You are currently viewing ‘अटल’च्या शिशुवाटिकेचे ऑनलाईन संस्कार वर्ग

‘अटल’च्या शिशुवाटिकेचे ऑनलाईन संस्कार वर्ग

सावंतवाडी :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील अटल प्रतिष्ठान व्यवस्थापनाचे ऑनलाईन शिशुशिक्षण देण्यासाठी योजना तयार केली. त्याची सुरुवातही झाली. याला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

संस्कारक्षम शिशुशिक्षण ही काळाची गरज ओळखून पंधरा वर्षांपूर्वी अटल प्रतिष्ठानने विद्याभारतीच्या अभ्यासक्रमाचा स्वीकार करून शिशुवाटिका सुरू केल्या. ज्या अभ्यासक्रमाचा भारत सरकारने आपल्या नवीन शैक्षणिक धोरणात तंतोतंत स्वीकार केला. गेल्या पंधरा वर्षात सावंतवाडी व आसपासच्या दशक्रोशीतून शेकडो मुले संस्काराचे हे बीज घेऊन बाहेर पडली. ज्याचे सकारात्मक परिणाम असंख्य पालक अनुभवत आहेत.
जगातील सर्व शिक्षकतज्ञांचे स्पष्ट मत आहे की, पहिल्या पाच वर्षापर्यंत मुलांना पुस्तकी शिक्षणापेक्षा संस्कारांची अधिक गरज असते. संस्कारक्षम भावी पिढी हीच निकोप समाजाच्या निर्मितीचा केंद्रबिंदू असतो.

शिशुशिक्षण म्हणजे बालकांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक विकास होय. हे सूत्र विचारात घेऊन अटल प्रतिष्ठानने सावंतवाडीत हे संस्काररुपी बीज रोवले. ज्या आदर्श उपक्रमाला आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन कौतुक केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने गेली पंधरा वर्षे चाललेले हे संस्काराचे जागरण मार्च महिन्यापासून थांबले. मुलांना एवढी सवय झाली आहे की, मुले शाळेत जाण्यासाठी घरी दंगा करू लागली. पालकांचा आग्रह लक्षात घेऊन अटलच्या व्यवस्थापनाने ऑनलाईन शिशुशिक्षण देण्यासाठी योजना तयार केली. मुलांना ऑनलाईन संस्कार कथा सांगणे, बडबड गीते, भक्ती गीते, श्लोकपठण असे विविध उपक्रम सुरू केले. ऑनलाइन शिशुसंस्कार उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यवाह डॉ.राजशेखर कार्लेकर, विजया रामाणे, रसिका भराडी, धनश्री देऊसकर, सत्यभामा परब, सायली सरमळकर, मानसी मोरजकर, शिशुसंस्कार केंद्राच्या व्यवस्थापिका रश्मी कार्लेकर आणि इतर कर्मचारी वर्ग विशेष परिश्रम घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 19 =