्वला धानजी यांनी “स्वप्न सरोवर” या सुरेख रचनेतून

*अजून माझ्या स्वप्नांमध्ये तुझाच वावर… नको वाटते सोडूनी जावे स्वप्नसरोवर…*

*नकोच स्पर्धा नकोच ईर्षा स्वतःस आवर… जगावयाचे आनंदाने बनून सागर*

असे म्हणत मनीची स्वप्ने नयनी जपून आनंदाने सागरासम अथांग जीवन जगण्याची इच्छा व्यक्त केली आहे..

कवयित्री अनघा कदम यांनी आधुनिक युगात नाती जपता जपता माणुसकी हरवत चालली असल्याची खंत व्यक्त केली आहे.

*जाती धर्माच्या विळख्यात..*

*विषमतेची बी रुजली…*

*धर्मांधतेच्या कचाट्यात…*

*माणुसकी हरवत चालली*

समाजात जाती-धर्माच्या विळख्यात विषमता वाढीस लागली आणि धर्मांधतेच्या कचाट्यात माणसे माणसांना परकी झाली.. माणुसकी हरवत चालली. अशाप्रकारे समाजातील विषमतेवर भाष्य करणारी कवयित्री अनघा कदम यांची कविता सामाजिक भान राखत आहे.

“तुझ्याचसाठी” मराठी काव्यसंग्रह आणि “शंभर रुपाये पाठव” हा मालवणी काव्यसंग्रह प्रकाशित झालेल्या मानाचे पान असलेल्या सुनंदा कांबळे यांच्या कविता देखील “ये ग ये ग सरी” या काव्यसंग्रहात मानाचे स्थान मिळवून आहेत हे काव्यसंग्रहाचे भाग्यच..!

*कांबळ्याच्या खोळीत्सून अंगाक हिव भरता…आणि उंडग्या वासरू माळावर उडी मारीत फिरता…*

“पावस” या मालवणी कवितेतून कवयित्री सुनंदा कांबळे यांनी पावसाळ्यात कांबळ्याची खोळ डोक्यावर घेऊन काम करत असताना त्या खोळीला पडलेल्या छिद्रातून येणाऱ्या वाऱ्याने अंगात थंडी भरते… तरीही, पावसाने अंगात थंडी, गारठा पडलेला असताना देखील उंडगे वासरू माळावर उड्या मारत फिरते आहे. असा विरोधाभास कवयित्रीनी आपल्या काव्यातून दाखविला आहे.

*गावाकडे येवन झिला खातलस काय…*

*नाय रवली शेती भाती नाय ऱ्हवले राय…*

*खुळ्यासारखे जमनी तेवा कवडीमोलान इकलव…*

*आज दर होतो तर चार पैशाक मूकलव*

अशा प्रकारचे कोकणातील वास्तव ज्येष्ठ कवयित्री सुनंदा कांबळे यांनी आपल्या “वास्तव” या काव्यातून रेखाटले आहे.

“फॅशन” या काव्यरचनेतून कवयित्रींनी अलीकडच्या युगात केल्या जाणाऱ्या नवनवीन फॅशन मग ती कपड्याची असो वा केसांची प्रत्येक फॅशनवर विस्तृत भाष्य केलं आहे. तर “निरोप” या काव्यरचनेतून कवयित्रींनी गाव अन् घराकडे पाठ फिरविणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांवर पुन्हा एकदा आसून ओढले आहेत. “आग्रेव” म्हणजे आग्रह करणाऱ्या मालवणी रचनेतून कवयित्री म्हातारी आई बाप गावाकडे असतानाही शहरातून गावाकडे न फिरकणाऱ्या, आई बापाला खर्चासाठी म्हणून मनीऑर्डर सुद्धा न पाठविणाऱ्या मुलाकडे पैसे पाठविण्याचा आग्रह करताना पाहून डोळे भरून येतात…

एकापेक्षा एक सरस काव्यरचनांचा साज चढविलेला “ये ग ये ग सरी” हा काव्यसंग्रह म्हणजे साहित्यप्रेमी वाचकांसाठी पर्वणीच..! ऋणानिर्देश मधून श्री.सुरेश ठाकूर गुरुजींनी या काव्यसंग्रहाच्या प्रवासात भेटलेल्या प्रत्येकाचे धन्यवाद देताना शब्दांचे अत्तर लावले अन् आपल्या मधाळवानीने गंधीत केले आहे.

संपूर्ण काव्यसंग्रह हाताळला असता, काही मुक्तछंद कवितांमध्ये *”मानुनि, धावुनि, येऊनि”* अशा वाक्याच्या शेवटी येणाऱ्या शब्दांना “हृस्व” का केलं हे अनाकलनीय. वृत्तबद्ध काव्यरचनेमध्ये अशाप्रकारे सूट घेतली जाते, दीर्घ अक्षर हृस्व करण्याचा प्रघात आहे. परंतु कवितेच्या वर *(सूट घेतली)* असे नमूद करावे लागते.

एकंदरीत काव्यसंग्रह अप्रतिम झाला आहे. २५ कवींनी गुंफलेली ही १५१ काव्य सुमने आपल्या रचना स्वादातून सोनचाफ्याप्रमाणे सोनेरी तेज पसरवून झळाळत राहू देत अन् बकुळीची फुले जशी सुकल्यावरही सुगंध पसरत राहतात तशीच काव्य सुमने गंधीत होऊन बहरत राहू देत…

 

काव्यसंग्रहाच्या सुखद वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..🌹🌹

 

प्रकाशक:- सत्वशी प्रकाशन, रत्नागिरी

संपादक:- श्री.सुरेश ठाकूर, आचरा, मालवण

संपर्क:- ९४२१२६३६६५

ई मेल: surshyam22@gmail.com

मूल्य: ₹.२५०/-

 

*दीपक परशुराम पटेकर [दीपी]*

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

📞८४४६७४३१९६

 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा