You are currently viewing आनंद — सकारात्मक विचार

आनंद — सकारात्मक विचार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*आनंद– सकारात्मक विचार* 

 

माणसाचं जगणं हे त्याच्या विचारांनी सुंदर होत असते आणि त्याचे हे विचार जर सुंदर आणि सकारात्मक असतील तर त्याला सर्व जण नेहमीच आठवणीत ठेवतात.. ठेवत असतात..

सकारात्मक विचार, चांगला विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे.

फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारी महत्त्वाकांक्षा जीवनाला एक वेगळीच उत्तेजना देते

जगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ‘”सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत”…जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगलेच घडते

आपण पाहावं तसं आयुष्य आपल्याला दिसतं. प्रत्येक क्षण जर रसरसून जगायचा ठरवला तर खरोखर तसा छान अनुभव यायला लागतो. सकाळी उठल्याबरोबर डोळे उघडले की आजूबाजूला जे जे म्हणून दिसेल, सजीव, निर्जीव वस्तू, परिसर त्याला मनातल्या मनात मी ‘”गुड मॉर्निग’” म्हणते तसेच मनातल्या मनात स्वत:लाच ‘”गुड मॉर्निग’” म्हणते व स्वतःलाच एक छानस स्माईल पण देते.. अशानं एक सकारात्मकतेची भावना आपोआपच मनातून शरीरभर झिरपत जाते व ताजंतवानं वाटायला लागते.. उठल्यापासूनच सकारात्मक विचार करायला सुरुवात करते मग दिवसभरात कशीही परिस्थिती वा आव्हानं समोर आले तरीही त्या त्या क्षणांतला आनंद टिपते म्हणजे माइंडफुल राहायचं तो क्षण जगायचा. चहाच्या कपाला ओठांना होणारा पहिला स्पर्श असो वा चहाच्या पहिल्या घोटाची चव असो. मस्त एन्जॉय करते मी… पुढे घडत

जाणाऱ्या प्रत्येक घटनेतला चांगला भाग शोधते तशी मनाला सवयच लावून घेतली आहे म्हणा ना..! विपरीत, प्रतिकूल परिस्थितीतही हे धोरण ठेवायचं बरं.. ! तश्या परिस्थितीतही काहीतरी चांगलं असतंच असतं.. ते शोधायची मनाची धाटणी बनवायची. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्या विनाअट शांतपणे स्वीकारायच्या आणि शांतपणे पुढे जायचं…

आनंदी राहणं ही एक कला आहे. मुख्य म्हणजे ज्या गोष्टींमुळे,

व्यक्तींमुळे, क्षणांमुळे आनंद मिळतोय त्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहायचं.

आनंदी होण्यासाठी आपल्या सगळ्यांची धडपड असते किंबहुना पीस आणि ब्लिस, आनंद, मन:शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते.. आपल्याला कायमस्वरूपी आनंदी राहता येतं का? किंवा येईल का?, जीवनातला प्रत्येक क्षण आपण खऱ्या अर्थाने जगू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. मात्रं त्यासाठी आपल्याला विशिष्ट दिशेने प्रयत्न करावे लागतील. मनाच्या सवयीची, विचारांची धाटणी बदलायला लागेल. जगण्याविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागेल. हे मनाचं ‘रिप्रोग्रॅमिंग’ असेल. विशिष्ट पद्धतीनं मनाची मशागत झाली की मग तेथे आनंदाची, समाधानाची बीजं पेरली जातील. सकारात्मकता, भौतिक जीवनातील यश आणि आंतरिक आनंदाची निरंतर शक्यता निर्माण होईल. मनाची मशागत करताना काही भावना, विचार आपला भागच बनवून टाकाव्या लागतील.

स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल… इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किंमत करू नये किंवा ठरवू ही नये कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो नाही का?..

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा