तिमिरातुनी तेजाकडे…. तरुण शेतकऱ्यांची आत्मनिर्भरते कडे वाटचाल
प्रगतिशील शेतकऱ्यानं समवेत, रणजित देसाई

तिमिरातुनी तेजाकडे…. तरुण शेतकऱ्यांची आत्मनिर्भरते कडे वाटचाल

तिमिरातुनी तेजाकडे…. तरुण शेतकऱ्यांची आत्मनिर्भरते कडे वाटचाल

कुडाळ :-

गेले सहा महिने संपूर्ण भारतात असलेल्या लाॅकडाऊन मुळे अनेकांचे कंबरडेच मोडले आहे. अनेक जणांना आपले उद्योग धंदे बंद करावे लागले. बऱ्याच लोकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले. मोलमजुरी करणाऱ्यांचे रोजगार बुडाले.अशा कठीण परिस्थितीत आपल्या उदरनिर्वाहासाठी नेमके करायचे काय असा प्रश्न अनेकांसमोर पडला. नेमके याच कठीण वेळी अनेकांचे लक्ष गेलं वर्षानुवर्षे पडीक असलेली आपल्या जमीनीकडे. ज्या जमिनीवर अनेक वर्षे कोणी फिरकले नव्हते तेथे नांगर फिरले, पेरणी झाली आणि आता तर पिकं बऱ्यापैकी डोलत आहे.

मात्र यापुढे जाऊन कुडाळ तालुक्यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन “सामुदायिक शेती” ची संकल्पना रुजू घातली. आंबडपाल आणि कुडाळ एमआयडीसी गणेश वाडी येथे सूर्यकांत कुंभार, जयराम परब व तानाजी सावंत यांनी एकत्र येऊन काही एकर पड जमिनीवर भाजीचे मळे फुलवले आहेत आणि तेदेखील 100 % सेंद्रिय (ऑरगॅनिक). कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन या तरुण शेतकऱ्यांनी गावागावात बेरोजगार असलेल्या तरुणांना एक नवी दिशा दाखवली आहे. कुडाळ एमआयडीसी वरून माड्याच्यावाडी ला जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला आपली नजर गेली तर काही एकर मध्ये पिकविला भाजीचा मळा आपले लक्ष निश्चितच वेधून घेईल. यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या, काकडी, शिराळी, भोपळा, दुधी भोपळा, भेंडी, पडवळ, लालपाला भाजी, मुळा भाजी इत्यादी प्रकारची भाजी आपणास पहावयास मिळते. या भाजीच्या मळ्यात जाऊन प्रत्यक्ष वेलीवर लागलेली भाजी पाहून त्यातील भाजी खरेदी करण्यातील मजा काही औरच असते. मळ्याच्या बाहेरच यांनी ताज्या ताज्या भाजीचे दुकान देखील थाटलेले आहे‌‌. भाजीचे दर हे देखील बाजारभावापेक्षा निश्चितच कमी आहेत. विशेष म्हणजे याकरता वापरण्यात येणारी सर्व बियाणी ही स्थानिकच आहेत‌. काही वेगळे प्रयोग करण्याकरता राज्याच्या अन्य भागातील आदिवासी भागातील बियाणी देखील आणून त्याची लागवड केली आहे. आज आपण बाजारातून जी भाजी खरेदी करतो त्यात सर्रासपणे रासायनिक खतांचा वापर करण्यात येतो. मात्र या भाजीच्या मळ्यामध्ये केवळ आणि केवळ सेंद्रिय पद्धतीने (शेणखत, लेंडीखत, गांडूळ खत इ.) चा वापर करून भाजी पिकविण्यात येते.

या तरुणांशी चर्चा केल्यानंतर खरोखरच खूप भारावून जायला होते. या तरुणांना केवळ चार पाच एकर क्षेत्रापुरती शेती न करता सामुदायिक तत्त्वावर (ग्रुप फार्मिंग) च्या माध्यमातून मोठ्या क्षेत्रावर लागवड करायची आहे. ती देखील अत्यंत सूक्ष्म रीतीने नियोजन करून. कोणत्या मोसमात कोणती भाजी खाल्ली जाते याचा अभ्यास करून त्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणात भाजी पिकवण्याचा त्यांचा मानस आहे. भविष्यात या सर्व भाज्यांचं योग्य रीतीने “ब्रँडिंग व पॅकिंग” करून ती योग्य दरात घरोघरी पोचवण्याची देखील या तरुणांची इच्छा आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ, भगीरथ प्रतिष्ठान कुडाळ, लुपिन फाउंडेशन आदी अनेक संस्थांची मदत घेऊन हे तरुण मार्गक्रमण करत आहे. खरोखरच खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे की हळूहळू आपल्याकडे सर्वजण आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत आणि त्याची सुरुवात ही ग्रामीण भागातून होत आहे. माझी आपणा सर्वांना देखील विनंती आहे की घाटमाथ्यावरील भाजी खरेदी करण्यापेक्षा आपल्या भूमिपुत्रांनी आपल्या कष्टाने व मेहनतीने पिकवलेली ही सेंद्रिय भाजी घेतल्यास आपणास खात्रीशीर व दर्जेदार भाजी मिळेल पण त्याचबरोबर या तरुणांची उमेद निश्चितच वाढेल. भविष्यात गावागावातून याच कृतीचे अनुकरण होईल व एक दिवस असा येईल जेव्हा आपल्या जिल्ह्यातील भाजी ही परजिल्ह्यात विक्रीकरता पाठवली जाईल. आणि तो सुवर्ण दिवस लवकरच येऊ हीच ईश्वराकडे प्रार्थना!

प्रतिक्रिया व्यक्त करा