कुडाळच्या पानबाजारात भरदिवसा बँक लुटण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे डाव उधळला!
महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक; लाखोंची रोकड वाचली, नागरिकांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले
कुडाळ
शहरातील गजबजलेल्या पानबाजार परिसरात मंगळवारी दुपारी भरदिवसा राष्ट्रीयीकृत बँक लुटण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली. बँकेतील महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचा डाव बँक कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळला. नागरिकांनी धाडस दाखवत संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
मंगळवारी दुपारी एका तरुणाने पानबाजार परिसरातील राष्ट्रीयीकृत बँकेत प्रवेश केला. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून बँकेतील रोकड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे बँकेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयिताला पकडले. यावेळी संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नागरिकांच्या या धाडसी हस्तक्षेपामुळे बँकेतील लाखो रुपयांची रोकड सुरक्षित राहिली.
दरम्यान, या घटनेत आणखी एका संशयिताचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस कर्मचारी प्रमोद काळसेकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून संशयिताला ताब्यात घेतले. कुडाळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
भरदिवसा बँकेत चाकूचा धाक दाखवून लुटीचा प्रयत्न झाल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, बँक कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान आणि नागरिकांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
