रविवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी अमरावतीच्या श्री संत गाडगेबाबा मंदिरामध्ये वऱ्हाडी बोली साहित्य संमेलन होत आहे त्यानिमित्त
व-हाडी बोली साहित्य संमेलन
हा महिना तसा अमरावतीच्या साहित्यिक विश्वाच्या दृष्टिकोनातून समृद्ध ठरलेला आहे. मागच्या दिवाळीच्या काळात तपोवन येथे विदर्भ साहित्य संघाचे कवी संमेलन झाले तर शनिवार रविवारला म्हणजे 14 15 नोव्हेंबरला शब्दवेल साहित्य संमेलन झाले . आणि आता रविवार दिनांक 22 रोजी अमरावतीच्या गाडगे नगर परिसरातील श्री गाडगेबाबा मंदिरात असलेल्या सभागृहहात प्रसिद्ध मराठी लेखक श्री आबासाहेब कडू यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षीचे व-हाडी बोली साहित्य संमेलन होत आहे. नंतर 28 आणि 29 तारखेला प्राध्यापक सतीश तराळ यांच्या पुढाकाराने पंचवटी चौकातील विमलाबाई देशमुख सभागृहामध्ये परत दोन दिवसाचे साहित्य संमेलन होत आहे. एकाच महिन्यात तीन चार साहित्य संमेलन आहेत म्हणजे हा एक विक्रमच म्हणावा लागेल.
महाराष्ट्र शासनाने देखील बोली भाषेची दखल घेतलेली आहे. गतवर्षीपासून विभाग वार बोली भाषेवर कार्यशाळा संमेलन सुसंवाद आयोजित करण्यात आलेले आहेत. साहित्य संमेलनाचे विकेंद्रीकरण करणे जसे गरजेचे आहे तसेच बोली भाषेचे संवर्धन करणे देखील गरजेचे आहे. नाहीतर काही काळानंतर बोलीभाषा लुप्त होण्याची दाट शंका आहे.
प्रत्येक भाषेमध्ये एक गोडवा असतो. आपण दिल्लीला गेलो आणि तिथे मराठी बोलणारा माणूस असला तर तो आपल्याला आपलासा वाटतो. एखादा राजकीय नेता जेव्हा महाराष्ट्रात येतो आणि तो भाई और बहनों च्या ऐवजी बंधू आणि भगिनींना म्हणतो आणि दोन चार वाक्य मराठीत बोलतो तर आपल्याला तो नेता देखील आपलासा वाटावा लागतो.
तमिळ मल्याळम तेलगू कन्नड ह्या भाषा व त्यांच्या बोली आपल्याला ऐकायला जरी अडम-धडम वाटत असल्या तरी त्या भाषांवरही प्रेम करणारे त्या त्या प्रदेशातील लोक आहेत. आणि एक भाषा म्हटली म्हणजे तिच्या अनेक बोलीभाषा असतात. असे म्हटले जाते की प्रत्येक 12 कोसावर बोली बदलते आणि ते खरेही आहे .आपण अकोट हिवरखेड या भागात गेलो तर तिथे मी अटी गेलो होतो मी तटी गेलो होतो असा शब्दप्रयोग कानावर पडतो. आपणास ते विचित्र वाटते. पण त्या प्रदेशात ते रुजले आहे.
काही काही बोली भाषेतील शब्द अथांग आहेत. जीवनाला स्पर्श करून जाणारे आहेत. अनेक वेळा ग्रगांथिक भाषेमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये मध्ये जो हृदयस्पर्शी आशय व्यक्त होत नाही तो बोली भाषेमध्ये अतिशय समृद्धपणे व्यक्त होतो.
वऱ्हाडी बोलीने एक काळ गाजवला आहे आणि आता पण गाजत आहे. मिर्झा रफी अहमद बेग सारखा कवी सोशल मीडियावर एक कोटीच्या वर लाईक घेतो. याचाच अर्थ लोकांना बोलीभाषा आवडते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात असलेला भारत गणेशपुरे हा आपला अमरावतीचा कलावंत जी व-हाडी बोली बोलतो त्या व-हाडी बोली मुळे हा कार्यक्रम लोकप्रिय झालेला आहे. वऱ्हाडी भाषेची लकबच वेगळी आहे. आणि म्हणूनच शरदचंद्र सिन्हा देविदास सोटे विठ्ठल वाघ मधुकर केचे शंकर बडे मिर्झा रफी बाबाराव मुसळे मीरा ठाकरे राजा धर्माधिकारी गौतम गुडघे राजा तारे सारखे व-हाडी कवी
आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतात.
अमरावतीला बोली भाषेचे काम करण्यामध्ये श्री आबासाहेब कडू पुढाकार घेत आहेत.त्यांनी आपली पुस्तकेच व-हाडी मध्ये लिहून आपला व-हाडी विषयीचा आदर व्यक्त केलेला आहे. विठ्ठल वाघांच्या कविता तर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. इतक्या त्या प्रभावी झालेल्या आहेत. प्रा.देविदास सोटे यांनी व-हाडी भाषेला म्हणजेच बोलीला न्याय देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले .वऱ्हाडी बोलीचा त्यांनी शब्दकोश देखील तयार केला आणि त्यांनी प्रामुख्याने वऱ्हाडी मध्येच लिहिले. तत्कालीन काळात देविदास सोटे हे व-हाडी लिहिणाऱ्यामध्ये अग्रक्रमावर होते . त्यांच्या विनोदी कवितांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.
मराठी भाषेचा जन्म अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे झालेला आहे. विवेकसिंधू व लीळाचरित्र तसेच इतर ग्रंथामध्ये जी भाषा आलेली आहे ती भाषा अतिशय समर्पक सगळ्यांना समजेल अशी आहे .छोट्या छोट्या वाक्यात माहीमभट यांनी व इतर लेखकांनी तत्कालीन प्रसंग म्हणजेच लीळा अतिशय सुरेख रेखाटल्या आहेत.
गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागातील झाडी बोली तर साहित्याच्या प्रांतातील अभूतपूर्वक क्रांतीच म्हणावी लागेल. झाडीबोलीची नाटके पुणे मुंबईच्या नाटकाला खाली पाहायला लावतात इतके समर्थपणे ती नाटके लोकांसमोर सादर होतात. साधनसामग्री नाही. मोठे कलाकार नाही .परमनंट रंगमंच नाही. पण झाडीबोलीच्या नाटकाची मजा काही और आहे आणि ती त्याच भागात आहे. येथील दंडार महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे. आणि लोकप्रिय देखील झाली आहे.
आपल्याला जसा आपल्या आईचा अभिमान आहे तसा आपल्या बोलीचा अभिमान असला पाहिजे. आपले सर्वांचे विदर्भात राहणाऱ्यांची बोली ही वऱ्हाडी आहे. या वऱ्हाडीचे जतन करण्यासाठी जे लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत ते निश्चितच अभिनंदनास आज पात्र आहेत. अमरावतीला रविवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी होणारे मराठी बोलीभाषा संमेलन हे देखील त्यातील एक आहे .या संमेलनाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
