ड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्रीचं नाव आलं समोर; पोलिसांनी सापळा रचून पकडलं

ड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्रीचं नाव आलं समोर; पोलिसांनी सापळा रचून पकडलं

 

मुंबई :

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग केस प्रकरणी अंधेरीतील वर्सोवा भागात छापा टाकला. शनिवारी रात्री फैझल नावाची व्यक्ती टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान हिला ९९ ग्रॅम गांजा विकत असताना अटकेची कारवाई करण्यात आली. वर्सोवा येथील मच्छीमार कॉलनीत ही कारवाई झाली. फैझल आणि टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान यांच्या व्यतिरिक्त अन्य दोघांनाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने घटनास्थळावरुन ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पुढील दोन आठवड्यात आणखी मोठ्या प्रमाणावर कारवाई होणार असल्याचे संकेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिले आहेत. (NCB Conducts Raid In Andheri) न्यायालयाने फैझल आणि टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान या दोघांना ८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. प्रीतिका चौहान काही वर्षांपूर्वी संकटमोचन महाबली हनुमान या टीव्ही मालिकेत तसेच झमेला या सिनेमात अभिनय केला आहे.

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना मुंबईत लॉकडाऊन काळातही बंदी असलेल्या ड्रगचा पुरवठा व्यवस्थित सुरू होता, अशी माहिती हाती आली. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणी स्वतंत्र तपासकाम सुरू केले. छापे टाकून तसेच संशयितांची चौकशी करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला पण अटक केली.

 

सध्या रियासह काही आरोपी सशर्त जामिनावर आहेत. रियाचा भाऊ शौविक (Showik Chakraborty) अद्याप ड्रग केसमध्ये जेलमध्येच आहे. एनसीबीने ड्रग प्रकरणी बॉलिवूडच्या काही दिग्गजांची चौकशी केली. यात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंह या अभिनेत्रींचा समावेश आहे. टॅलेंट मॅनजेर करिश्मा, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी तसेच फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांचीही चौकशी झाली आहे.

 

काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता अर्जुन रामपाल याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स  हिच्या भावाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव गिसिलाओस असे असून तो मूळचा आफ्रिकेचा नागरिक असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिली. सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीतून सुरू झालेल्या ड्रग केसमध्ये एका पेडलरने गिसिलाओस याचे नाव घेतले होते. या संदर्भात आणखी ठोस माहिती हाती आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. गिसिलाओस ड्रगचा पुरवठा करणाऱ्यांमध्ये अतिशय अॅक्टिव्ह आणि महत्त्वाचा दुवा आहे. तो थेट ड्रग पेडलरच्या संपर्कात होता. याच कारणामुळे त्याला ठोस माहितीच्या आधारे अटक करण्यात आली, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सांगितले. ठिकठिकाणी छापे टाकून ड्रग जप्त करण्याची कारवाई सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहील, असेही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा