You are currently viewing वन्य पशु दिन

वन्य पशु दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

 

*वन्य पशु दिन*

 

वन्य पशु दिन हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे जो दरवर्षी चार ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील प्राण्यांच्या कल्याण आणि संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.

 

प्राण्यांचे संरक्षक असीसी चे संत फ्रान्सिस यांच्या मेजवानीचा दिवस हा ०४ ऑक्टोबर असायचा म्हणून त्या संत फ्रान्सिस ज्यांना सर्वच सजीव प्राण्यांबद्दल अत्यंत प्रेम आणि करुणा होती त्यांच्या स्मरणार्थ वन्य पशु दिन साजरा केला जातो.

 

१९३१ साली* इटलीमध्ये (फ्लोरेन्स) पर्यावरण शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी गटाने या दिवसाची स्थापना केली.

 

या दिवसानिमित्त यावर्षीची थीम (संकल्पना) आहे.

*ग्रेट ऑर स्मॉल लव देम ऑल*

जागतिक उपक्रमाचे उद्दिष्ट प्राण्यांच्या हक्काबद्दल जागरूकता वाढवणे, नैतिक उपचारांना चालना देणे आणि चांगल्या कल्याण मानकासाठी समर्थन करणे हे आहे.

 

प्राणी हे पृथ्वीच्या परिसंस्थेचा अविभाज्य घटक आहेत. ते जैव विविधतेला हातभार लावतात आणि निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत करतात. प्रत्येक प्रजातीची त्यांच्या अधिवासात एक विशिष्ट भूमिका असते.

 

वास्तविक प्राणी हजारो वर्षापासून माणसाचे सोबती आहेत. प्रेम, सहचार्य आणि भावनिक आधार ते मनुष्याला देत असतात. हा बंध जपतच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही अंतिमतः मानवाची आहे.

 

जगभरातील अनेक संस्कृती आणि धर्म प्राण्यांना दैवत मानतात. उदाहरणार्थ हिंदू धर्मात गाईंना पूजनीय मानले जाते. प्राण्यांना अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणूनही पाहतात.

 

हिंदू धर्म संस्कृतीत नागपंचमी व्रत, मुंगूस व्रत, कोकिळाव्रत, बैलपोळा अशासारखे अनेक सण आणि व्रतांच्या माध्यमातून प्राण्यांना पूजले जाते. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या पशुदिनाच्या निमित्ताने प्राणी कल्याण आणि नैतिक उपचारांना प्रोत्साहन हाही एक मौलिक विचार त्यामागे आहे याची जाणीव होते.

 

वन्यजीव संरक्षण उपक्रमात जैव वैविध्य राखण्यासाठी, वन्य प्राणी आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. बेकायदेशीर वन्य जीव तस्करी रोखली गेली पाहिजे. त्यांच्यासाठी अरण्ये, वने, जंगलं यांचं संवर्धन झालं पाहिजे. त्यांच्या नैसर्गिक जाणीवांचा मानवाने कुठलाही तांत्रिक विकास कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी त्यांचे झोन्स कसे सांभाळले जातील याचा विचार सर्वप्रथम केला पाहिजे.

 

ट्रॉफी हंटिंग, शार्क फिनिंग यासारख्या अनेक क्रूर पद्धती प्राण्यांच्या लोकसंख्येत घट होण्याचा धोका ठरत आहेत. जागरूकता वाढवण्यासाठी या प्रथा बंद करण्याचे आवाहन जागतिक प्राणी दिनानिमित्त केले जाते.

 

हस्तिदंत, गेंड्यांची शिंगे आणि इतर मौल्यवान प्राण्यांच्या अवयवांसाठी केलेली शिकार या प्रजातींच्या लोकसंख्या कमी करत आहेत. पर्यावरणीय प्रदूषणामुळे सुद्धा प्राणी संख्येवर परिणाम होत आहे. जैव वैविध्य आणि निसर्गाचा समतोल याचा खूप घनिष्ठ संबंध आहे. म्हणूनच वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण हा फार महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी लोकांना शिक्षित करणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळवणे हे खूप महत्त्वपूर्ण आहे.

 

*जीवो जीवस्य जीवनम्* हा निसर्गाचा कायदा आहे. त्याचा योग्य पद्धतीने विचार करणे हे जरुरीचे आहे.वन्य पशुदिन साजरा करण्याचे हे उद्दीष्ट आहे.

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा