You are currently viewing ३० जुलै रोजी मालवणात पौष्टिक आहार पाककला स्पर्धेचे आयोजन

३० जुलै रोजी मालवणात पौष्टिक आहार पाककला स्पर्धेचे आयोजन

मालवण :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे मिलेट वर्ष म्हणजेच भरड धान्य वर्ष म्हणुन घोषित केले आहे. याच अनुषंगाने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मालवणतर्फे रविवारी दि. ३० जुलै रोजी मालवण कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी सॅफ्रॉन या ठिकाणी दुपारी ३ ते सायं. ५ या वेळेत पौष्टिक आहार पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मालवण तालुका मर्यादित आहे.

या स्पर्धेसाठी वरी, बाजरी, ज्वारी, नाचणी यापासून बनविलेला पदार्थ असावा. यापैकी कमीत कमी दोन किंवा सगळे पदार्थ वापरून एक कोणताही पदार्थ बनवावा. या पदार्थासोबत आयोजकांनी निवडून दिलेल्या भाज्यांपैकी कमीत कमी दोन भाजी एकत्रित असतील असा कोणताही एक पदार्थ सोबत बनवून आणणे आवश्यक आहे. भाज्यांमध्ये भोपळा, दोडकी, पडवळ, वाली, गाजर, अळू, लालमाठ, मुळा, पालक, शेवग्याची शेंग यांचा समावेश असेल, एका स्पर्धकाला दोन पदार्थ बनवून आणणे आवश्यक आहे. दोन्ही पदार्थ असे असावेत जेणेकरून ते दोन्ही एकत्रित खाता येतील. दोन्ही पदार्थ घरून बनवुन आणायचे आहेत. दोन्ही पदार्थ साहित्य व कृती सहित लिहून आणणे आवश्यक आहे. त्यासोबत तुम्ही बनविलेला पदार्थ कसा पौष्टिक आहे, याचे स्पष्टीकरण थोडक्यात देणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ११११ व चषक, रु. ९९९ व चषक, रु.७७७ व चषक अशी पारतोषिके व सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धेकांनी अधिक माहिती व नाव नोंदणी साठी दि. २८ जुलै पर्यंत रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष अभय कदम (९४२००६१७१७) प्रणाली चव्हाण (८३२९८७४७८५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा