You are currently viewing अतिक्रमणांच्या विळख्यात कराड-विजापूर महामार्ग!

अतिक्रमणांच्या विळख्यात कराड-विजापूर महामार्ग!

रिंगरोड, फ्लाय ओव्हरचे काय झाले?

कृष्णलीला मंगल कार्यालय ते शिवाजी चौक रस्ता मृत्यूचा सापळा बनण्याची प्रतीक्षा कशासाठी? प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?

विटे / प्रदीप जोशी : शहरातील वाहतुकीचा कणा समजला जाणारा कराड-विजापूर महामार्ग सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. कृष्णलीला मंगल कार्यालय ते शिवाजी चौक या मार्गावर वाढलेली अतिक्रमणे, रस्त्यावर थाटलेली दुकाने, बेशिस्त पार्किंग आणि वाढती वाहनांची गर्दी यामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक, तर पादचाऱ्यांसाठी अक्षरशः त्रासदायक बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत अतिक्रमणांमध्ये झालेली वाढ पाहता, हा प्रश्न आता केवळ वाहतुकीचा राहिलेला नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनला आहे. मग हा रस्ता अतिक्रमणमुक्त होणार तरी कधी?

विटा शहरातून जाणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यापाऱ्यांनी मांडलेले साहित्य, दुकानदारांनी केलेले अतिक्रमण आणि अस्ताव्यस्त उभी केलेली दुचाकी व चारचाकी वाहने यामुळे रस्त्याची उपलब्ध रुंदी दिवसेंदिवस कमी होत आहे. विटा हायस्कूल ते शहा पेट्रोल पंप परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकाने थाटली गेली आहेत. नेवरी नाका ते शिवाजी चौकदरम्यान तर वाहनांची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठीही जागा उरलेली नाही.

मायणी-तासगाव रस्ता रुंद होतो; मग कराड रस्त्याचे घोडे कुठे अडले?

मायणी-तासगाव रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र त्या परिसरातील काही विक्रेत्यांनी कराड रस्त्यावर व्यवसाय थाटल्याने अतिक्रमणाचा प्रश्न नव्याने गंभीर झाला आहे. एका रस्त्यावरील वाहतूक सुधारताना दुसऱ्या रस्त्याची कोंडी होणार असेल, तर नियोजनातील त्रुटी कोण दूर करणार? विकासकामे केवळ एका मार्गापुरती न राहता संपूर्ण शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून झाली पाहिजेत.

फ्लायओव्हरचा विषय पुन्हा चर्चेत!

नेवरी नाका ते खानापूर नाका या दरम्यान उड्डाणपुलाची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. या उड्डाणपुलाला मंजुरी मिळाल्यानंतरही तो रद्द झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. काही व्यापाऱ्यांच्या हितसंबंधांमुळे हा निर्णय झाल्याचा आरोपही व्यक्त केला जात आहे. मात्र या निर्णयामागील वस्तुस्थिती प्रशासनाने आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी स्पष्ट करणे आवश्यक आहे. शहराच्या दीर्घकालीन वाहतूक नियोजनापेक्षा कोणाचेही वैयक्तिक अथवा व्यावसायिक हित महत्त्वाचे ठरता कामा नये.

आमदार सुहास बाबर आणि उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी शहरातील विकासकामांच्या बाबतीत पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे कराड-विजापूर महामार्गाच्या प्रश्नातही त्यांनी लक्ष घालून ठोस भूमिका घ्यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मायणी रस्त्याप्रमाणे या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठीही ठोस कृती होणे गरजेचे आहे.

उपजिल्हा रुग्णालय होणार; पण रुग्णवाहिकेला रस्ता मिळणार का?

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागी सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची योजना असताना या परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवांची वाहने आणि रुग्णांच्या नातेवाइकांची वाहने यांना मोकळा रस्ता मिळणे अत्यावश्यक आहे. रुग्णालय उभारण्यापूर्वीच परिसरातील अतिक्रमणे हटवून वाहतुकीचे योग्य नियोजन केले नाही, तर भविष्यात रुग्णालयासमोरच वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्र्याच्या शेड उभारून सार्वजनिक जागेवर कब्जा करणाऱ्यांबाबतही प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी.

आता आश्वासनांची नव्हे, प्रत्यक्ष कारवाईची गरज!

कराड-विजापूर महामार्गाचे दोन्ही बाजूंनी नियोजनबद्ध रुंदीकरण, रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक, अतिक्रमणमुक्त पदपथ, शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था आणि आवश्यक ठिकाणी उड्डाणपुलाची व्यवहार्यता तपासणे, या उपाययोजना तातडीने हाती घेण्याची गरज आहे. नेवरी नाका ते खानापूर नाका या संपूर्ण मार्गाचे सर्वेक्षण करून रस्त्याच्या रुंदीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हटवली पाहिजेत. अतिक्रमणधारकांना पर्यायी जागेचा प्रश्न असेल तर त्यावरही नियोजनपूर्वक मार्ग काढावा; मात्र सार्वजनिक रस्त्याचा वापर खासगी व्यवसायासाठी करण्याची मुभा देता कामा नये.

विशेष म्हणजे, या मार्गावर रोज किरकोळ अपघात होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मोठा अपघात घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा आताच प्रशासनाने हालचाल करणे आवश्यक आहे. केवळ निवेदने, पत्रकबाजी, बैठका आणि आश्वासनांनी रस्ता मोकळा होणार नाही. प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची मोहीम कधी सुरू होणार, याचे उत्तर नागरिकांना हवे आहे.

या प्रश्नावर लवकरच विविध संघटना एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या तयारीत आहेत. हे आंदोलन प्रशासनासाठी इशारा ठरले पाहिजे. कारण रस्ता हा कोणत्याही व्यक्तीचा किंवा व्यापाऱ्याचा खासगी मालमत्ता नसून तो सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी आहे.

शेवटी प्रश्न एकच — एखाद्या मोठ्या अपघातात निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? कराड-विजापूर महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार?

विटा शहराच्या विकासाच्या गप्पा मारताना या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी आणि अतिक्रमणधारकांवर नियमांनुसार कारवाई करावी. अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही!

प्रतिक्रिया व्यक्त करा