आठवड्याचे सातही दिवस फ्लाय ९१ कंपनीची सेवा; पर्यटन विकासासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार – पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी फ्लाय ९१ कंपनीची विमानसेवा सुरू होणार असून, आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. या विमानसेवेमुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गवासीयांना संबोधित करताना ना. राणे म्हणाले की, १९९९ मध्ये तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला. शेती आणि मासेमारीबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे आणि आर्थिक समृद्धी निर्माण व्हावी, हा त्यामागील उद्देश होता. या पर्यटन धोरणाला बळ देण्यासाठी जिल्ह्याला स्वतःचे विमानतळ असावे, यासाठी नारायण राणे यांनी पुढाकार घेतला. एमआयडीसीच्या माध्यमातून चिपी-वेंगुर्ला येथे विमानतळाची उभारणी करण्यात आली. विमानतळ तयार झाल्यानंतर मुंबईसह विविध ठिकाणांहून विमानसेवाही सुरू झाली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे कालांतराने ही सेवा बंद पडली.
त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांनीही विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू राहावे यासाठी प्रयत्न केले. दोन वर्षांपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विमानतळाच्या विकासाला गती मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विमानतळासमोरील रस्ते, वीजपुरवठा आणि नाईट लँडिंग यांसारख्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला. विमानतळ आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावे आणि विमानसेवा कायमस्वरूपी सुरू राहावी, यासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे सिंधुदुर्ग विमानतळासाठी व्हीजीएफ उपलब्ध झाल्याने मोठ्या विमान कंपन्यांनाही येथे सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
याच प्रयत्नांचे पहिले पाऊल म्हणून १६ नोव्हेंबरपासून फ्लाय ९१ कंपनीची सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. मुंबईशी थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांना चालना मिळेल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने विविध महत्त्वाचे प्रकल्प आणण्यात आले आहेत. वेंगुर्ला वेळाघर तसेच देवगड येथे प्रस्तावित ताज हॉटेल प्रकल्पांमुळे पर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळणार आहे. राज्यासह देशभरातील पर्यटक सिंधुदुर्गात येण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, पर्यटकांना जिल्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी विमानतळ हे महत्त्वाचे साधन आहे. ताजसारखे हॉटेल प्रकल्प आणि विमानसेवा सुरू होणे ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे प्रमुख दीपक कपूर, अपर मुख्य सचिव संजय सेठी, रवींद्र कटकधोंड यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत विशेष बाब म्हणून सिंधुदुर्ग विमानतळासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आभार मानले.
विमानतळ सुरू होणे म्हणजे केवळ विमानसेवा सुरू होणे नव्हे, तर पर्यटनाच्या माध्यमातून टूर गाईडपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत अनेकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी उपलब्ध होणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी पर्यटन व्यवसायातील संधी ओळखून रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहनही ना. नितेश राणे यांनी केले.
१६ नोव्हेंबरला केवळ विमानाचे टेकऑफ होणार नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटनाला खऱ्या अर्थाने नवी भरारी मिळणार आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आणि विकसित सिंधुदुर्ग घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
