You are currently viewing दिवाळी संपताना…!

दिवाळी संपताना…!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम लेख*

 

*दिवाळी संपताना…!*

(उत्सव संपतो, पण मनातला प्रकाश कायम राहतो!)

 

 

दिवाळी संपताना मनात एक विलक्षण हुरहूर दाटून येते. काही दिवसांपूर्वीच उत्साहाने सजलेले घर, आनंदाने भरलेले अंगण, पणत्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या भिंती, आकाशकंदिलांच्या रंगीबेरंगी छटा आणि फराळाच्या सुगंधाने दरवळणारा स्वयंपाकघराचा कोपरा… हे सारे हळूहळू पुन्हा रोजच्या जगण्याच्या चौकटीत सामावू लागते. दिवाळीच्या दिवसांत काळ जणू थोडा थांबलेला असतो. धावपळीच्या आयुष्यात हरवलेली माणसे एकत्र येतात. घरात हास्याचे झरे वाहतात. नात्यांना उजाळा मिळतो. मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. आणि मग अचानक एक दिवस जाणवते… दिवाळी संपत आली आहे!

 

खरं तर दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा उत्सव नाही; ती मनाच्या गाभाऱ्यात साठलेल्या आनंदाला मुक्तपणे व्यक्त करण्याची एक सुंदर संधी आहे. घराच्या कानाकोपऱ्यात साचलेली धूळ झटकताना आपण मनावर साचलेली उदासीही झटकून टाकतो. जुन्या वस्तूंची विल्हेवाट लावताना काही कटू आठवणी मागे सोडतो. दारात रांगोळी रेखाटताना नव्या स्वप्नांचे रंग मनात भरतो. प्रत्येक पणती पेटवताना आयुष्याच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचा किरण शोधतो.

दिवाळी सुरू होण्यापूर्वीच तिच्या आगमनाची चाहूल लागते. घराची साफसफाई, खरेदीची लगबग, फराळाची तयारी, आकाशकंदील, पणत्या, फुलांच्या माळा, रांगोळीचे रंग… प्रत्येक गोष्टीत एक वेगळाच उत्साह असतो. बाजारपेठा उजळून निघतात. दुकानांच्या सजावटीतून उत्सवाचे रंग ओसंडून वाहतात. घराघरांतून चकल्या, करंज्या, लाडू, शंकरपाळे यांच्या सुगंधाची आमंत्रणे येतात. या सगळ्या गडबडीत घरातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका वेगळी असते. आईच्या हाताला विश्रांती नसते. बाबांची खरेदीसाठी धावपळ सुरू असते. मुलांचा उत्साह तर विचारूच नका! नवीन कपडे कधी घालायचे, फटाके कधी वाजवायचे, पाहुणे कधी येणार, फराळात काय काय असणार, या प्रश्नांची सरबत्ती सुरू असते. घरातील ज्येष्ठ मंडळी मात्र या सगळ्या गडबडीकडे समाधानाने पाहत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य असते. त्यांना आठवत असते त्यांची बालपणीची दिवाळी, तेव्हाचे साधेपण, माणसांमधला जिव्हाळा आणि सण साजरा करण्याची निराळी पद्धत.

 

आजच्या दिवाळीचे स्वरूप बदलले आहे. काळ बदलला, साधने बदलली, माणसांच्या आवडीनिवडी बदलल्या. पूर्वी मातीच्या पणत्या, आकाशकंदील आणि घरच्या फराळात रमणारी दिवाळी आता आधुनिक सजावटीच्या झगमगाटात नटू लागली आहे. मोबाईलवरून शुभेच्छांचा वर्षाव होतो. सामाजिक माध्यमांवर छायाचित्रांची रेलचेल असते. क्षण टिपण्याच्या नादात कधी कधी तो क्षण मनापासून जगायचाच राहून जातो. तरीही दिवाळीचे मूळ सौंदर्य अजूनही टिकून आहे. कारण तिचा आत्मा वस्तूंमध्ये नसतो, तो माणसांमध्ये असतो. एखाद्या दूरच्या नातेवाइकाचा फोन, अनेक दिवसांनी झालेली भेट, एखाद्या जुन्या मित्राने अचानक दिलेली हाक, आईच्या हातच्या फराळाचा घास, आजीने प्रेमाने लावलेले औक्षण… या गोष्टींना कोणत्याही महागड्या भेटवस्तूची सर येऊ शकत नाही.

 

दिवाळीतील प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक भावार्थ आहे. धनत्रयोदशीचा मंगलभाव, नरकचतुर्दशीचा पहाटेचा अभ्यंगस्नानाचा उत्साह, लक्ष्मीपूजनाची प्रसन्नता, पाडव्याचे नात्यांमधील प्रेम आणि भाऊबीजेची भावबंधांची ऊब… हे सारे दिवस मनाच्या वहीत सुंदर नोंदी करून जातात.

पण या उत्सवाची खरी गंमत त्याच्या संपण्यातही आहे.

दिवाळीचा शेवट जवळ आला की घरातील वातावरणात एक वेगळीच शांतता उतरू लागते. काही दिवसांपूर्वी किलबिलाटाने भरलेले घर पुन्हा नेहमीच्या लयीत येऊ लागते. पाहुण्यांच्या गप्पा थांबतात. मुलांच्या खेळण्यांचा आवाज कमी होतो. फराळाचे डबे रिकामे होतात. नवीन कपडे कपाटात विसावतात. अंगणातील रांगोळीची जागा पुन्हा मोकळी होते.

दारातील आकाशकंदील उतरवताना मनात एक विचार डोकावतो. इतक्या आतुरतेने वाट पाहिलेली दिवाळी इतक्या लवकर संपली? कालपरवाच तर आपण घर सजवत होतो. कालच तर पणत्या लावत होतो. कालच तर सगळे एकत्र बसून हसत होतो. मग हा आनंद इतक्या लवकर का सरला?

कदाचित आनंदाचे क्षण मोजता येत नाहीत म्हणून ते नेहमीच अल्प वाटतात.

दिवाळी संपताना सर्वांत जास्त आठवण येते ती एकत्र आलेल्या माणसांची. वर्षभर नोकरी, व्यवसाय, शिक्षण, संसार, जबाबदाऱ्या आणि अंतर यांच्या भोवऱ्यात अडकलेली माणसे या दिवसांत एकत्र येतात. कोणाच्या हातात मोबाईल, कोणाच्या हातात फराळाची परात, कोणाच्या चेहऱ्यावर हास्य, तर कोणाच्या डोळ्यांत जुन्या आठवणींची ओल असते.

 

मात्र सण संपला की प्रत्येक जण आपापल्या वाटेने निघतो. पुन्हा तेच काम, तीच धावपळ, तीच वेळेची गणिते सुरू होतात. एकत्र घालवलेले क्षण मात्र मनाच्या कप्प्यात जपून ठेवावे लागतात.

कधी कधी दिवाळी संपताना घरात माणसांची गर्दी कमी होते, पण आठवणींची गर्दी वाढते. ज्येष्ठांच्या मनात जुन्या दिवाळीचे चित्र तरळते. काहींच्या मनात दूरदेशी असलेल्या मुलांची आठवण दाटते. काहींना दिवंगत आप्तस्वकीयांची उणीव जाणवते. ज्यांच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती कायमची निघून गेली आहे, त्यांच्यासाठी दिवाळीचा आनंदही कधी कधी विरहाच्या सावलीने झाकोळला जातो.

कारण प्रत्येकाच्या अंगणात दिवाळीचे दिवे सारखेच उजळत नाहीत!

कुणाच्या घरात आनंदाचा गजर असतो, तर कुणाच्या घरात शांततेची चादर पसरलेली असते. कुणासाठी नवीन कपड्यांची खरेदी असते, तर कुणासाठी रोजच्या गरजा भागवण्याची धडपड असते. कुणाच्या घरात फराळाचे डबे भरलेले असतात, तर कुणाच्या घरात दोन वेळच्या जेवणाची चिंता असते.

मग प्रश्न पडतो, दिवाळीचा प्रकाश खऱ्या अर्थाने कुठे उजळतो?

तो केवळ मोठमोठ्या रोषणाईत उजळतो का? महागड्या भेटवस्तूंमध्ये, आकर्षक सजावटीत किंवा फटाक्यांच्या आवाजात तो असतो का?

नाही!

तो असतो एखाद्या गरजू मुलाच्या हातात दिलेल्या नवीन वहीत. तो असतो वृद्धाश्रमातील आजीच्या चेहऱ्यावर फुललेल्या हास्यात. तो असतो एकटेपणाने व्याकूळ झालेल्या व्यक्तीला दिलेल्या सहवासात. तो असतो एखाद्याच्या दुःखात सहभागी होणाऱ्या संवेदनशील मनात.

 

दिवाळी संपताना आपण या प्रकाशाचा अर्थ पुन्हा एकदा समजून घ्यायला हवा. आपण किती दिवे लावले, किती फराळ केला, किती खरेदी केली, यापेक्षा आपण किती मने जोडली, किती नाती जपली आणि किती जणांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण केला, हे अधिक महत्त्वाचे नाही का?

दिवाळीच्या पणत्या काही तासांत विझतात. आकाशकंदील काही दिवसांनी उतरवला जातो. रांगोळीचे रंग पुसले जातात. फटाक्यांचा आवाज हवेत विरून जातो. पण या सगळ्यांमधून मिळालेला आनंद, प्रेम आणि माणुसकीचा अनुभव मात्र कायमचा मनात राहू शकतो.

खरं तर दिवाळी संपत नाही; ती फक्त तिचे बाह्यरूप बदलते. सणाच्या दिवसांत आपण घराघरांत पणत्या लावतो; त्यानंतर रोजच्या जगण्यात माणसांच्या मनात विश्वासाची ज्योत पेटवायची असते. सणाच्या दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देतो; त्यानंतरही एकमेकांची विचारपूस करायची असते. दिवाळीत आपण घर स्वच्छ करतो; त्यानंतर मनातील मत्सर, द्वेष, अहंकार आणि कटुता दूर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपले आयुष्यही या दिवाळीसारखेच आहे. काही क्षण तेजस्वी, काही क्षण शांत, काही क्षण आनंदाने भरलेले, तर काही क्षण हुरहूर लावणारे!… प्रत्येक क्षण कायमचा राहत नाही. म्हणूनच मिळालेल्या आनंदाला मनापासून जगायला हवे. भेटलेल्या माणसांना जपायला हवे. नात्यांमधील प्रेम व्यक्त करायला हवे. कारण उद्याच्या अनिश्चिततेपेक्षा आजचा जिव्हाळा अधिक मोलाचा असतो.

 

आपल्या आयुष्यातही कितीतरी पणत्या आहेत. आई-वडिलांचे प्रेम, भावंडांची साथ, मित्रांची मैत्री, जोडीदाराचा विश्वास, मुलांचे निरागस हास्य आणि माणुसकीचा ओलावा… या सगळ्या पणत्या जपल्या, तर आयुष्याची प्रत्येक रात्र उजळून निघेल. म्हणून दिवाळी संपताना घरातील शेवटची पणती विझवताना मनातली आशेची पणती मात्र विझू देऊ नये. आकाशकंदील उतरवताना स्वप्नांचा प्रकाश उतरवू नये. रांगोळी पुसताना नात्यांमधले रंग पुसू नयेत. फराळाचे डबे रिकामे झाले तरी प्रेमाचा गोडवा कमी होऊ देऊ नये.

दिवाळीच्या दिवसांत आपण घर उजळवले; आता माणसांची मने उजळवूया. दिवाळीत आपण आनंद वाटला; आता दुःखातही सहभागी होऊया. सणासाठी आपण नाती जोडली; आता सण नसतानाही ती जपूया.

कारण उत्सव काही दिवसांचा असतो, पण त्यातून मिळणारी जीवनमूल्ये आयुष्यभराची असतात.

 

दिवाळी संपताना मनात एकच प्रार्थना उमटते,

“प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची पहाट उगवो. दुःखाच्या अंधारात आशेची ज्योत तेवत राहो”. नात्यांमधील प्रेम कधीही कमी होऊ नये. माणसामाणसांतील अंतर मिटावे. प्रत्येकाच्या घरात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबर समाधानाचेही चार क्षण असावेत.

दिवाळीचे दिवे विझतील, पण मनातील प्रकाश विझू नये. उत्सवाचे दिवस सरतील, पण जगण्यातील उत्साह सरू नये. कारण खरी दिवाळी कॅलेंडरवर नसते, ती आपल्या विचारांत, कृतीत आणि माणुसकीत असते!

दिवाळी संपताना एवढेच मनाशी ठरवूया…

पुढच्या दिवाळीची वाट पाहत बसण्यापेक्षा, प्रत्येक दिवसाला दिवाळी बनवूया आणि आपल्या जगण्याने दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश पसरवूया!

 

 

सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा