अलिबाबा उद्योगाचे संस्थापक जॅक मा यांना चीनचा झटका!!!!

अलिबाबा उद्योगाचे संस्थापक जॅक मा यांना चीनचा झटका!!!!

 

चीनमधील कम्युनिस्ट सरकारची धोरणे आणि राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्यावर टीका करणे अलिबाबा उद्योगाचे संस्थापक जॅक मा यांना अतिशय महागात पडले असून, चीनचे सरकार अलिबाबा आणि अँट समूह उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शांघायमध्ये दोन महिन्यांपूर्वी जॅक मा यांनी एक भाषण केले होते, त्यात त्यांनी बँकिंग व्यवस्था आणि सरकारी बँकांसंदर्भात टीका केली होती. त्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत जगभरात चर्चा सुरू असून, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जॅक मा यांनी २४ ऑक्टोंबर रोजी केलेल्या भाषणात चीनमधील सरकारी यंत्रणेसह बँकिंग व्यवस्था आणि सरकारी बँकांवर कडाडून टीका केली होती. या बँका म्हणजे अर्थव्यवस्था गहाण टाकणाऱ्या लुटारू संस्था असल्याचे त्यांनी म्हटले होते़ सरकारने तरुण उद्योजक आणि नवीन उद्योगांना दडपणारी ही यंत्रणा बदलावी, असे आवाहन त्यांनी केले होते़ त्यांच्या या भाषणावर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर जॅक मा यांच्या अँट ग्रुपचे आयपीओ रोखण्यात आले. अलिबाबा समूहासह इतर उद्योगांवरही निर्बंध घालण्यात आले, त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. आता जॅक मा यांच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा सरकारचा विचार असल्याचे पुढे येत असून, याद्वारे देशातील बाकी कंपन्यांना इशारा देण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा