You are currently viewing पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा वारसा जपणे आवश्यक – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा वारसा जपणे आवश्यक – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा वारसा जपणे आवश्यक – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

सिंधुदुर्ग

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, तहसीलदार (महसूल) चैत्राली सावंत, सांख्यिकी सहायक स्नेहल ठाकरे, नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            या कार्यक्रमादरम्यान सांख्यिकी सहायक स्नेहल ठाकरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याविषयी आणि योगदानाविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

            कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, स्वातंत्र्योत्तर काळात भारत उभारणीत पंडित नेहरुरूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. राजकीय व्यवस्था बळकट करणे, संविधान निर्मितीला दिशा देणे, तसेच आयआयटी, मोठी धरणे व वैज्ञानिक संस्थांच्या माध्यमातून वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीचा पाया रचण्यात त्यांचे मोठे योगदान होते. तसेच परराष्ट्र धोरणात ‘अलिप्ततावादी चळवळ’ स्थापन करून त्यांनी जगाला स्वतंत्र विचार दिला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

            पंडित नेहरूंना लहान मुले अतिशय प्रिय असल्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा बालदिन हा त्यांच्या मुलांवरील प्रेमाची व हसतखेळत जगण्याच्या स्वभावाची आठवण करून देतो. अशा थोर महापुरुषांचे विचार आणि आदर्श आपल्या जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन करत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

            शेवटी त्यांनी सांगितले, आपण महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त महापुरुषांच्या विचारांवर चर्चा घडवून आणतो ही सकारात्मक बाब आहे. अशा प्रकारच्या चर्चेमुळे त्यांच्या कार्याचा सखोल उजळा मिळतो आणि बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा