You are currently viewing ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन

‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन

२६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वितरण करणार

सिंधुदुर्ग : ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत भारतीय संविधानाची उद्देशिका पोहोचविण्यासाठी तसेच संविधान दिन साजरा करण्याच्या नियोजनासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक प्रभारी अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली १७ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली.

या बैठकीस सहायक आयुक्त, समाज कल्याण संतोष चिकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाचे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

संविधान उद्देशिकेचे वितरण करताना रमाई आवास योजना, विशेष घटक योजना, प्रधानमंत्री आवास योजना व मोदी आवास योजनेचे लाभार्थी, दिव्यांग, विधवा, वंचित घटक तसेच अत्याचारपीडित लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले.

ग्रामीण भागात सर्व पंचायत समिती कार्यालयांमार्फत, तर शहरी भागात सर्व नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयांमार्फत संविधान उद्देशिकेचे लवकरात लवकर वितरण करण्यात यावे. तसेच वितरणाचा अहवाल सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वितरण करून संविधान दिन साजरा करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

या बैठकीत भारतीय संविधानाची उद्देशिका (प्रस्ताविका) वितरणाचे नियोजन आणि २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा