अवैध व विना परवाना थंड पेये व खाद्य पदार्थ विक्रीची चौकशी करावी.

अवैध व विना परवाना थंड पेये व खाद्य पदार्थ विक्रीची चौकशी करावी.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग शाखेची मागणी.

वैभववाडी

कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक ठिकाणी लस्सी, कुल्फी, उसाचा रस व ज्यूस विक्रीची हंगामी दुकाने थाटली जात आहेत. तसेच बेकरीतील अनेक खाद्यपदार्थांची उघड्यावर खुलेआम विक्री होत आहे. अशा अवैध व विना परवाना थंड पेये व खाद्य पदार्थ विक्रीची चौकशी करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने मा.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
यापैकी अनेक विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेतलेली नसते. तपासणी करायला कोणी येत नसल्याची खात्री असल्यामुळे कोणीही परवानगी घेण्याच्या प्रयत्न करीत नाहीत. मात्र यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होत आहे याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उभा राहतो.
तापलेल्या वातावरणात जीवाला गारवा देणार्‍या थंडगार पेयजलासोबतच फळांच्या ज्यूसला मागणी असते. त्यातही काय स्वस्त आहे त्याचा शोध ग्राहक घेतात. आंबा महाग असला तरी रस्त्यावर मॅंगो ज्यूस १० रुपयाला मिळतो. दही २५ ते ३० रुपये पाव किलो असूनही ताक मात्र १० रुपयांना उपलब्ध आहे. ज्युसमध्ये आंब्याचा गर वापरला जातो का ? ताकात पिठाचे प्रमाण जास्त असते. गोळा तयार करण्यासाठी वापरला जाणारा बर्फ खाण्याच्या योग्यतेचा आहे की औद्योगिक वापराचा, याची माहिती कोणताही ग्राहक घेताना दिसत नाही. हे सर्व पदार्थ आरोग्यवर्धक आहे की विघातक याचा शोध घेण्याची गरज आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्वपूर्ण अशा अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार रामभरोसे आहे असेच चित्र दिसते. खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणची स्वच्छता, वापरले जाणारे पाणी व साहित्याची शुद्धता याची वेळोवेळी तपासणी आणि परवान्यांचे नूतनीकरण करणे गरजेचे असते. मात्र सध्या तरी या सर्व जबाबदाऱ्या कागदावरच पार पाडल्या जात असाव्यात.
जिल्ह्यात सर्व तालुका आणि शहराच्या ठिकाणी भरणा-या आठवडा बाजारांमध्ये अशा प्रकारचे पदार्थ सर्रास विक्रीसाठी असतात. अशा पदार्थांची तपासणी व चौकशी होऊन काही त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. याशिवाय आरोग्यास घातक घटकांचा अन्नपदार्थात समावेश करणाऱ्यांच्या विरोधात खटले दाखल केले पाहिजेत. यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचबरोबर गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुकास्तरावर पुरवठा अधिकारी, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व पोलीस विभाग यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री होत असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असेल तर मग नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई कोण करणार ? असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडल्याशिवाय राहात नाही.
सदर पत्राची (मेलची) प्रत जिल्हा पुरवठा अधिकारी सिंधुदुर्ग, पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग, सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन सिंधुदुर्ग,तहसिलदार, वैभववाडी, पोलीस निरीक्षक, वैभववाडी व मुख्याधिकारी,नगरपंचायत वाभवे-वैभववाडी यांना पाठविल्या आहेत.
संबंधित विभागाने सतर्कपणे योग्य तपासणी करून कारवाई करणे आवश्यक आहे. याकामी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा व तालुका शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशासनाला मदत करण्यास तयार आहेत.आपल्याकडून वेळीच योग्य ती कारवाई व्हावी अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर करीत आहोत. आपण केलेल्या योग्य कारवाईबाबत पत्रोत्तर करण्याची विनंती केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा