You are currently viewing करुळ-घोरपीवाडीत भरधाव रिक्षाची दुचाकीला समोरून धडक; मायलेक गंभीर जखमी

करुळ-घोरपीवाडीत भरधाव रिक्षाची दुचाकीला समोरून धडक; मायलेक गंभीर जखमी

करुळ-घोरपीवाडीत भरधाव रिक्षाची दुचाकीला समोरून धडक; मायलेक गंभीर जखमी

रिक्षाचालकाविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

कणकवली :

करुळ-घोरपीवाडी परिसरात हुंबरट ते फोंडाघाट जाणाऱ्या डांबरी मार्गावर भरधाव ऑटो रिक्षाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने मायलेक गंभीर जखमी झाले. शुभम अनंत जाधव (२०) आणि त्यांच्या आई वंदना अनंत जाधव (४०) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी सायंकाळी शुभम जाधव हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीवर मागे आई वंदना जाधव बसल्या होत्या. करुळ येथील मधु मंगेश कर्णिक यांच्या घराजवळ ते आले असता, हुंबरटच्या दिशेने फोंडाघाटकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑटो रिक्षाने चुकीच्या बाजूने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात शुभम यांच्या उजव्या पायाला, कंबरेला, डोक्याला तसेच शरीराच्या उजव्या बाजूला दुखापत झाली. तर त्यांच्या आई वंदना यांच्या डोक्याला व कपाळाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मायलेकांना मदत केली. त्यानंतर त्यांना खासगी वाहनातून तातडीने कणकवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी सत्यवान धोंडू जाधव (४३, रा. करुळ-घोरपीवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रिक्षाचालक दिगंबर दशरथ दाभोलकर (२२, रा. वडाचापाट-कुळकरवाडी, ता. मालवण) याच्याविरोधात भरधाव वेगाने व चुकीच्या बाजूने रिक्षा चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा