You are currently viewing आनंदी आनंद गडे!

आनंदी आनंद गडे!

आनंदी आनंद गडे!

ज्येष्ठ नागरिकांचे बहारदार कविसंमेलन, ज्येष्ठांनी सादर केली आयुष्यातील पहिली कविता

चिंचवड –

आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड यांच्या वतीने गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सभासद असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे “आनंदी आनंद गडे” हे कविसंमेलन चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन करण्यात आले आणि कविसंमेलनाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, उपाध्यक्ष अशोक नागणे, कोषाध्यक्ष रवींद्र झेंडे, गुलाबराव बिरदवडे, ज्येष्ठ कवी कैलास भैरट उपस्थित होते.
आनंद ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठांनी आपल्या आयुष्यातील पहिली कविता लिहून उत्स्फूर्तपणे मंचावर सादर केली.
प्रज्ञा आगरकर (आई), रवींद्र झेंडे (त्याचं काय करू, बंधक), अशोक चौबल (धरणीमातेचे क्रंदन आणि विडंबन), नृसिंह पाडुळकर (कौतुक, एकटा मी), अश्विनी कोटस्थळे (जगणं, नवरात्र), योगिता कोठेकर (दिवाळी, घेऊन जा ना रे), दत्तात्रय पुजार (स्वप्न, वाढदिवस), उमा पाडुळकर (व्यथा ज्येष्ठांची, आमची सोनू) आणि कैलास भैरट यांनी (डाव आयुष्याचा) या कविता सादर करून “आनंद द्या, आनंद घ्या” या संघाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे “आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा” अशी वातावरणनिर्मिती केली.
कविसंमेलनाचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले, “कविता लिहायला वयाचे बंधन कधीच नसते. आज या कविसंमेलनातून ज्या ज्येष्ठ कवींनी कविता सादर केल्या आहेत, त्या अनुभवसंपन्न आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे हे कविसंमेलन त्यांच्या कवितांच्या प्रथम सादरीकरणामुळे ऐतिहासिक झाले, असेच म्हणावे लागेल.”
कवी सुरेश कंक यांनी “योग करावा.. ध्यान लावुनी विठ्ठल पहावा” ही योगावरची कविता सादर केली. वाढत्या वयात ज्येष्ठांनी सुरक्षितता बाळगावी म्हणून ‘सुरक्षा गीत’ सादर केले.
कविसंमेलनापूर्वी २६/११ च्या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या निष्पाप नागरिकांना, हुतात्मा झालेल्या पोलिसांना, जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच “संविधान दिना”निमित्त अरविंद सोनटके यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर यांनी केले.
ज्येष्ठ कवी कैलास भैरट यांनी बहारदार सूत्रसंचालन केले, तर नृसिंह पाडुळकर यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल उन्हाळे,विजय निकुंभ यांनी विशेष परिश्रम घेतले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास संघाचे पदाधिकारी आणि सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

*वृत्तांकन – कैलास भैरट*
*(भ्रमणध्वनी : 9970622668)*

प्रतिक्रिया व्यक्त करा