विशेष संपादकीय……
*ती दिवाळी नि ही दिवाळी….*
सुंदरवाडी…म्हणजे परमेश्वराला पहाटे पडलेलं गोड स्वप्न…!
असं म्हटलं जातं ते केवळ सावंतवाडी शहरातील मोती तलाव, राजवाडा, ऐतिहासिक शहर, लाकडी खेळणी आदी वैशिष्ट्यांमुळे असे नव्हे तर शहराची जडणघडण, सुसंस्कृत शांत शहर, शहराची संस्कृती आणि जपलेला सांस्कृतिक वारसा यामुळे..! गेली कित्येक वर्षे सिंधुदुर्गातील सावंतवाडी लगतच्या शहरांतील, गावांतील लोक सुंदरवाडीची दिवाळी पाहण्यासाठी शहरातील मोती तलावाच्या काठावर गर्दी करतात. अक्षरशः तलावाचा काठ गर्दीने ओसंडून वाहत असतो. “सावंतवाडी आणि अडकून पाडी” असे म्हटले जाते ते कदाचित सावंतवाडी शहराबद्दल अनेकांना असलेल्या आकर्षणामुळे असेल. नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नरकासुर स्पर्धेला नागरिकांचा महासागर लोटतो. खर्चाचा कोणताही ताळमेळ न घालता बनवलेले विशालकाय, अगडबंब नरकासुर येणाऱ्या दिवाळीची चाहूल लावून जातात. शहरभर दारासमोर प्रकाशमान झालेले आकाशकंदील अन् लुकलुकणारी रोषणाई लक्षवेधी ठरते…आनंदाला उधाण आणते.
दिवाळीच्या दिवशी शहरवासीय सकाळी केलेला फराळ जिरवून सायंकाळी तलावाच्या काठावर एकत्र येतात, एकमेकांना आलिंगन, हातात हात देऊन शुभेच्छांचा वर्षाव करतात. लक्ष्मीपूजन दिवशी तर नवनवे कपडे परिधान करून हौसेची मौजेची दिवाळी सावंतवाडीत मुख्यतः तलावाच्या काठावर पहायला मिळते. सावंतवाडीचे सुपुत्र माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर देखील गेल्या कित्येक वर्षांच्या त्यांच्या प्रथेप्रमाणे अनेक दुकानांना, नागरिकांना भेटी देतात. त्यामुळे अनेकांना भाई भेटल्याचा आनंद होतो. काहीजण छायाचित्रे घेण्यात, रिल बनविण्यात व्यस्त असतात. काहीजण मित्र मैत्रीण भेटीच्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेतात. पाडव्याच्या दिवशी संपूर्ण तलावाच्या काठावर दिवे लावण्याची परंपरा आजही जपली जात आहे. काही संस्थांच्या माध्यमातून मेणबत्ती लावण्याचा आगळावेगळा कार्यक्रम पार पडतो. त्यामुळे संपूर्ण मोती तलावाचे रूप पालटते. दिव्यांचे तलावात पडणारे प्रतिबिंब देखील विलक्षण भासते. हा आनंद, ते क्षण पुढल्या वर्षीपर्यंत प्रत्येकाच्या हृदयात जपले जातात, नजरेत सामावून राहतात.
दिवाळीची पाडवा पहाट सुरेल असते. सावंतवाडीत गेली २१ वर्षे सातत्याने दिवाळी पाडवा पहाट तलावाच्या काठावर सुरेल गायनाने रंगलेली असते. सावंतवाडीतील क्षितिज इव्हेंट, सद्गुरू संगीत विद्यालय आदींचे गुणी कलावंत आपल्या सुमधुर आवाजाने सावंतवाडीकरांना मंत्रमुग्ध करून टाकतात. पहाटे पाच वाजता सुरू झालेली गायनाची मैफिल तब्बल अडीज तास सुरू असते. रसिक श्रोत्यांची देखील उपस्थिती लक्षणीय असते. यावर्षी महाराष्ट्रशासनच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने सावंतवाडीत “सुरमयी दिवाळी पहाट” हा भक्तिगीत, नाट्यगीत आणि मराठी गीतांचा सुरेल असा कार्यक्रम गोविंद चित्र मंदिर येथे आयोजित केला गेला. सकाळी साधारणपणे ८.०० वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम १०.३० पर्यंत रसिक श्रोत्यांवर सुरेल संगीताची फुले उधळीत होता आणि सावंतवाडीतील संगीतप्रेमी रसिक त्याला उत्स्फूर्त दाद देत होते. संगीतमय वातावरणाने सावंतवाडीकरांची दिवाळी पहाट अधिकच मंगलमय झाली. संगीताच्या स्वरांतून सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमाने सावंतवाडीच्या कलासंपन्न भूमीचा गौरव पुन्हा एकदा अधोरेखित केला.
माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. राजकीय, सामाजिक, साहित्यिक, आध्यात्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी देखील कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली त्यामुळे गोविंद चित्र मंदिर संपूर्ण भरून गेले आणि कार्यक्रम आयोजन करणाऱ्या अर्णव देसाई यांच्यासह इतर आयोजकांच्या मेहनतीचे सार्थक झाले असे म्हणावयास हरकत नाही. बाहेरील कलावंत आणून सावंतवाडीत कार्यक्रम करण्यापेक्षा स्थानिक कलावंताना संधी देताना सावंतवाडीतील कलातपस्वी गुरुवर्य निलेश मेस्त्री यांच्या सद्गुरू संगीत विद्यालयाच्या कलावंतांना सुरमयी दिवाळी पहाट रंगीन करण्याची संधी दिली आणि त्या गुणी कलाकारांनी कार्यक्रमात संधीचे सोने करताना आपल्या कलागुणांची ओळख करून दिली नि वाहवा मिळवली. प्रत्येक गीताला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती. सुरांच्या या अविस्मरणीय प्रवासाने उपस्थित रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. पहाटेच्या कोवळ्या किरणांसोबत मनामनांत स्वरांची उधळण करणारा हा सोहळा केवळ मनोरंजनाचा आविष्कार ठरला नाही, तर सावंतवाडीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला उजाळा देणारा आणि नव्या पिढीपर्यंत संगीत-नाट्यपरंपरेचा वारसा पोहोचविणारा संस्मरणीय सांस्कृतिक जागर ठरला!
एकीकडे सावंतवाडीचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे, सुंदरवाडीचे सौंदर्य, संस्कृती टिकवून ठेवण्याचे, दिवाळीची पहाट सूरमय करून संगीत अजरामर करण्याचे काम सावंतवाडीतील पाडव्याच्या दिवशी दोन्ही दिवाळी पहाट संगीत कार्यक्रमांनी केले असतानाच दुसरीकडे दिवाळीच्या संध्येला सावंतवाडीतील तलावाच्या मध्यभागी आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले गेलेल्या कविवर्य केशवसुतांच्या आठवणी जपण्यासाठी, त्यांना आदरांजली व नित्य स्मरण राहण्यासाठी आद्यकवी केशवसुत नि निसर्गवेडे कवी प्रा.डॉ.वसंत सावंत यांच्या स्मृती जपलेल्या केशवसुत कट्ट्यावर काही हौश्या गौश्यानी बेधुंद होऊन फटाके फोडून पैशांची तर राखरांगोळी केलीच परंतु धुराच्या लोटात केशवसुतांच्या क्रांतिकारी “तुतारी” कवितेची आठवण म्हणून उभारलेल्या तुतारीला देखील काळवंडून टाकलं. मोती तलावाच्या मध्यभागी केशवसुत कट्टा का उभारला? कविवर्य केशवसुत कोण? ते सावंतवाडीत काय करत होते…? कवी प्रा.डॉ.वसंत सावंत कोण..? त्यांचे साहित्य काय..? त्यांचेच साहित्य लिखित स्वरूपात तिथे का कोरून ठेवले..? या प्रश्नांच्या वाटेला कधीही न गेलेल्या लोकांनी कट्ट्याचे पावित्र्य ओळखले नाही, जपले नाही आणि कट्ट्यावर गगनचुंबी फटाक्यांची आतषबाजी करून आपल्याकडे आलेल्या नैतिक अनैतिक पैशांचा दिखावा करत केशवसुत कट्टा जवळपास दोन तीन तास धुराच्या लोटात होरपळत ठेवला. शहरभर प्रदूषण झाले त्याचा नागरिकांना, पशु पक्ष्यांना होणारा त्रास हा वेगळाच विषय..!
सावंतवाडी हे जसे कला, क्रीडा आणि संस्कृतीचे माहेरघर आहे, तसेच ती साहित्यप्रेमींचीही भूमी राहिली आहे. कवी, लेखक, विचारवंत आणि नागरिक एकत्र येऊन साहित्यिक चर्चा करू शकावेत, कवितांचे वाचन करू शकावेत किंवा निवांतपणे विचारविनिमय करू शकावेत, या उद्देशाने या कट्ट्याची निर्मिती केली गेली आहे. संध्याकाळच्या वेळी साहित्यिक, कवी आणि पर्यटक या कट्ट्यावर येऊन निसर्गाचा आनंद घेतात. त्यामुळे सावंतवाडीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वैभवात हा कट्टा एक महत्त्वाचे स्थान राखून आहे. असे असताना देखील सावंतवाडी शहराशी देणेघेणे किंवा प्रेम नसलेल्या, सावंतवाडीत बाहेरून आलेल्या (??) हौश्या गौश्यानी फटाके फोडून झाल्यावर “मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही” अशाच आविर्भावात फटाके फोडणारे कर्मदरिद्री जळत असलेले, राख झालेले पुठ्याचे खोके, कितीतरी फटाक्यांचे भग्न अवशेष कट्ट्यावर टाकून निघून गेले आणि कट्ट्याची अवस्था युद्ध हरलेल्या रणभूमीसारखी करून “आम्ही फटाक्यांचा जाळ केल्यावर अनेकांच्या बुडातून धूर आला” अशी दर्पोक्ती करून विजयी वीर असल्याचे भासवू लागले.
परंतु….,
सावंतवाडीच्या नागरिकांनी, साहित्यप्रेमींनी पहाटे तळ्याच्याकाठी फेरफटका मारताना केशवसुत कट्ट्याची झालेली अवस्था पाहून अत्यंत खेद व्यक्त केला. अनेकांचे चेहरे कट्ट्यावर पसरलेल्या राखेपेक्षाही काळवंडले, काहीजणांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. कारण,
“एक तुतारी दे मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्घाच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी दे मज आणुनि!”
असे क्रांतिकारी विचार आपल्या कवितेतून मांडणारे कविवर्य केशवसुत हे सावंतवाडीतील साहित्यिक वारसा जपणाऱ्या साहित्यिकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे सावंतवाडीतील साहित्यिकांना, साहित्य प्रेमींना सदर कृत्याचा नक्कीच त्रास झाला आहे, त्यांनी निषेधही नोंदवला आहे. काहींनी सोशल मिडियामधून व्यक्त होऊन या भरकटलेल्या लोकांसाठी देवाकडे प्रार्थना सुद्धा केली अन् काहींनी केशवसुतांनी पुनर्जन्म घ्यावा अशी विनवणी केली.
कारण, अशा बुरसटलेल्या लोकांना माणसात आणण्यासाठी केशवसुतांच्या क्रांतिकारी विचारांची आजही गरज आहे. तुतारी कवितेतून केशवसुतांनी अशाच जुन्या, बुरसटलेल्या विचारांना मूठमाती देऊन नवीन विचारांचे स्वागत करण्याचे आवाहन केले आहे. भविष्यात सावंतवाडीतील भरकटलेली पिढी जुने बुरसटलेले किंवा बुरसटलेल्या विचारांच्या माणसांना मूठमाती देऊन सावंतवाडीची संस्कृती आणि साहित्यिक वारसा जपावा अशी आशा करूया आणि पुन्हा पवित्र स्थान असलेल्या केशवसुत कट्ट्यावर दुष्कृत्य होऊ नये यासाठी खबरदारी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासन घेईल ही आस धरू…
