विविध शाळांमधील १००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
विटा / प्रदीप जोशी :
लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा (स्वायत्त संस्था), पॉलिटेक्निक आणि इंजीनियरिंग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘आदर्श टॅलेंट सर्च परीक्षा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. या परीक्षेमध्ये विविध शाळांमधील इयत्ता दहावीच्या १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला, गुणवत्तेला आणि सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देण्याची संधी देण्यात आली. यावेळी सर्व विभागांच्या विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील शैक्षणिक सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, उपलब्ध तंत्रज्ञान, अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील करिअरच्या संधी याविषयी प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिप्लोमा अभियांत्रिकी शिक्षण, विविध तंत्रज्ञान शाखा आणि भविष्यातील रोजगार व करिअरच्या संधी यांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसोबत आलेल्या शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. वैभव दादा पाटील यांच्या प्रेरणेतून करण्यात आले. संस्थेचे कार्यकारी संचालक मा. श्री. पी. टी. पाटील फायनान्स डायरेक्टर मा. श्री. रविराज सूर्यवंशी, कॅम्पस डायरेक्टर पूजा पाटील, प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील आणि रजिस्ट्रार चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
परीक्षेचे संपूर्ण नियोजन व आयोजन यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुख, डीन, प्रवेश विभागाचे ग्रुप इन्चार्ज, ग्रुप को ऑर्डिनेटर्स, परीक्षा पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ऑनलाइन टेस्ट पेपर तयार करण्यासाठी ओम चौगुले व डॉ. सूरज कुंभार यांनी विशेष सहकार्य केले.
एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना विविध शाळांमधून महाविद्यालयात आणणे, त्यांचे नियोजन, परीक्षा व्यवस्थापन, विभागभेटी, मार्गदर्शन आणि आदरातिथ्य या सर्व बाबींचे उत्कृष्ट नियोजन सर्वांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या पार पडले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा शोध घेऊन त्यांना तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याची दिशा देण्याचा आदर्श संस्थेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.
या संपूर्ण परीक्षेचे समन्वयक म्हणून प्रा. पी. एस. शिंदे आणि प्रा. अमितकुमार साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेऊन संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन केले.
