You are currently viewing “पार्ट टाईम शिवसैनिक” विलास साळसकरनी जनतेच्या सेवेकरिता शिवसेना तालुकाप्रमुख पद वापरावे!

“पार्ट टाईम शिवसैनिक” विलास साळसकरनी जनतेच्या सेवेकरिता शिवसेना तालुकाप्रमुख पद वापरावे!

– भाजपा देवगड तालुका सरचिटणीस शरद ठुकरूल यांनी दिला संयमाचा सल्ला

राजकारणात कोणी कोणावर काय बोलावे याचेही काही किमान अकलेचे निकष असतात. सरपंच पदासाठी स्वतःच्या गावातून निवडून यायची औकात नसलेल्या विलास साळसकर यांनी भाजपा नेते खासदार नारायणराव राणे यांच्यावर टीका करण्यापूर्वी दहा वेळा आपण आधी कुठे आहोत याचा विचार करायला हवा होता. साळसकर यांनी संयम राखत सत्ता भाजपावर टीका करण्यापेक्षा जनतेच्या हितासाठी वापरली तर अधिक चांगले होईल, असा सल्ला देवगड तालुका भाजपा सरचिटणीस श्री शरद ठुकरूल यांनी दिला आहे.

खासदार नारायणराव राणे यांच्या ‘जनता दरबारा”ची विलास साळसकरांना एवढी धास्ती का? त्यांचा जनता दरबार हा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, स्वतःचे आर्थिक प्रश्न घेऊन पाठच्या दरवाजाने येणाऱ्यांनी या दरबाराची दहशत घेण्याची तशीही काही गरज नव्हती. बोक्याने डोळे मिटून दूध प्याले, तरी जनतेला दिसायचे ते दिसतेच. त्यामुळे उगाच मिशा साफ करून ‘मी नाही त्यातला’ हा आव आणून काही उपयोग नाही.

सेटलमेंटसाठी टीका करण्याचा साळसकरांचा उद्योग आता बंद पडत चालला आहे. कारण पूर्वी ज्यांच्यासोबत पाठच्या दारातून व्यवहार व्हायचे तेच आता यांच्या पक्षात पुढच्या दारात खुर्च्या टाकून बसले आहेत. यातून साळसकरांची झालेली गोची आम्ही समजू शकतो. पार्ट टाईम माहिती अधिकाराच्या त्यांच्या धंद्याबद्दल तर आता देवगड तालुका सरपंच संघटनेनेच पर्दापाश करत खरा चेहरा उघड केला आहे.

प्रत्येक निवडणुकीत “मेवाराम” बनणाऱ्या साळसकरांनी आता निवडणुकीनंतर तरी सरकारचा फायदा घेत जनतेची काय सेवा करता येईल यासाठी विचार करावा. विकासाच्या कामात भाजपा प्रत्येकाला सहकार्यच करत आली आहे. पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराला आमचा विरोध नाही, पण जिल्ह्यातील जनतेचे किती प्रलंबित प्रश्न सुटले आहेत याचीही प्रामाणिक वस्तुस्थिती साळसकरांनी जनतेसमोर मांडण्याची हिंमत करावी. केवळ कोणाचीतरी भाटगिरी करत आपले दुकान चालू ठेवण्यासाठी विलास साळसकर यांनी भाजपावर, तसेच पक्षाचे नेते खासदार नारायणराव राणे आणि आमदार नितेशजी राणे यांच्यावर नाहक टीका करणे थांबवावे, यातच त्यांचे सौख्य सामावले आहे, असा उपरोधिक सल्ला शरद ठुकरुल यांनी विलास साळसकरांना दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − two =