You are currently viewing २५ नोव्हेंबर पासून मालवण बंदर जेटी येथे साखळी उपोषण

२५ नोव्हेंबर पासून मालवण बंदर जेटी येथे साखळी उपोषण

प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात  उपोषणाचा निवेदनाद्वारे इशारा

 

मालवण :

 

मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिर (पद्मगड) ते सिंधुदुर्ग किल्ला अशी पर्यटकांची ने आण करण्यासाठी प्रवासी बोट सेवा मेरीटाइम बोर्डाच्या परवानगीने सुरु करण्यात आली. दोन वर्षात दोन लाख पेक्षा जास्त पर्यटक यांनी या सुरक्षित सेवेचा लाभ घेतला. मात्र दोन वर्षानंतर चढ उतारासाठी सुरक्षित सोय नसल्याचे कारण देऊन बोट सेवा परवानगी नाकारण्यात आली. व्यावसायिकांनी नियमानुसार फ्लोटिंग जेटीची सुविधा उपलब्ध केली. त्याचा अहवाल बंदर विभागामार्फत प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना पाठवला. मात्र हा अहवाल मुंबई येथे वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यास प्रादेशिक बंदर अधिकारी टाळाटाळ करत आहेत. मनमानी व भ्रष्ट कारभार सुरु असल्याचा आरोप दांडी येथील प्रवासी बोट सेवा किल्ला सर्व्हिस देणाऱ्या सहा व्यावसायिकांनी करत याविरोधात २५ नोव्हेंबर पासून मालवण बंदर जेटी येथे साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, बंदर विभाग व पोलिसांना देण्यात आले आहे.

दांडी येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट सेवा देणाऱ्या व्यावसायिकांनी मालवण बंदर विभाग कार्यालयात बंदर निरीक्षक श्री. गोसावी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी रुपेश प्रभू, मेघनाद धुरी, विठ्ठल केळूसकर, संतोष केळूसकर, महादेव बाळा कोयंडे, संतोष परब आदी उपस्थित होते. दांडी येथील दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला अशी प्रवासी बोट सेवा सुमेधा मेघनाद धुरी व विठ्ठल रामदास केळूसकर यांनी मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने सुरु केली होती. मात्र दोन वर्षानंतर मेरी टाइम बोर्डाने चढ उताराची सुरक्षित सोय नाही असे कारण देत परवानगी नाकारली. या दोन्ही बोटीतून दोन वर्षात सुमारे दोन लाखाच्या वर पर्यटकांची सुरक्षित ने – आण करण्यात आली असताना कोणत्याही पर्यटकाने चढ उताराबाबत तक्रार केली नाही, असे व्यावसायिकांनी निवेदनात म्हटले आहे. गतवर्षी प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी यावर उपाय म्हणून फ्लोटिंग जेटी किनाऱ्यावर उपलब्ध करण्याची मागणी व्यावसायिकांकडे केली. दांडेश्वर ते सिंधुदुर्ग किल्ला अशी बोट सेवेसाठी आणखी चार व्यावसायिकांनी मेरिटाईम बोर्डाकडे मागणी केली होती. त्यामुळे पूर्वीचे दोन व मागणी केलेले चार अशा सहा व्यावसायिकांनी दीड लाख रुपये खर्चून फ्लोटिंग जेटी उपलब्ध करून पर्यटकांना बोटीत चढ उताराची सोय करत प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांच्या मागणीची पूर्तता केली.

फ्लोटिंग जेटी बसविल्यानंतर ही जेटी मालवण बंदर निरीक्षक यांना दाखवून त्याचा अहवाल प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना पाठविण्याची विनंती केल्यावर बंदर अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करून प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना पाठवीला. मात्र हा अहवाल मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यास प्रादेशिक बंदर अधिकारी जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत, मनमानी व भ्रष्ट कारभार सुरु आहे असा आरोप व्यावसायिकांनी करत या विरोधात २५ नोव्हेंबर पासून साखळी उपोषण करणार असा इशारा सहाही व्यावसायिकांनी निवेदनातून दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा