सुर्वे यांनी आपल्या कवितेने मराठीला शुद्ध आणि समृद्ध केले! – डाॅ. श्रीपाल सबनीस
*समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान*
पिंपरी
‘कविवर्य नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेने मराठीला बळ प्रदान करून तिला शुद्ध आणि समृद्ध केले!’ असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे गुरुवार, दिनांक १८ जून २०२६ रोजी व्यक्त केले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. याप्रसंगी पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, डाॅ. पांडुरंग भोसले, शाहीर आसराम कसबे, महेंद्र भारती, प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील प्रा. राजेंद्र कांकरिया यांच्या सहधर्मचारिणी छाया कांकरिया (मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान), कुष्ठरुग्ण सेवक दत्तात्रय अत्रे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), कवयित्री जयश्री श्रीखंडे (पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान), कवी शिवाजी शिंदे आणि कवयित्री प्राजक्ता पटवर्धन (पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डाॅ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून साम्यवाद रुजविण्याचा प्रयत्न केला. वैदिक आणि अवैदिक विचारधारांनी भारतीय संस्कृतीला संविधानात्मक चेहरा बहाल केला आहे. भिन्न विचारांच्या व्यामिश्रतेतून लोकशाही प्रगल्भ होत असते. पंडित नेहरू अधिक नरेंद्र मोदी म्हणजे आजची भारतीय लोकशाही आहे!’
सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे यांनी, ‘बालपणात अनेक महापुरुषांची चरित्रे वाचत असतानाच सुखासीन आयुष्यापेक्षा समर्पित भावनेतून समाजासाठी कार्य करावे, ही खूणगाठ नकळत मनाशी बांधली गेली. नारायण सुर्वे यांना जवळून अनुभवता आले. अण्णाभाऊ साठे आणि नारायण सुर्वे यांनी मराठीला सरस्वतीचे वाण प्रदान केले आहेत!’ अशी भावना व्यक्त केली.
प्राची पटेकर या विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षपूजन, सुभाष चव्हाण यांचे शंखवादन आणि कामगारभूषण राजेंद्र वाघ यांनी गायलेल्या नारायण सुर्वे लिखित ‘डोंगरी शेत माझं गं…’ या कवितेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकातून, नारायण सुर्वे हे व्यक्तिमत्त्व संपूर्ण समाजाला कळावे म्हणून त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती दिली. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘एकटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे’ या शीर्षकांतर्गत सुर्वे यांच्या जीवनातील विविध पैलूंना उजाळा दिला. त्यानंतर नारायण सुर्वे काव्यजागर कविसंमेलनात पुरस्कारार्थी कवींसह संगीता झिंजुरके, प्रभाकर वाघोले तसेच भूमिका खंडागळे, रूपाली तायड, अंकिता धिवार, केतन सांगडे, सोनल धिवार या विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण कवितांचे प्रभावी सादरीकरण करून दाद मिळवली. मानसी चिटणीस यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले; तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून हितगुज केले.
इंद्रजित पाटोळे, जयवंत भोसले, सीताराम नरके, प्रा. प्रभाकर दाभाडे, राजू जाधव, स्वाती भोसले, प्रदीप गांधलीकर आणि खिंवसरा पाटील शिक्षण संकुलातील शिक्षकांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
