मुंबईतील विभागीय कॅरम स्पर्धेत ओसरगावच्या दिव्या राणेची चमकदार कामगिरी;
६८ खेळाडूंमधून पटकावला आठवा क्रमांक
ओसरगाव :
ओसरगावची सुकन्या कु. दिव्या दिलीप राणे हिने मुंबईतील कांदिवली येथे पार पडलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आपला दबदबा कायम राखला आहे. १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात तब्बल ६८ खेळाडूंमधून तिने आठवा क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला.
दिव्याने आपल्या सातत्यपूर्ण सरावाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापूर्वीही तिने तालुका व जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. विभागीय स्तरावरही तिने मिळवलेल्या यशामुळे ओसरगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
