मांगेली व आयी ग्रामपंचाय सरपंचांचे भवितव्य ग्रामस्थांच्या हाती….

मांगेली व आयी ग्रामपंचाय सरपंचांचे भवितव्य ग्रामस्थांच्या हाती….

सोमवारी होणार ग्रामसभा व अविश्वासावर मतदान

दोडामार्ग
शिवसेना व भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या मांगेली व आयी येथील थेट सरपंचाच्या अविश्वास ठरावावर सोमवार २३ रोजी ग्रामसभा होऊन या दोन्ही सरपंचांचे भवितव्य ठरणार आहे. तालुक्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी होऊन या दोन्ही सरपंचावरती अविश्वास ठराव दाखल झाला होता. आयी सरपंच प्रार्थना मुरगुडी यांच्यावर ग्रामपंचायत मधील इतर सदस्यांनी एकाधिकार शाहीचा आरोप करत अविश्‍वास ठराव दाखल केला होता. तर मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्यावरही ग्रामपंचायतीतील ८ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. विशेष म्हणजे दोन्ही सरपंच ग्राम पॆनलवर निवडून येऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे आत्ताच्या अविश्‍वास ठरावाला पक्षिय राजकारणाने वेग घेतला असून सेना व भाजपाचे कार्यकर्ते आपापल्या परीने या दोन्ही गावांमध्ये जोर आजमावताना दिसत आहे. मांगेली सरपंचाच्या अविश्वास ठरावाविरुद्ध अनेक नाट्यमय घडामोडी घडताना अनेक विषय चर्चेला आले होते. यावेळी पंचायत समिती सदस्य बाळा नाईक यांनी उपोषण करताना अधिकाऱ्यांना आपल्या अधिकारांचा गैरवापर करून अविश्वास ठराव पारित केल्याचा आरोप करत या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली होती. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य नेतृत्वाने दखल घेत या उपोषणाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्याची ग्रामसभा व त्यानंतर होणारे मतदान कोणाच्या पारड्यात जाते, यावर अविश्वास ठराव अवलंबून आहे. कारण शिवसेनेचे ८ सदस्य या ठिकाणी असून त्यांचाही गावात लोकसंपर्क दाणगा आह. सेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी हे ही या ग्रामपंचायतीच्या रिंगणात असून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तर, आयी ग्रामपंचायत सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याठिकाणी सेनेचे अनेक पदाधिकारी उद्याच्या अविश्वास ठरावासाठी कंबर कसत असून याठिकाणी हा अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. याठिकाणची भाजपाची भूमिका स्पष्ट नसली तरीही गनिमीकाव्याने राजकारण पलटू शकत, हे मात्र निश्चित. एकूणच या दोन ग्रामपंचायत सरपंचाच्या अविश्वास ठरावावर या पक्षीय राजकारण रंगत असल्याने स्थानिक पातळीवर लढवली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक आता पक्षीय पातळीवर लढविली जाईल यात शंका नाही.
प्रशासनानेही उद्याच्या ग्रामसभा व अविश्वास ठरावावर होणाऱ्या निवडणुकीसाठी विशेष तयारी केली असून उद्या होणार्‍या निवडणुकीसाठी तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांच्यामार्फत निर्वाचन अधिकारी नेमून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आह. तसेच दोडामार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांची विशेष मदत शासन आदेशाप्रमाणे घेतली जाईल अशी माहिती मिळत आहे. सकाळी ग्रामसभा ११ वाजता सुरू होणार असून ग्रामसभेचा कोरम पूर्ण झाल्यानंतर मतदान होणार आहे, अन्यथा ग्रामसभा तहकूब होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा