You are currently viewing जनगणना २०२७ च्या कामात अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जनगणना २०२७ च्या कामात अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

*लोकसंख्या गणना जिल्हास्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ*

सिंधुदुर्ग :

जनगणना २०२७ अंतर्गत लोकसंख्या गणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची अचूक नोंद होणे महत्त्वाचे आहे. कोणतेही घर किंवा व्यक्ती गणनेतून सुटणार नाही, याची दक्षता घेताना कामकाजात तांत्रिक चुका होऊ नयेत, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण गांभीर्याने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे. जनगणनेच्या कामात अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात दि. १८ व १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित दोन दिवसीय अनिवासी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जनगणना महासंचलनालयाच्या सहायक संचालक तेजल कटारे, सांख्यिकी अन्वेषक तुषार पाटील यांनी प्रशिक्षण दिले. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार चैत्राली सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व चार्ज अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, अतिरिक्त चार्ज अधिकारी, जनगणना लिपिक व तांत्रिक सहायक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने कामकाज पार पडले. आता आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करीत आहोत. लोकसंख्या गणनेचा हा टप्पा अधिक जबाबदारीचा आणि काहीसा आव्हानात्मक आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामगिरी कायम राखत दुसऱ्या टप्प्यातही प्रत्येक नोंद अचूक होईल, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात बंद घरांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक घराची खातरजमा होणे आवश्यक आहे. कोणतेही घर किंवा व्यक्ती गणनेतून सुटणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.

या संपूर्ण प्रक्रियेत प्रगणक आणि पर्यवेक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष कामकाजातील तांत्रिक बाबी स्पष्ट कराव्यात. सर्व चार्ज अधिकाऱ्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या स्तरावरही संबंधित कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण द्यावे. आगामी कामकाजासाठी त्यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा व चार्ज स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोकसंख्या गणना (Population Enumeration – PE) टप्प्यातील कार्यपद्धती, तांत्रिक बाबी, नोंदणीची प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. जनगणनेचे काम प्रभावीपणे, अचूकरीत्या आणि विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते प्रशिक्षकांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्ह्यातील जनगणना स्मरणिकेचे अनावरण जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय प्रशिक्षणातून आगामी लोकसंख्या गणना टप्प्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय मार्गदर्शन मिळणार आहे.

*जनगणना २०२७* : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच ‘घरयादी व घरगणनेचे’ क्षेत्रीय कार्य महाराष्ट्र राज्यमध्ये पूर्ण झाले आहे. ‘लोकसंख्या गणना’ हे दि. २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत करण्यात येणार असून, दि. १ ते ५ मार्च २०२७ या कालावधीत फेरतापासणी फेरी पार पडेल. तसेच नागरिकांना दि. १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत स्व-गणनेद्वारे स्वतःची माहिती नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध असेल. जनगणनेसाठी दि. १ मार्च २०२७ रोजीचे ००:०० वाजता ही संदर्भ वेळ निश्चित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा