आमचे आदरणीय प्रा. मंदार टिल्लू सर यांना बुधवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी देवाज्ञा झाली आणि मनात आठवणींचा पूर वाहत गेला. माझं मन पुन्हा एकदा २००१ च्या कॉलेजच्या बाकांवर बसलं. त्या बाकांवर बसताना मला टिल्लू सरांच स्पेशल लेक्चर आठवलं. त्या दिवशी मंदार टिल्लू सर सहज वर्गावर आले. सर्व मुलांशी ते मित्रा प्रमाणे संवाद साधत होते. बोलता बोलता सर म्हणाले मी सध्या ‘यदाकदाचित’ नाटकात एक भुमिका करतो आहे. ते ऐकल्यावर माझं सिने नाट्य मन चकित झालं. आमच्या कॉलेजचे सर नाटकातले अभिनेते आहेत, हे ऐकून मला फार आनंद झाला. कारण मला त्यावेळी सिने- नाट्य क्षेत्र खुणावत होतं.
मंदार टिल्लू सर त्यावेळी नुसतेच आमच्या नवीन कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये रुजू झाले होते. माझे वडील त्या काळात या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यामुळे टिल्लू सर आमच्या घरातले एक सदस्य असल्यासारखे होते.
पुढे माझ्या कॉलेजचे ते एक वर्ष संपले, मी सिनियर कॉलेज म्हणून ‘ज्ञानसाधना’ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर काही दिवसांनी मी ठाण्याच्या ठणे मराठी ग्रंथ संग्रहालयात ‘इ कवितेचिये नगरी’ या कार्यक्रमाला गेलो. तो कार्यक्रम साहित्यिक, प्रकाशक विनोद पितळे आणि प्रा. मंदार टिल्लू सरांनी घेतला होता. त्यावेळी एक नवकवी म्हणून वडिलांनी मला या कवितेच्या कार्यक्रमात नेले. त्यावेळी मंदार टिल्लू सरांनी मला शुभ आशीर्वाद दिले.
त्यादिवशी कार्यक्रम झाल्यावर सरांनी कर्मवीर कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांना झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत लिहायला सांगितला होता. त्यावेळी आमच्या इमारतीतील एका विद्यार्थ्यीनीनी या लेखनाकरता माझे सहकार्य घेतले. तिथपासून सरांनी मला नकळत लेखक केलं असं मी मानतो.
यानंतर माझे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर, माझ्या अपंगत्वावर शस्त्रक्रिया झाली, या काळात मी वृत्तपत्र लेखक झालो. मग २०११ ला माझा ‘अंतरंग’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. मंदार टिल्लू सरांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रकाशनकडून अंतरंग काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.
साहित्यिक कार्यक्रम कसा आयोजित करायचा याचे प्रशिक्षण टिल्लू सरांनी मला दिले. पुढे २०१५ साली माझा श्रद्धांजलीपर ‘वलयांकित’ हा ललितसंग्रह प्रकाशित झाला.
टिल्लू सरांचा आग्रह होता की, तीन वर्षानंतर पुन्हा तुझा कुठला तरी संग्रह यावा. याही प्रकाशनावेळी त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही अनुभव संपन्न प्रकाशन सोहळा केला. टिल्लू सरांमुळे प्रा संतोष राणे सरांसारखा एक उत्तम प्रकाशक मला मिळाला. तिथून पुढे माझे साहित्यिक जीवन बहरले. अशाप्रकारे प्रा मंदार टिल्लू सरांनी मला साहित्य प्रकाशनाची वाट दाखवली.
२००६ पासून २०१४ पर्यंत टिल्लू सरांनी रंगभूमीवर अनेक संगीतमय कार्यक्रम केले. आशा भोसले, लता मंगेशकर या दोन गायिकांची सदाबहार गाणी टिल्लू सरांनी कार्यक्रमातून सादर केली. टिल्लू सरांनी त्याकाळात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन ‘सामाजिक सलोखा’ हा संस्कृतिक संगीतमय कार्यक्रम संपन्न केला.
ठाण्यातील कवी पी सावळाराम यांच्या शताब्दी महोत्सवा निमित्त टिल्लू सरांनी कवी पी सावळाराम गीतांचा कार्यक्रम सादर केला. त्यावेळी पी सावळाराम यांच्यावर पुस्तक देखील प्रकाशित झाले होते. या सर्व कार्यक्रमांची निर्मिती करताना टिल्लू सर माझा भाऊ कै. योगेश पवार यांच्याकडून बॅनर डिझाईनिंग करून घ्यायचे. कारण योगेश हे डिझाईनिंगमध्ये मास्टर होते. त्यामुळे टिल्लू सरांची व योगेशची मैत्री घट्ट झाली. यानंतर टिल्लू सरांनी प्रा. प्रदीप ढवळ सरांबरोबर ‘गंधार’ बालनाट्य संस्थेची निर्मिती केली. त्यावेळी टिल्लू सरांनी ढवळ सरांच्या ‘संन्यास्त ज्वालामुखी’ हे ‘स्वामी विवेकानंद’ यांच्यावरील नाटक रंगभूमीवर आणले. त्यावेळी त्यांनी या नाटकाचे रेकॉर्ड ब्रेक प्रयोग केले. याच्यानंतर त्यांनी प्रदीप ढवळ सर लिखित ‘शिवबा’ हे नाटक रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून आणले. हे भव्य नाटक होते त्यात जवळजवळ ८० कलाकार होते. मग २०१४ ते २०२६ पर्यंत टिल्लू सरांनी बालनाट्याचे दरवर्षी प्रयोग केले. अनेक बालकलाकार त्यांनी घडवले. ते सर्व कलाकार आज मालिका, चित्रपटांमध्ये बाल कलाकाराची भूमिका व नवतरुण अभिनेत्याची भूमिका करू लागले आहेत. पुढच्या काळात मंदार टिल्लू सरांचे हे बालकलाकार सुपरस्टार होतील असे खात्रीपूर्वक सांगता येईल.
दिग्दर्शक मंदार टिल्लू सर हे ठाण्यातील ‘ज्ञानसाधना’ कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. कॉलेज काळातील त्यांचे अनेक मित्र पत्रकार, लेखक, कवी, गीतकार, निवेदक, दिग्दर्शक, व्यवसायिक आहेत. त्या मित्रांशी टिल्लू सरांनी शेवटपर्यंत मैत्रीचे नाते कायम ठेवले होते. त्याचबरोबर कवी अशोक बागवे, कवी प्रवीण दवणे या गुरुवर्य कवींशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. अनेक दिग्गज व्यक्तींमध्ये मंदार टिल्लू सरांचे उठणे बसणे होते. एखाद्या कार्यक्रमाची संकल्पना टिल्लू सरांना सांगितली की, लगेच ती संकल्पना उत्कृष्ट कलात्मक रंगात रंगून रंगभूमीवर यायची. टिल्लू सर कायम पडद्यामागे राहून कार्यक्रम कसा चांगला होईल यासाठी अथक प्रयत्न करायचे. त्यामुळे कवी अशोक बागवे गुरु या नात्याने प्रा मंदार टिल्लू यांना व्यासपीठावर बोलवून त्यांचा गुणगौरव करायचे, हे मी प्रत्यक्ष समोर पाहिले आहे. टिल्लू सरांच्या अनेक कार्यक्रमांचा, नाटकांचा अनुभव मी घेतला आहे. त्यामुळे मी एकलव्याप्रमाणे टिल्लू सरांकडे बघून नवे नवे कार्यक्रम छोट्या प्रमाणात करत असतो. हे करताना माझ्याबरोबर टिल्लू सरांचे मित्र पाठीशी असतात. हा एक योगायोग मला थक्क करतो. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी टिल्लू सरांचे, ठाणे शहरात सर्वत्र आहेत. ते सुद्धा आज मंदार टिल्लू सरांच्या जाण्याने दुःखी, कष्टी झाले असणार, टिल्लू सर संगीत, नाट्य, साहित्य, लोककला या कार्यक्रमांकरता समरसून कार्य करायचे त्यातून आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचे. एक खुले गुरुकुल टिल्लू सरांच्या स्वभावात व कार्यात होते. हे गुरुकुल आमच्या पुढील कार्यात आम्हाला कायम स्वरूपी दिशा देत राहील. मला आज कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या दोन ओळी आठवत आहेत.
इतकं दिलंत, इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला!
खरं सांगतो, माणूस केलंत तुम्ही मला…”
ही सर्व विद्यार्थ्यांची आज भावना आहे दिग्दर्शक प्रा मंदार टिल्लू सरांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ॲड. रुपेश पवार
9930852165
