अखेर फुलस्टॉप!!!

अखेर फुलस्टॉप!!!

 

 ‘दख्खनचा राजा श्री ज्योतिबा’.. स्टार प्रवाह मराठी वाहिनीवरील मालिकेच्या चित्रीकरणाबाबतचा विरोध गावकऱ्यांकडून मावळला. महेश कोठारे यांनीही गावकऱ्यांना आश्वासक ग्वाही दिली.

स्टार प्रवाह मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या महेश कोठारे निर्मित ‘दख्खनचा राजा श्री ज्योतिबा’ या मालिकेतील चुकीच्या चित्रीकरणाबद्दल ग्रामस्थांनी भाविकांनी, आक्षेप नोंदवला होता. सदर मालिका ही पौराणिक व केदार विजय ग्रंथ यानुसार असावी अशी गावकऱ्यांची मागणी सुरुवातीपासूनच सुरू होती. यासाठी गावकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्री. अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा सौ. शालिनी ठाकरे यांच्याकडे धाव घेत याप्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज दिनांक १८ नोव्हेंबर २०२० रोजी राजगड मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली.

या बैठकीच्या चर्चेअंती महेश कोठारे यांनी गावकऱ्यांच्या भावना समजून घेत, त्यांना आश्वासन देत ग्वाही दिली की, ज्योतिबाचा इतिहास कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही, तसेच भविष्यात जे काही वाहिनीवर दाखवले जाईल त्याच्यात कोणतेही आक्षेपार्ह ऐतिहासिक चित्रण नसेल, अशी ग्वाही त्यांनी गावकऱ्यांना दिली.

यावेळी स्टार प्रवाह मराठी चॅनेल, महेश कोठारे आणि गावकरी यांच्यात मध्यस्थीची यशस्वी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी पार पाडल्याने गावकऱ्यांनी समजुतीपणा दाखवत मालिकेच्या चित्रीकरणाला कोणताही विरोध गावाकडून केला जाणार नाही आणि शूटिंग व्यवस्थित पार पडेल असा शब्द महेश कोठारे यांना दिला.

यावेळी गावकरी, महेश कोठारे आणि स्टार मराठी चॅनेलचे सतीश राजवाडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी गावचे ग्रामस्थ अजित धरणे, जयवंत शिंगे (सर), नेताजी दादर्णे, जगनाथ दादर्णे, आनंदा लादे, सुनिल नवाळे, गोरख बुणे,नवनाथ लादे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे , मनसे पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे, पन्हाळा तालुका सचिव लखन लादे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा