You are currently viewing मराठी तरुणांना कलेक्टर करणारे व्यक्तिमत्व पासपोर्ट मॅन डॉ.ज्ञानेश्वर मुळे 

मराठी तरुणांना कलेक्टर करणारे व्यक्तिमत्व पासपोर्ट मॅन डॉ.ज्ञानेश्वर मुळे 

 

मराठी तरुण मोठ्या संख्येने प्रशासनात जावेत यासाठी दिल्लीतला एक माणूस सतत राबत आहे. त्या मुलांना गायडन्स करणे. त्यांचे मॉक मुलाखती घेणे. वेगवेगळ्या मराठी आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांचा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समन्वय साधून देणे या सर्व गोष्टी एक आयएफएस अधिकारी करीत आहे. हा माणूस केवळ अधिकारीच नाही तर एक चांगला लेखक आहे. संपूर्ण जगात पासपोर्ट मॅन म्हणून त्याची ओळख आहे. त्या माणसाचे नाव आहे डॉ. ज्ञानेश्वर मुळे.

मी जेव्हा जेव्हा दिल्लीला जातो तेव्हा तेव्हा श्री ज्ञानेश्वर मुळे यांना भेटतो. आणि मी जेव्हा त्यांच्या कोल्हापूर भागात जातो तेव्हा मुळे सरांना फोन करतो. सर मी कोल्हापूर सातारा सांगली भागात आहे. एवढा मोठा उच्चपदस्थ अधिकारी स्वतः पुढाकार घेतो आणि माझे डझनभर कार्यक्रम वेगवेगळ्या संस्थांमध्ये घडून आणतो. माझी राहण्याची व्यवस्था करतो .माझ्या जेवणाची व्यवस्था करतो. माझ्या गाडीची व्यवस्था करतो. म्हणतात ना

जितने वाले कोई अलग काम नही करते व

हर काम अलग ढंग से करते है

 

या व्याख्येमध्ये श्री ज्ञानेश्वर मुळे हे तंतोतंत बसतात. हे ज्ञानेश्वर मुळे येत्या 20 तारखेला अमरावतीला सायंकाळी पाच वाजता येत आहेत. दैनिक हिंदुस्थानने प्रभास सन्मान या कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविलेले आहे. हा कार्यक्रम अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा जोशी हॉल मध्ये 20 तारखेला सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

 

घाऱ हिंडते आकाशी

लक्ष तिचे पिलापाशी

 

या न्यायाने श्री ज्ञानेश्वर मुळे फार मोठे झाले तरी त्यांचे लक्ष पूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठी मुलांकडे आहे. मराठी मुले प्रशासनात गेली पाहिजेत . सनदी अधिकारी झाली पाहिजेत. आयपीएस झाली पाहिजेत यासाठी त्यांनी पुढचं पाऊल नावाची संस्था स्थापन केली. दिल्लीत भारतातील सगळ्या मराठी अधिकाऱ्यांना गोळा केलं. दिल्लीत मराठी मुलगा आयएएसच्या मुलाखतीसाठीआला तर त्याची राहण्याची व्यवस्था त्याचे मुलाखतीची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी पुढचं पाऊल उचलले आहे. त्यामध्ये सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्री महेश भागवतांना सहभागी करून घेतलं आहे. श्री महेश भागवत सध्या हैदराबादला पोलीस आयुक्त आहेत. श्री मुळे सरांनी हाक दिली तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील व जगातील आयएएस आयपीएस आयआरएस अधिकारी त्यांच्या हाकेला ओ देतात.

आपल्या आयएएस आयपीएस केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी ते भव्य कार्यक्रम दिल्लीला भव्य सभागृहात आयोजित करतात.या कार्यक्रमाचे स्वरूप राष्ट्रीय असते. आपल्या नवीन आयएएस पोरांचे स्वागत तसेच आयएएस करणाऱ्या दिल्लीतील मराठी मुलांना नवीन आयएएस मुलांचे मार्गदर्शन हा समन्वय ते घडवून आणतात. हा त्यांचा उपक्रम किती तरी वर्षापासून सुरू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथे आयएएस आयपीएस आय आर एस अधिकारी हे स्वयंसेवकासारखे वागतात.

मी दरवर्षी न चुकता या कार्यक्रमाला जातो. आपल्या विदर्भाचे सुपुत्र डॉ. चेतन श शेलोटकर हे देखील पुढचं पाऊल या मुळे सरांच्या संघटनेमध्ये आहेत. ते देखील आपलं असिस्टंट कमांडंट हे पद बाजूला ठेवून एका कार्यकर्त्याप्रमाणे या सत्कार सहभागामध्ये सहभागी होतात.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे महाराष्ट्राच्या मातीतून आलेले आहेत. परदेशात ते वेगळ्या देशात फिरत गेले आणि पासपोर्टच्या संदर्भात त्यांनी इतके उल्लेखनीय काम केले की जगाच्या इतिहासामध्ये त्यांची नोंद पासपोर्ट मॅन म्हणून झाली. अतिशय सुस्वभावी असे हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच आम्ही जेव्हा जेव्हा दिल्लीला जातो तेव्हा तेव्हा आमची पावलं श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्याकडे वळतात हे वेगळे सांगणे न लागे.

मराठी तरुणांना त्यांचा आत्मविश्वास वाढविणे. त्यांच्यामध्ये जागृती करणे त्यांना आवश्यक त्या सुख सोयी व सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी त्यांनी प्रत्येक वेळेस पुढाकार घेतलेला आहे. सनदी अधिकारी म्हणजे तसं व्यस्त व्यक्तिमत्व .पण या आपल्या व्यस्त कार्यक्रमातून ते वेळ काढतात. सरांच्या सौभाग्यवती देखील या सनदी अधिकारी आहेत. पण हे दोन्ही पती-पत्नी तन मन धनाने पुढचं पाऊल या उपक्रमासाठी समर्पित आहेत. सर आता सेवानिवृत्त झालेले आहेत .पण सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी या कार्याला वाहून घेतले आहे.

खरोखरच डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारखी माणसे जर समाजात अजून काही निर्माण झालीत तर महाराष्ट्रातील आय ए एस चा टक्का हा नक्कीच उंचावेल यातील मात्र शंका नाही.

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा