You are currently viewing पद्मश्री सुरेश तळवलकर यांना ‘मृद्‌गंध जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर
Oplus_16908288

पद्मश्री सुरेश तळवलकर यांना ‘मृद्‌गंध जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर

ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात अढळ स्थान निर्माण करणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी १६वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे ‘मृद्‌गंध पुरस्कार २०२६’ प्रदान केले जाणार आहेत. यंदाचा ‘मृद्‌गंध जीवनगौरव पुरस्कार’ तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर यांना जाहीर झाला आहे. गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे हा सांगीतिक सोहळा रंगणार आहे.

 

लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी भारूड, गोंधळ, पोवाडे अशा लोककलेच्या विविध प्रकारांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दमदार आवाज, प्रभावी सादरीकरण आणि सामाजिक जाणिवांच्या बळावर त्यांनी लोककलेला केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता जनजागृतीचे प्रभावी माध्यम बनवले. त्यांच्या कलाप्रवासाचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासाठी विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी ‘मृद्‌गंध पुरस्कार’ प्रदान केला जातो. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेले आकर्षक मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

यंदा विविध क्षेत्रांतील सहा मान्यवरांना ‘मृद्‌गंध पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात येणार आहेत. तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर यांना जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना लोककला क्षेत्रातील योगदानासाठी, पद्मश्री सुधाकर ओळवे यांना छायाचित्रण आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी, संदेश कुलकर्णी यांना अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रासाठी, अभिनेत्री अमृता सुभाष यांना अभिनय क्षेत्रासाठी आणि चैतन्य देवडे (माऊली) यांना ‘नवोन्मेष प्रतिभा (गायक)’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

 

याबाबत बोलताना लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव, प्रसिद्ध गायक आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप म्हणाले, ‘लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख आहे. बाबांनी आपल्या कलेतून सर्वसामान्य माणसाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. रसिकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले आणि तेच प्रेम आज आम्हालाही मिळत आहे. बाबांचा लोककलेचा वारसा जपतानाच तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे, हेच आमचे ध्येय आहे.’ याच सामाजिक बांधिलकीतून यंदा विठ्ठल उमप फाऊंडेशन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार आहे.

 

समारोहात पार्श्वगायिका प्रियांका बर्वे, अरुण पेदे वेसावकर आणि मंडळी आपल्या कलाविष्कारातून लोकशाहीर विठ्ठल उमप यांना सांगीतिक मानवंदना अर्पण करणार आहेत. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि आरपीआय नेते नानासाहेब ईंदिसे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. लोककलेचा सन्मान, कलाकारांना प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर कार्यरत असलेले फाऊंडेशन नंदेश उमप यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल उमप यांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढे नेत आहे. रसिकांसाठी हा सोहळा विनामूल्य खुला असेल. त्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या लोककलेचा उत्सव आणि एका अजरामर कलावंताला सुरांच्या माध्यमातून वाहिलेली आदरांजली ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा