विटे / प्रदीप जोशी :
यंदा पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई, चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्या सर्व परीक्षा 15 दिवस अगोदर घेण्याचा विचार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षी शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा मार्चअखेरपासून ते जूनपर्यंत सुरू असतात. एकूण 350 ते 400 अभ्यासक्रम असून, 850 हून अधिक सत्र परीक्षा घेण्यात येतात. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा कालावधी कमी करण्याचे नियोजन करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी रविवारीही पेपर घेण्यात येतील. इतर सुट्टयांवेळीही पेपर घेण्यात येऊ शकतील का याच्यावरही समिती गठित करून त्याच्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रथम वर्ष इंजिनिअरिंग, फार्मसीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेमुळे विलंबाने सुरू होतात. त्यांच्या पहिल्या सत्राला वेळ लागतो. त्यांचा अध्यापनाचा कालावधी 90 दिवसांचा असेल तर तो 70 दिवसांत कसा पूर्ण होईल तसेच परीक्षेचा कालावधीही कसा कमी होईल याचाही विचार केला जाणार आहे.
यासाठी रोज 1 ते 2 तास जादा घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच रविवारीही ऑनलाइन लेक्चर घेण्याचा विचार आहे, जेणेकरून दरवर्षी पंधरा दिवस अगोदर परीक्षा घेता येईल, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
