You are currently viewing एकता दिव्यांगा विकास संस्थेचे कणकवली वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन

एकता दिव्यांगा विकास संस्थेचे कणकवली वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन

दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व वितरण कणकवली उपजिल्हा रुग्णालयात करा

कणकवली

कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे तिन वेळा फेऱ्या माराव्या लागतात. एवढ्या दूर जाणं हे सर्वसामान्य दिव्यांग व्यक्ती व त्याच्या नातेवाईकांना सोयीस्कर नाही. कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मिळावे, अशा आशयाचे निवेदन एकता दिव्यांग विकास संस्थेच्यावतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नागनाथ धर्माधिकारी यांना देण्यात आले.

कणकवली वैद्यकीय अधीक्षकांना दिलेला निवेदनात म्हटले आहे की, एकता दिव्यांग विकास संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींचा सर्व्हे केला असता ६० टक्के दिव्यांग व्यक्तींजवळ दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. प्रमाणपत्र काढण्यासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे चार ते पाच वेळा ये-जा करणे दिव्यांगांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना शक्य नसते. अनेक वेळा कॅम्पच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्र देण्यात आली होती. मात्र काही व्यक्तींचे प्रमाणपत्र दोन वर्षे होऊन गेली तरी आलेली नाही. दिव्यांगांच्या या समस्येकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी लक्ष द्यावे. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना महिन्यातून किमान दोन दिवस दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्र व तपासणीसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावेत. असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी डॉ. धर्माधिकारी म्हणाले, आपण या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करू. तसेच याबाबत पत्रव्यवहार देखील करू आणि दिव्यांग व्यक्तींना निर्माण होणाऱ्या समस्या मार्गी लावू. यावेळी संस्थाध्यक्ष सुनील सावंत, बाळकृष्ण बावकर, यलप्पा कट्टीमणी, मयुर ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा