सावंतवाडी : येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख आणि सामाजिक युवा कार्यकर्ते आशिष सुभेदार (वय ३१) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंतवाडी तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर गोवा येथील बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात अनेक सामाजिक आणि संघटनात्मक कामे उभी केली होती.
श्री. सुभेदार यांनी आपल्या विद्यार्थी दशेत असतानाच मनसेतून सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्याकडे विद्यार्थी मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या काळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. दरम्यानच्या काळात परशुराम उपरकर यांनी मनसेतून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आशिष सुभेदार यांनीही त्यांच्यासोबत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली होती.
सावंतवाडी शहरासह जिल्ह्यातील अनेक विषयांवर ते सातत्याने आवाज उठवत होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना किडनीच्या आजाराचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबतची माहिती त्यांचे चुलत बंधू सुजय सुभेदार यांनी दिली.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील उपरकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, परिवार आणि मोठा मित्रपरिवार आहे.
