You are currently viewing “कृष्णदीप” दिवाळी अंकाच्या प्रकाशनाने ३६व्या कविसंमेलनाला लाभली साहित्यिक झळाळी; कविता, हास्य आणि साहित्य वाचनाचा सुरेल संगम
Oplus_16908288

“कृष्णदीप” दिवाळी अंकाच्या प्रकाशनाने ३६व्या कविसंमेलनाला लाभली साहित्यिक झळाळी; कविता, हास्य आणि साहित्य वाचनाचा सुरेल संगम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

कविता, हास्यविनोद, साहित्यवाचन आणि पुस्तक प्रकाशन अशा विविध साहित्यिक उपक्रमांनी सजलेले मराठी साहित्य व कला सेवा आयोजित ३६वे मासिक कविसंमेलन रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील हिंदू कॉलनीतील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नियोजित वेळी सुरू झालेल्या या संमेलनात मुक्त विषयांवरील कविता, हास्यकविता आणि ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांच्या साहित्याचे अभिवाचन अशा तीन सत्रांचा समावेश होता. कृष्णदीप दिवाळी अंकाचे प्रकाशन यामुळे संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. संस्थेच्या साहित्यिक उपक्रमांच्या वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

पहिल्या सत्रात कवींनी मुक्त विषयांवरील स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. जीवनानुभव, सामाजिक वास्तव, मानवी नाती, निसर्ग, भावना आणि विचारांचे विविध पैलू त्यांच्या कवितांतून व्यक्त झाले. दुसऱ्या सत्रात हास्यकवींनी विनोद, उपरोध आणि दैनंदिन जीवनातील विसंगतींवर भाष्य करणाऱ्या कवितांतून सभागृहात हास्याची कारंजी फुलवली. आयोजकांनी प्रत्येक कवीला एक अतिरिक्त कविता सादर करण्याची संधी दिली. तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या स्वागतानिमित्त त्यांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन करण्यात आले. चंद्रकांत दढेकर, कल्पना निलेश सांगळे, प्रतिक्षा पांडुरंग सरमळकर आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी अभिवाचनातून त्यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण केले.

संमेलनात अशोक सहदेव सुकाळे, कल्पना दिलीप म्हापूसकर, कल्पना निलेश सांगळे, कृपा राकेश म्हात्रे, चंद्रकांत दढेकर, प्रतिभा अभिजीत आचार्य, प्रतिक्षा पांडुरंग सरमळकर, बजरंग लक्ष्मण परब, सरोज सुरेश गाजरे, वैभवी विनीत गावडे, डॉ. अर्चना येंदारकर आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी कविता सादर केल्या. राकेश म्हात्रे, संध्या चंद्रकांत दढेकर आणि अभिजीत आचार्य यांनी आस्वादक म्हणून सहभाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे कवी आणि आस्वादक यांना एकाच व्यासपीठावर साहित्याचा आनंद घेण्याची संधी मिळाली. विविध विषय, भावभावना आणि काव्यशैलींचा अनुभव रसिकांना मिळाला.

संमेलनातील विशेष आकर्षण ठरलेल्या कृष्णदीप दिवाळी अंकाचे प्रकाशन वारकरी प्रकाशनचे सर्वेसर्वा आणि अंकाचे संपादक राहुल मुंढे, पत्रकार सुरज पवार आणि सुमित हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुदत्त वाकदेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना येंदारकर यांनी केले.

आयोजक गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी कविसंमेलन आणि साहित्य अभिवाचन सत्राचे सूत्रसंचालन केले. त्यांच्या निवेदनामुळे विविध सत्रांचा प्रवाह सुरळीत राहिला. अल्पोपहाराची व्यवस्था कृपा राकेश म्हात्रे आणि सरोज सुरेश गाजरे यांनी सांभाळली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक सहदेव सुकाळे, वैभवी विनीत गावडे, डॉ. अर्चना येंदारकर, कल्पना निलेश सांगळे आणि राकेश म्हात्रे यांनी विशेष सहकार्य केले.

समारोपप्रसंगी आयोजक आणि संस्थापक / अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी सहभागी कवी, आस्वादक, प्रकाशन सोहळ्यास उपस्थित मान्यवर आणि रसिकांचे आभार मानले. कविता, हास्य, साहित्यवाचन आणि पुस्तक प्रकाशन यांचा एकत्रित अनुभव हे या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले. नवोदित आणि अनुभवी साहित्यिकांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या कार्याची या संमेलनातून पुन्हा एकदा नोंद झाली. मराठी साहित्य व कला सेवा आयोजित पुढील ३७वे मासिक कविसंमेलन रविवार, दिनांक १३ डिसेंबर २०२६ रोजी होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा